Thursday, May 2, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यदहावी, बारावीनंतर करिअर निवडताना...

दहावी, बारावीनंतर करिअर निवडताना…

रवींद्र तांबे

दहावी आणि बारावीचे विद्यार्थी वर्षभर अभ्यासाच्या दडपणाखाली असतात. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बोर्डाची परीक्षा संपल्यामुळे आता विद्यार्थी मुक्त झाले आहेत. तेव्हा त्यांनी काही दिवस मोकळा श्वास घेऊन आपल्या करिअरच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. नंतर काय मी मूर्ख? म्हणण्यापेक्षा आपली आवड लक्षात घेऊन आपल्या करिअरची निवड करावी. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी थोडक्यात घेतलेला आढावा.

विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यावर आपल्याला करिअरच्या दृष्टीने एखाद्या शाखेची निवड करण्यापेक्षा आतापासून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या शाखेचा किंवा पदवीचा विचार करावा. कोणतीही पदवी घ्या प्रथम  आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा सामना करावा लागतो. त्यासाठी दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असतात. या दोन परीक्षांवर विद्यार्थ्यांचे करिअर ठरत असते. अलीकडच्या काळात जरी बोर्डाची परीक्षा दिली तरी काही पदव्यांची प्रवेशप्रक्रिया सीईटी परीक्षेवर अवलंबून असते. तेव्हा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्या म्हणून गाफील न राहता आपल्या करिअरच्या शोधात असायला हवे. त्यांनी आपल्या करिअरच्या दृष्टीने आताच अचूक शाखेची निवड करावी. त्यासाठी आपल्या कार्यक्षमतेचा विचार करावा. यात आपली बुद्धिमत्ता, काम करण्याची क्षमता, आवड व आपले व्यक्तिमत्त्व अशा घटकांचा विचार आपले करिअर निवडताना प्रामाणिकपणे होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासून आपल्या करिअरच्या शोधात असायला हवे.

सन १९८५ पर्यंत दहावी झाल्यावर डीएड करायचे. डीएडच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना त्याच परिसरातील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष घरी येऊन सांगायचे की, रिझल्ट लागल्यावर माझ्या शाळेवर या. सध्या तर डीएडवाल्यांची काय अवस्था आहे याची सर्वांना कल्पना आहे. आता तर डीएड पदवीच पटलावर नाही. तेव्हा करिअरची निवड करताना विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत असणार आहे. त्यासाठी त्यांनी उन्हाळी सुट्टीचा योग्य प्रकारे वापर करावा. विशेषतः त्यांनी भारताचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० चा अभ्यास करावा. यावरून पदवीचा कालावधी व अभ्यासक्रमाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना पुढची दिशा ठरविता येते.

आता आपली परीक्षा संपली म्हणजे आपण मोकळा झालो असे नाही तर काही पदवी अभ्यासक्रमांना सीईटीची परीक्षा आहे. त्यामुळे त्या संदर्भात माहिती घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच सीईटीच्या अभ्यासाला लागावे. आजच्या स्पर्धात्मक युगात वावरत असताना एकाच अभ्यासक्रमाच्या नादात न पडता वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या प्रक्रियेत भाग घ्यावा. ज्या ठिकाणी प्रवेश मिळेल त्याचा विचार करून आपल्या पसंतीनुसार अभ्यासक्रम निवडावा. आपला कल कोणत्या शाखेकडे आहे हे आताच ठरवावे लागेल. त्यासाठी आपले कौशल्य पणाला लावावे लागेल. आपली आवड-निवड आजच ठरविली पाहिजे. यासाठी उन्हाळी सुट्टीचा योग्य प्रकारे वापर करता आला पाहिजे. एखाद्या अभ्यासक्रमाविषयी माहिती हवी असेल तर त्या शिक्षणसंस्थेत जाऊन चौकशी करावी. यासाठी अनुभवाची आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी अभ्यासक्रम शिकविला जातो. त्याची सविस्तर माहिती घेता आली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे चलबिचल न होता अभ्यासक्रम पाहून स्वत: निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:विषयी आत्मपरीक्षण करायला हवे.

कला, वाणिज्य, विज्ञान, गुंतवणूक, विमा, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्ट, व्यवसाय, फार्मसी अशा विविध क्षेत्रांत करिअरच्या संधी आहेत. त्यासाठी प्रामाणिकपणे खूप मेहनत विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल. त्याचे उशिरा का होईना निश्चितपणे फळ मिळते. त्यासाठी मेहनत व चिकाटी अतिशय महत्त्वाची असते. केवळ आपला मित्र करतो म्हणून मी करतो असे न करता दूरदृष्टी ठेवावी. आपल्याला काय करायचे आहे, हे डोळ्यांसमोर ठेवून आपल्या जीवनाचा शिल्पकार आपणच बनायचे आहे. एकदा संधी गेली की पुन्हा येत नाही. त्यामुळे संधीचे सोने करायला शिका. हीच वेळ आहे. तेव्हा आपल्या जीवनात आपले करिअर व जीवन यांचा समतोल भविष्यात कसा साधता येईल यासाठी अचूक करिअरची निवड आवश्यक असून वेळच्या वेळी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन गरजेचे आहे.

आपण जरी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले तरी प्रत्येकाला स्वतःला घडवावे लागेल. जेव्हा करिअरची निवड कराल तेव्हा स्वत:मध्ये सुद्धा आपल्याला बदल करावे लागतील हे विसरता कामा नये. त्या क्षेत्रातील आवश्यक प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण अभ्यास करण्याची जिद्द ठेवा. आजपासून स्वत:चा विचार स्वत: करायला शिका. त्याचप्रमाणे विविध स्पर्धा परीक्षा सुद्धा द्या. आपली आवड कोणत्या विषयात, कोणत्या अभ्यासक्रमात आहे याची कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता निवड करावी. यातच आपले कल्याण आहे. शेवटी आपल्याला आपणच घडवायचे आहे हे विसरून चालणार नाही. तेव्हा उन्हाळी सुट्टी फिरण्यात, बागडण्यात त्याचप्रमाणे खेळण्यात घालविण्यापेक्षा स्वत:साठी वेळ देऊन स्वत:च्या करिअरला दिशा देण्यासाठी आपल्या आवडीच्या क्षेत्राची निवड करावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -