Monday, May 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजरिफायनरीला आता विरोध करणा-या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय केले?

रिफायनरीला आता विरोध करणा-या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय केले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे विरोधात सडकून टीका

मुंबई : ज्यांनी अडीच वर्षांमध्ये साधा एक प्रकल्प कोकणासाठी आणला नाही ते आज आलेल्या प्रकल्पाला विरोध करीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरुन जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले की, प्रकल्प सुरु केला तर महाराष्ट्र पेटवू असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे दोनदा मंत्रालयात गेले आणि आता मात्र पेटवण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये फिरत आहेत. स्वतःला दिर्घकाळ चालता येत नाही. कोणावर हात वर करू शकत नाहीत. तरीही पेटवूची भाषा का बोलतात हे कळत नाही, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे बरंच काही बडबडले आहेत. त्यात त्यांनी अनेक धमक्या दिल्या. महाराष्ट्र पेटवीन वगैरे वाक्य आहेत त्यांची. पण उद्धव ठाकरे आज स्वतः कोण आहेत, याची जाणीव त्यांना आहे का माहीत नाही. तसं जे ते म्हणताहेत की प्रकल्प जर उद्या सुरू केला, हुकुमशाही करून सुरू केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू असं त्यांचं वाक्य आहे. ४० आमदार गेले. १०-१२ आमदारच असतील आता. महाराष्ट्रात सर्वांत कमी ताकदीचा पक्ष म्हणजे शिवसेना. पेटवायला निघालेत म्हणे, हेलिकॉप्टरमध्ये मशाल घेऊन जाणार का? महाराष्ट्रात एवढे नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एन्रॉन आला, त्याला विरोध, जैतापूरला विरोध, महामार्गाच्या कामाला विरोध, विमानतळाला विरोध, प्रत्येक विकासाच्या कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल आस्था, प्रेम, की द्वेष आहे? कोणताही प्रकल्प अडीच वर्षांत कोकणात आणला नाही. ना खासदार, ना आमदाराने आणला. पाटबंधारे, रस्ते, ब्रीज, पायाभूत सुविधांवर सांगावे की स्पेशल म्हणून आणले इथे. कोकणाच्या विकासात योगदान काहीच नाही, असे नारायण राणे यांनी हिणवले.

बारसू येथे उद्धव ठाकरे रिफायनरीच्या प्रस्तावित जागेत पोहोचले आणि ते सोलगावला गेले. त्यांच्या सभेला परवानगी नाकारली असल्याने मीही माझा दौरा रद्द केला. यांनी कोकणासाठी काहीच केलेले नाही. मुख्यमंत्री असताना ते निव्वळ निकामी होते. महाराष्ट्राला एक निकामी मुख्यमंत्री लाभला होता,

जैतापूरच्या विरोधासाठी ५०० कोटींचा डील झाली होती. त्यांनी कोळश्याच्या उद्योगपतींकडून ५०० कोटी घेतले होते. संजय राऊत म्हणाले वाटणी झाली होती. राऊत दारु पिल्यासारखं काहीही बोलत आहेत. सध्या ठाकरे-राऊत डिप्रेशनमध्ये गेले आहेत, असे ते म्हणाले.

“१९९९ साली सिंधुदुर्गात दरडोई उत्पन्न ३५ हजार होतं. आज ते २ लाख ३० हजार आहे. हे वाढलं आहे ना त्याला कारण शिवसेना उद्धव ठाकरे नाही. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना आणलं, असं कोणीतरी म्हणालं. मी शिवसेनेत आलो तेव्हा तो काय करत होता. हा ९९ नंतर आला”, असा एकेरी उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“कोकणचा कॅलिफोर्निया करू म्हणाले. पण कॅलिफोर्नियामध्ये काय आहे ते पहा. कॅलिफोर्नियात १४ रिफायनरी प्रकल्प आहे. तिथे पर्यावर नाही का? मग इथेच विरोध का?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -