Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलWealth : श्रीमंती!

Wealth : श्रीमंती!

  • कथा : रमेश तांबे

रूपाचा गावाला राहणाऱ्या लोकांशी कधीही संबंध आला नव्हता. त्यामुळे काळे-सावळे लोक, साधेसुधे कपडे घालणारे लोक यांना पाहताच रूपा नाक मुरडायची. आजही तसेच झाले. पण बाबा आणि आई मात्र त्यांना खूप मानाने वागवत होते, याचं तिला नवल वाटत होते.

रुपाच्या घरी आज पाहुणे आले होते. गावाहून बाबांचे बालपणीचे मित्र त्यांच्या बायको अन् दोन मुलींसह आले होते. दहा-बारा वर्षांच्या त्या काळ्या-सावळ्या मुली रूपाच्याच वयाच्या होत्या. खरं तर आज रविवारचा दिवस हा रूपाचा विश्रांतीचा दिवस होता. आरामात लोळत पडायचं, दुपारी कधीतरी अंघोळ करायची, मग टीव्ही, मोबाइल बघत बघत नूडल्स, केक्स वा वेफर्स असं काहीतरी खात बसायचं. असाच रूपाचा रविवारचा नेहमीचा दिनक्रम असायचा. पण आज पाहुणे सकाळी सात वाजताच घरी अचानकपणे हजर झाले. रूपालाच काय बाबांनासुद्धा आश्चर्य वाटले. बेल वाजली अन् रूपाची झोपमोड झाली. मग मनातल्या मनात चरफडून रूपा डोक्यावर चादर ओढून झोपण्याचा प्रयत्न करू लागली.

रूपाच्या बाबांनी आपल्या मित्राचं हसून स्वागत केलं. गावाहून आलेला बाबांचा हा मित्र कसा दिसतो, कसा बोलतो, त्यांच्या त्या सावळ्या मुली, त्यांच्या अंगावरचे कपडे हे सारं चादरीच्या आडून रूपा बघत होती. तिच्या चेहऱ्यावर नापसंती होती. कोण ही माणसं? का आलीत इथं? शिवाय किती गावंढळ दिसतात! पण बाबादेखील त्याच्याशी इतके हसून का बोलतात याचे कोडे तिला उलगडत नव्हते.

रूपाचे बाबा एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करीत होते. ते एका उंच इमारतीत राहत होते. घरात श्रीमंती होती, फिरायला गाडी होती. रूपाचा गावाला राहणाऱ्या लोकांशी कधीही संबंध आला नव्हता. त्यामुळे काळे-सावळे लोक, साधेसुधे कपडे घालणारे लोक यांना पाहताच रूपा नाक मुरडायची. आजही तसेच झाले. पण बाबा आणि आई मात्र त्यांना खूप मानाने वागवत होते, याचं तिला नवल वाटत होते. सर्व पाहुण्यांच्या अंघोळी आटोपल्या. रूपालाही लवकर तयार व्हावे लागले. दिशा आणि निशा या दोन्ही मुलींनी देवापुढे बसून पूजा केली अन् प्रार्थनाही म्हटली. आज पहिल्यांदाच घरात प्रार्थनेचा स्वर रूपाच्या घरात घुमत होता. मग सर्वांचा चहापाणी झाला. तेव्हा बाबांनी त्यांच्या मित्राला विचारलं, “अरे यशवंता असं अचानक कसं येणं केलंस?”

“काही नाही रे, आज संध्याकाळी दिल्लीला जायचंय विमानाने चौघांनाही. आमच्या दिशाला आणि निशाला या वर्षीचा ‘राष्ट्रीय बाल शौर्य’ पुरस्कार मिळालाय ना! उद्या दुपारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार आहे ना त्यांचा!” बातमी ऐकून रूपाचे बाबा ओरडलेच, “काय या तुझ्या मुलींना!, दिशा-निशाला शौर्य पुरस्कार, काय, काय केले त्यांनी?”

“अरे त्यांनी एक माणसाला नदीत बुडताना वाचवले म्हणून त्यांना पुरस्कार मिळालाय.” बाबा पुन्हा आश्चर्याने म्हणाले, “काय? दिशा-निशा नदीत पोहायला जातात?”

“हो हो आमच्या दोन्ही मुली उत्तम पोहतात. आमच्या दिशाने तर पोहण्याच्या स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळवलीत. तीही देशपातळीवरची!” बाबांचा मित्र म्हणाला.

इकडे हे सर्व ऐकून रूपाची आई सारखी डोळे पुसत होती. या दोनही मुलींचं कौतुक किती करू अन् किती नको असं तिला झालं होतं. रूपाचे डोळे तर खाडकन उघडले होते. मघापासून ज्यांना आपण गावंढळ समजत होतो त्या मुली इतक्या भारी असतील असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता रूपाच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदराची भावना निर्माण झाली होती. रूपाच्या आईने दोघींनाही जवळ घेतले. त्यांचे पटापटा मुके घेतले. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला. थोड्या वेळांनी सर्वांची जेवणं झाली. “चल मित्रा निघतो आता, निघायला हवं. विमानतळावर दोन तास आधी पोहोचायला हवं. तुम्हा सर्वांना भेटून आनंद वाटला. अन् तुझी रूपा छान अन् हुशार आहे बरं.” बाबांचे मित्र कौतुकाने बोलत होते. निघताना दिशा, निशा आई-बाबांच्या पाया पडल्या. लहानगी निशा रूपाला घट्ट मिठी मारत म्हणाली, “ताई आमच्या गावाला ये हं. आपण खूप मजा करू” तिची ती मिठी रूपाला खूप काही शिकवून गेली. मग बाबांनी दोघींना काही पैसे बक्षीस म्हणून दिले, तर रूपाने तिच्या आत्यांनी परदेशातून पाठवलेले बुटांचे दोन जोड दोघींनाही भेट देऊन टाकले. मग जणू काही जीवाभावाच्या मैत्रिणीच भेटल्यात अशा प्रेमाने त्यांना मिठी मारली आणि त्या दोघींचे खूप खूप अभिनंदन केले. माणसाचे मोठेपण, त्यांची पात्रता, त्यांच्या क्षमता ही माणसाच्या वरवर दिसण्यावर कधीच नसते. हा एक मोठा धडा आजच्या प्रसंगाने रूपाला मिळाला होता!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -