Tuesday, May 21, 2024
Homeसाप्ताहिककोलाजविठ्ठला, तू वेडा कुंभार

विठ्ठला, तू वेडा कुंभार

श्रीनिवास बेलसरे

या महिन्याच्या २६ तारखेला त्या सिनेमाच्या प्रकाशनाला बरोबर ६१ वर्षे पूर्ण होतील. ‘प्रपंच’(१९६१) त्याचे नाव! महाराष्ट्राचे वाल्मिकी ग. दी. माडगूळकर यांच्या ‘आकाशाची फळे’ या कादंबरीवर दिग्दर्शक मधुकर पाठक यांनी ही सुंदर कलाकृती निर्माण केली.

त्याकाळी सिनेमात प्रामुख्याने गावाकडील अस्सल कथा असत. गावातच सिनेमाचे चित्रीकरण होई. त्यामुळे सगळे खरेखरे वाटायचे. संवाद तर बावनकशी मराठीत असत. मराठीच्या घरंदाज सडा-सारवण केलेल्या, रांगोळी काढलेल्या, सात्त्विक अंगणात त्याकाळी हल्लीसारख्या इंग्रजी आणि हिंदी शब्दांच्या प्रचंड झोपडपट्ट्या पडलेल्या नव्हत्या. त्यामुळे मायबोलीतला सगळा अनुभव अस्सल, सहज पटणारा, आपलासा वाटत असे.

‘प्रपंच’चे कथानक मात्र हल्लीच्या भाषेत ‘फ्युचरिस्टीक’ होते. त्याकाळी बहुतेक कुटुंबात असणारी मुलांची मोठी संख्या आणि त्यातून भोगावे लागणारे दारिद्र्य हा कथेचा गाभा होता. सिनेमाच्या शेवटी हे सर्व भोगलेली स्त्री कुटुंबनियोजनाचा प्रचार करण्यासाठी घरातून बाहेर पडते, असे मधुकर पाठकांनी दाखवले होते.

सिनेमातील बहुतेक गाणी लोकप्रिय झाली. मात्र आशयाच्या बाबतील एखाद्या अभंगासारखे भासणारे तिलक-कामोद रागावर बेतलेले एक गाणे फारच सुंदर होते. शाहीर अमर शेखांवर चित्रित झालेल्या गाण्याला संगीतही सुधीर फडके यांचे होते आणि गाणे गायलेही त्यांनीच. सिनेमात सीमा देव, आशा भेंडे, श्रीकांत मोघे, सुलोचना लाटकर, कुसुम देशपांडे, शंकर घाणेकर अशी इतरही दिग्गज मंडळी होती.

ईश्वरांवर निस्सीम श्रद्धा असणाऱ्या एका निरागस मनाने परमेश्वराशी केलेला संवाद म्हणजे हे गाणे! जसे जगतगुरू तुकाराम महाराज देवाला कुणी आकाशात बसलेला, विश्वाच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणारा न्यायाधीश वगैरे न मानता सरळ आपला सखाच मानतात, त्याच्याशी भांडतात, प्रसंगी त्याला शिव्या देतात, दुसरीकडे त्याला आपले आयुष्यही समर्पित करून टाकतात तसाच काहीसा सूर गदिमांनी या गाण्यात लावला.

एकंदरच मानवी जीवनाबद्दल छान भाष्य करताना कवी म्हणतो पंचमहाभुतातून हा मानवी देह निर्माण होतो हे खरे असले तरी हा सगळा उद्योग करतो कोण? तर प्रत्यक्ष परमेश्वरच हा खेळ युगानुयुगे खेळत बसला आहे. गाण्याचे शब्द होते –

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार विठ्ठला, तू वेडा कुंभार”

गदिमा देवाला कुंभार आणि तोही ‘वेडा कुंभार’ म्हणून टोचतात. अर्थात असे स्वातंत्र्य घ्यायला आधी त्याच्यावर तेवढे निस्सीम प्रेम करून त्याला आपलासा करून टाकावे लागते म्हणा! गीतरामायण लिहून गदिमांनी ती जागा मिळवली होतीच. ते गाण्यात सगळ्या मानवी जगण्याची प्रक्रियाच सांगतात.

“माती पाणी, उजेड वारा,
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला
नसे अंत ना पार…”

गाण्याचा आनंद घेताना मला या शब्दांबरोबरच नेहमी दोन दृश्ये हमखास आठवतात. एक म्हणजे जितेंद्रच्या ‘हिम्मतवाला’मध्ये त्याने श्रीदेवीबरोबरच्या नृत्याच्या वेळी मांडून ठेवलेली रंगीबेरंगी भांड्यांची उतरंड! आणि दुसरे म्हणजे जेव्हा एखाद्या जाहिरातीत जागतिक चित्र दाखवायचे असते तेव्हा दिसणारा सगळ्या जगातील लोकांच्या चेहऱ्यांचा कोलाज! त्यातले तुकतुकीत काळ्या कांतीचे कृष्णवर्णीय, युरोपियन गुलाबी-गोरे आणि गंधटिळे लावलेले आपल्या दाक्षिणात्य देशबांधवांचे भाविक चेहरे!

गदिमांनी माणसाच्या आयुष्यातील सुखदु:खे, त्यांचे कुणालाच न कळणारे प्रयोजन, सगळीकडे दिसणारा न्याय-अन्याय, विषमता या सर्व गोष्टींचे वर्णन किती कमी शब्दात केले आहे आहे, पाहा –
“घटा घटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे,
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार!”

शेवटच्या कडव्यात कवी आपल्याला चक्क ‘तिसरी कसम’मधील शैलेन्द्रच्या एका गाण्याची आठवण देतो. ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मनमे समाई, काहेको दुनिया बनाई? या गाण्यात शैलेंद्र जणू सरळ देवाची कॉलर पकडून त्याला विचारतोय, “गुपचूप तमाशा देखे, वाह रे तेरी खुदाई?”

आपल्या सौम्य रामभक्त गदिमांनी जरी शैलेंद्रइतका तिखट प्रश्न विचारला नसला तरी त्यांचा रोख तोच आहे. ते म्हणतात, परमेश्वरा, तू युगानुयुगे इतक्या कोट्यवधी जीवांना जन्माला घालतोस, सुखदु:खाच्या कठोर फेऱ्यातून जायला लावतोस, तुझ्या लेकरांना तूच मारतोस, कधी जवळ घेऊन कुरवाळतोस, या सगळ्यांतून तू काय साधतोस रे?

“तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू तूच ताडीसी,
न कळे यातून काय जोडीसी?
देसी डोळे, परी निर्मिसी, तयापुढे अंधार!”

कवीचे शेवटचे विधान मात्र आपल्याला अंतर्मुख करते. कवी देवाला विचारतोय, ‘तू अंध व्यक्तीलाही डोळे देतोस, पण त्यापुढे आयुष्यभराचा अंधारही तूच निर्माण केलेला असतो!’ ‘देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार…’ असे का बरे?

पण अंधत्व फक्त शारीरिकच असते का? दृष्टी असूनही अज्ञानाच्या, अहंकाराच्या अंधाराचा डोंगर अनेकदा माणूस स्वत:च स्वत:च्या डोळ्यांपुढे रचून ठेवत नसतो का? अशी गाणी ऐकली की, असे वेगळेच विचार मनात क्षणभर तरी डोकावतात. म्हणूनच काही तरी वेगळे दिसावे, कधीच लक्षात न आलेले एखादे सत्य शोधावे, सापडावे यासाठी अशा प्रबुद्ध कवींचे चार शब्द ऐकायला हवेत ना. त्यासाठीच तर हे असे भूतकाळात एक फेरफटका मारून यायचे! अर्थात हा असा नॉस्टॅल्जिया अनुभवायचा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -