Wednesday, May 22, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखविश्वकर्मा योजना बलुतेदारांना वरदान

विश्वकर्मा योजना बलुतेदारांना वरदान

कामामधील कौशल्याचे स्थान हे नेहमीच बलशाली असते. जुन्याकाळी ग्रामीण अर्थव्यवस्था ही गावातील बलुतेदारांवर अवलंबून होती. लोहार, सुतार, शिंपी, कुंभार, केशकर्तनकार, सोनार यांसारख्या अठरापगड जाती या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातूनच ओळखल्या जायच्या. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा बलुतेदार आपल्या कला-कौशल्याच्या जोरावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवायचा, त्यावेळी तशी ती एक प्रकारची सामाजिक रचना तयार झालेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात खऱ्या अर्थाने बलुतेदारांच्या कलागुणांना उत्तेजन देण्यात आले होते.

शिवकालीन बलुतेदारी ही शेती अर्थव्यवस्थेचा आधार बनली होती. त्यामुळे या कौशल्याला राजाश्रय प्राप्त झाला होता. याचा उपयोग शिवरायांनी दुर्गम स्थळी बांधलेले किल्ले. त्या किल्ल्यांच्या दरवाजावरील भव्य नक्षीकाम व बांधण्यात आलेल्या खांबावरील कलाकुसरी आजही आपणासाठी इतिहासाची साक्ष म्हणून कौशल्य प्राप्त शिल्प कारागिरांची आठवण करून देते. त्यामुळे शिवकालीन बलुतेदारी ही आजच्या आधुनिक काळातील कौशल्य विकासाचा पायाच म्हणावा लागेल. त्यानंतर कृषी अर्थव्यवस्थेला आधुनिकतेची जोड मिळाल्यामुळे हे कलाकौशल्य नामशेष होण्याच्या मार्गावर होते. काळाच्या ओघात कौशल्यास औद्योगिकीकरणामुळे यंत्रांचा सामना करावा लागला. कामाचा वेग वाढल्यामुळे यंत्रापुढे कारागीर थिटा पडू लागला. इंग्रज राजवटीत यंत्रांचे अनेक शोध लागल्यामुळे कारागिरांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले. त्यांच्यापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. पुढे त्यांचे जगणे शेती व्यवस्थेवर अवलंबून राहिले; परंतु दुष्काळी परिस्थिती व नैसर्गिक संकटामुळे शेतकरी व शेती उद्योगावर अवलंबून असणारे शेतमजूर हतबल झाले, मिळेल ते काम अशाप्रकारे समाजातील प्रत्येक घटक शहराकडे स्थलांतरित होऊ लागला. बलुतेदार यामधील कारागीर हा औद्योगिकीकरणामुळे एखाद्या कारखान्यात मजूर म्हणून काम करू लागला होता, हे भीषण सत्य मान्य करावे लागेल.

पूर्वी शेतकरी व शेतीपूरक व्यवसायामधील व्यवहार पैशाऐवजी वस्तू रूपाने होत असे. शेतीला लागणारे लोखंडी अवजारे, नांगर, कुऱ्हाड, कुदळी, पावडे इत्यादी वस्तूंच्या विनिमयातून अन्नधान्याची देवाण-घेवाण केली जायची. त्यालाच बलुतेदारी असे म्हणायचे. लोहार, सुतार, सोनार, कुंभार रंगारी अशा कलांची जोपासना करणारे हे बलुतेदार होते, तर शेतकरी आपल्या शेतीमधून अन्नधान्य पिकवायचा व कारागीर त्यांना वस्तूच्या माध्यमातून सेवा पुरवीत असायचा. नंतरच्या काळात सामाजिक सौहार्य टिकवून ठेवणारी कौशल्यपूर्ण बलुतेदारी औद्योगिकीकरणाच्या व नागरीकरणाच्या प्रभावाखाली मोडकळीस आली. आपल्या वाढत्या गरजा व अपेक्षा भागविण्याकरिता सर्वांनाच शहराकडे धाव घ्यावी लागली. अशामुळे बलुतेदारी कौशल्याचा ऱ्हास झाला; परंतु त्याचा पाया आजही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अधिक पक्का होताना दिसत आहे. सुतारकाम, सांधता, जोडारी, गवंडी, रंगकाम, ड्रेस मेकिंग असे व्यवसाय निर्माण झाले. या व्यवसायामधून आज विविध जाती-धर्माची मुले-मुली प्रवेश घेऊन यशस्वीरीत्या कौशल्य प्राप्त करीत आहेत. त्यामुळेच शिवकालीन बलुतेदारीच्या कौशल्य विकासाचा पाया आज देशातील हजारो औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून रचला गेला आहे. या कौशल्याच्या जोरावर हजारो मुला-मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.

मात्र, वर्षानुवर्षे परंपरागत व्यवसायावर जगणाऱ्या कारागिरांना केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न होत आहे. देशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील पारंपरिक हस्त-कलाकार आणि कारागिरांना सहाय्य देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेची संकल्पना आणली आहे. १३ हजार कोटींची “पीएम विश्वकर्मा” ही नवीन योजना पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी आहे. ही योजना विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. त्यामुळे हाताने आणि साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या हस्त-कलाकार आणि कारागिरांची गुरू-शिष्य परंपरा अथवा त्यांच्या कुटुंबाची पारंपरिक कौशल्य जोपासणाऱ्यांना बळकटी देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, हस्त-कलाकार आणि कारागिरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळख दिली जाणार आहे. तसेच ५% सवलतीच्या व्याज दराने पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला आहे. त्यात सुतार, होडी बांधणी कारागीर, चिलखत बनवणारे, लोहार, हातोडी आणि अवजार संच बनवणारे, कुलूप बनवणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार (मूर्तिकार, दगडी कोरीव काम), पाथरवट (दगड फोडणारे), चर्मकार (पादत्राणे कारागीर), मेस्त्री, टोपल्या/चटया/झाडू/कॉयर साहित्य कारागीर, बाहुल्या आणि खेळणी (पारंपरिक) बनवणारे, केशकर्तनकार, फुलांचे हार बनवणारे कारागीर, परिट (धोबी), शिंपी आणि मासेमारीचे जाळे विणणारे यांचा समावेश आहे. विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेद्वारे कुशल कारागिरांना आर्थिक मदत तर केली जाणारच आहे, याशिवाय या योजनेद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, ब्रँड प्रमोशन, स्थानिक आणि जागतिक बाजारपेठांशी जोडणे, डिजिटल पेमेंट आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. देशाच्या कानाकोपऱ्यांत विश्वकर्मा योजना पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीतून अनेक कुटुंबांना या योजनेमुळे स्थैर्य लाभेल, अशी अपेक्षा करू या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -