उत्कर्ष मंडळ : समाजाचा ‘उत्कर्ष’ हेच ध्येय

Share

सेवाव्रती : शिबानी जोशी

सामाजिक बांधिलकी हे शब्द आज जरी फार गुळगुळीत झाले असले तरी, १९६४-६५च्या सुमारास या शब्दांना खास अर्थ आणि वजन होते. ‘सामाजिक बांधिलकी’ याबाबत समविचारी व्यक्तींचा एक गट एकत्र आला आणि त्यातूनच विलेपार्ले इथे उत्कर्ष मंडळ या संस्थेचे उभारणी झाली. संस्थेसाठी सुरुवातीला ना जागा उपलब्ध होती, ना कोणत्याही सोयी-सवलती होत्या; परंतु तरीही संघ विचारांशी प्रेरित असलेले काही कार्यकर्ते संघाचं काम करत होते. काही काळ संघावर बंदी आली होती तरीही सामाजिक काम करण्याची इच्छा होती. विलेपार्ले भागात दोन मोठ्या सामाजिक संस्था होत्या, पण त्या मुख्यत्वे शैक्षणिक उपक्रम राबवत असत.

अशा संस्थेच्या माध्यमातून हे काम करता येईल म्हणून निर्मलाताई शेंडे, महादेव रानडे, पटवर्धन, करंबेळकर, बापट, जोशी, अशोक जोशी अशा समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन उत्कर्ष मंडळाचे ६ डिसेंबर १९६४ रोजी बीज रोवलं. सुरुवातीला व्याख्यान आयोजित करणे नाट्यप्रयोग लावणे, स्पर्धा, रक्तदान शिबीर, रस्त्यावर उभे राहून तिकीट विकून पैसे गोळा करणे अशा रीतीने थोडेफार पैसे गोळा केले गेले. सुरुवातीला टिळक मंदिर, माधवराव भागवत हायस्कूल अशा ठिकाणी जागा घेऊन य. दि. फडके, विद्याधर गोखले, शिवाजीराव भोसले अशा उत्तमोत्तम वक्त्यांची व्याख्याने आयोजित करून पार्लेकरांचे कान वर्षानुवर्ष तृप्त केले. याच प्रयत्नातून थोडीफार रक्कम जमा झाली. त्यानंतर अत्यंत कमी पैशांमध्ये संस्थेला एक जागाही उपलब्ध झाली आणि अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीमुळे तिथे इमारतही उभी राहिली. ४ मे १९८५ रोजी संस्थेची इमारत पूर्ण झाली; परंतु त्या आधीपासूनच संस्थेचे विविध उपक्रम सुरू होते. अनेक कार्यकर्ते जोडले गेले. १९७४ ते १९९२ या कालावधीत दरवर्षी पुस्तक पेढीचा उपक्रम यशस्वीपणे राबवला गेला, यातून ऐंशी ते शंभर विद्यार्थ्यांना पुस्तकांचा लाभ दिला जात असे.

पूर्वी पार्ल्यातील रहिवाशांना पुण्याला जाण्यासाठी दादरपर्यंत यावे लागत असे आणि पार्ल्याहून पुण्याला जाणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप होतं. ते पाहून रहिवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाशी संपर्क साधून पार्ले-पुणे बससेवा सुरू करण्यात आली आणि या बससेवेच्या आरक्षणाचं काम संस्थेने १९८८ ते २००० पर्यंत सलग केलं. त्यानंतर एसटी महामंडळाच्या धोरणातील बदलामुळे हे चांगलं काम बंद झालं. आपल्यातीलच एक रहिवासी श्रीमती करंदीकर या मूकबधिर मुलांसाठी स्वतःच्या घरी शाळा भरवत असत. ही शाळा त्यांनी मंडळाकडे हस्तांतरित केली. सात ते दहा विद्यार्थी संख्येपासून सुरू झालेल्या या शाळेमध्ये आज ७५ विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे. या ठिकाणी खेळ, चित्रकला, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम, अशा विविध अंगांनी मूकबधिर मुलांना शिक्षण दिलं जातं. शाळेतून अनेक मुले एसएससी पास होऊन गेली आहेत. मूकबधिरांसाठी शाळा चालवणं, हे प्रामुख्याने महत्त्वाचं काम उत्कर्ष मंडळातर्फे केलं जातं. शासनाचे लायसन्स मिळाले असल्यामुळे सर्व शासकीय नियम पाळून या मुलांना शिक्षण दिलं जातं. या मुलांचा अभ्यासक्रम वेगळा असतो. अभ्यासक्रम कमी असतो, थोडी शिथिलताही असते. या मुलांना परीक्षेला बसवून दहावीपर्यंत प्रशिक्षण दिलं जातं. यातील काही मुलांना फिजिओथेरपीही दिली जाते. त्यांच्यासाठी वर्ग बांधण्यात आले आहेत. प्रशिक्षित शिक्षक या मुलांना शिकवत असतात. यातील काही मुलांना ज्वेलरी शॉप किंवा हॉटेलमध्ये नोकरीही मिळाली आहे. कोरोना काळात इतर कामांबरोबर या मुलांकडे लक्ष देणेही गरजेचं होतं. कारण जवळजवळ दीड-दोन वर्षं ही मुलं घरी बसली होती. या मुलांच्या शिक्षणात खंड पडला, तर ते बऱ्याच गोष्टी आत्मसात करायला वेळ लावतात आणि म्हणूनच ज्या मुलांकडे मोबाइल नव्हते, त्यांना संस्थेतर्फे मोबाइल देऊन या मुलांना घरातही बिझी ठेवण्याचा उपक्रम राबवला गेला.

आज आपण पाहतो की, चाळिशीनंतर मध्यमवर्गीय घरांमध्ये स्त्री-पुरुषांना सांधेदुखीचे प्रश्न निर्माण होतात. विलेपार्ले, पूर्व येथे बहुसंख्य रहिवासी मध्यमवर्गीय आहेत. त्यांच्या सोयीसाठी चैतन्य फिजिओथेरपी केंद्र सुरू केलं असून अत्यंत अल्पदरामध्ये फिजिओथेरपी सुविधा पुरवली जाते. आरोग्यपूर्ण जीवनाचे महत्त्व लक्षात घेऊन योगासनाचे वर्गही नियमितपणे घेतले जातात. यात हे सामान्य रुग्णांकरिता तसेच कॅन्सरमधून बाहेर आलेल्या रुग्णांकरिता असे विशेष योगावर्ग चालवले जातात. याशिवाय, महिला विभागातर्फे संस्कार भारतीच्या रांगोळीचे वर्ग अनेक वर्ष येथे सुरू आहेत. या उपक्रमातून अनेक स्थानिक महिलांनी उत्कृष्ट रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे. याशिवाय २००२ सालापासून ‘नृत्य प्रभा’ या नृत्यवर्गात शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

उत्कर्ष मंडळ संस्थेचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे, ग्रंथगौरव कार्यक्रम. दरवर्षी प्रसिद्ध झालेल्या सामाजिक, शैक्षणिक, ऐतिहासिक क्षेत्रातील मूलगामी, विचारप्रधान अशा सर्वोत्कृष्ट ग्रंथाला आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक जोशी यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ मिळालेल्या देणगीच्या व्याजातून दिला जातो. १९९४ पासून आजपर्यंत अनेक नामवंत लेखकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यात गिरीश प्रभुणे, गिरीश कुबेर, प्रतिभा रानडे, अचला जोशी, रमेश पतंगे यासारख्या लेखकांच्या पुस्तकांना हे पुरस्कार दिले गेले आहेत. याशिवाय नवी पुस्तकं खरेदी करून ‘पुस्तक भिशी’ हा उपक्रम देखील राबवला गेला होता. महिला दिनानिमित्तही विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. टेक महेंद्र, ब्राइट फ्युचर यांसारख्या कंपन्या खूप चांगलं सहकार्य करत आहेत. त्यांच्याद्वारे दहावी-बारावीपर्यंत पोहोचलेल्या मूकबधिर मुलांसाठी शॉर्ट कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये इंटरव्ह्यू कसा द्यावा? बँकिंग, बँक ऑफिसचे काम वगैरे शिकवलं जातं. त्यांच्यातर्फे काहींना नोकरीही मिळत आहे.

काही वर्षांपूर्वी वाडा येथील दोन गावांत उत्कर्ष मंडळाने ड्रीप इरिगेशनसारख्या अनेक उपयोगी योजना करून दिल्या आहेत. सध्या दोनशे लोकवस्तीचं २२ शेतकरी असलेलं आणखी एक छोटंसं गाव दत्तक घेतलं असून तिथे १५ स्वच्छतागृह तसेच गावाला कुंपण घालून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या गावातील लोकांना त्यांच्या सहभागातून आणि श्रमदानातून हे उपक्रम पूर्ण करून दिले जातात. आपल्या गावाचं हित होणार आहे, हे कळल्यावर गावकरीही चांगले सहकार्य करतात. अशा प्रकारचं समाजकार्य आणखी करण्याची भविष्यात उत्कर्ष मंडळाची योजना आहे. थोडक्यात काय की, समाजाचा उत्कर्ष साधण्यासाठी उत्कर्ष मंडळ गेली ५७ वर्षं सातत्याने कार्यरत आहे.
joshishibani@yahoo.com

Recent Posts

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४

साप्ताहिक राशिभविष्य, २८ ते ४ मे २०२४ आर्थिक लाभ मेष : सदरील काळामध्ये आपल्या बुद्धी-वाणीच्या विकासासह…

2 hours ago

शब्दब्रह्म महावृक्षाच्या छायेत

मधु मंगेश कर्णिक ही अष्टाक्षरे गेली पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ कथा, कविता, कादंबरी, ललितलेखन, व्यक्तिचित्रण,…

2 hours ago

इच्छा…

“लग्न करा. पण नर्सिणीसोबत नको. दुसरी कोणीही चालेल. ही माझी अखेरची इच्छा आहे.” तो मोठ्याने…

3 hours ago

बिवलीचा लक्ष्मीकेशव

कोकणात केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतात. कोकणातील असेच गर्द राईतील अपरिचित शिल्प म्हणजे…

3 hours ago

विचारचक्र

अनेक लोक अतिविचारांनी ताणतणावाच्या चक्रात अडकले जातात. अतिविचार करणे हा मानवी मनाला अडसर ठरू शकतो.…

3 hours ago

‘जगी ज्यास कोणी नाही…’

नॉस्टॅल्जिया - श्रीनिवास बेलसरे एके काळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात आकाशवाणीने फार मोठे योगदान दिले आहे.…

3 hours ago