बिवलीचा लक्ष्मीकेशव

Share

कोकणात केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतात. कोकणातील असेच गर्द राईतील अपरिचित शिल्प म्हणजे बिवली गावचा लक्ष्मीकेशव. पेशवाईत अतिशय कठोर न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर नीळकंठशास्त्री थत्तेंची नेमणूक झाली. लक्ष्मी केशवाची मूर्ती थत्तेंना सापडली आणि त्यांनी बिवलीत प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले.

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

कोकणात विष्णू मूर्तीचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसते. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतील. इतक्या विपुल प्रमाणात शवाच्या मूर्ती या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. विष्णू मूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती या प्रकारात मोडतात. गर्द झाडी, शांत समुद्रकिनारे आणि कौलारू घरे अशा निसर्ग श्रीमंतीने कोकण प्रांत बहरलेला आहे; परंतु त्याचसोबत मोठ्या प्रमाणावर शिल्प श्रीमंतीसुद्धा या प्रदेशाला लाभलेली आहे. मात्र ही शिल्प श्रीमंती, हे शिल्पवैभव हे त्याच गर्द झाडीमध्ये कुठेतरी आतमध्ये लपलेले दिसते.

ते पाहायचे, अनुभवायचे तर नुसती वाट वाकडी करून चालत नाही, तर त्या ठिकाणाची नेमकी माहिती आणि इतिहाससुद्धा जाणून घ्यावा लागतो. कोकणातला प्रवास म्हणजे वळणावळणाचाच. सहजगत्या कोणत्या ठिकाणी जाऊ असे कधी इथे होतच नाही. पण जेव्हा आपण इच्छितस्थळी पोहोचतो तेव्हा मात्र निसर्ग नाही तर शिल्पं आपली नजर खिळवून ठेवतात. असेच एक अत्यंत देखणे आणि अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळच्या बिवली गावचा लक्ष्मीकेशव.

चिपळूण हे कोकणातील एक महत्त्वाचे शहर, रेल्वे स्टेशन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले ठिकाण. गुहागर या माझ्या अतिशय आवडत्या ठिकाणी जायला चिपळूण सोयीचे पडते. सध्या या रस्त्यावर पुलाचे आणि रुंदीकरणाचे काम सुरू आहे, पण लवकरच हा मार्ग आणखी उत्तम होईल अशी आशा. पण या हमरस्त्याला सोडून थोडी भ्रमंती करण्याची तयारी जर असेल, तर काही नितांत सुंदर ठिकाणे पाहता येतात. असेच एक ठिकाण म्हणजे बिवली. चिपळूणहून वासिष्ठी नदीच्या पात्राला समांतर २५-३० कि.मी. पश्चिमेकडे गेले की, मालदोली नावाचे ठिकाण लागते. तिथे हल्ली नदीतून बॅकवॉटर सफारी करण्याची सोय झाली आहे. मालदोलीकडे जात असताना केतकी या नावाचे गाव लागते. नदीचे पात्र उजवीकडे ठेवत २० कि.मी. अंतरावर श्रीराम मंदिर आहे, तिथून सरळ डाव्या बाजूला बिवलीकडे जाणारा रस्ता लागतो. शेवटचा काही भाग थोडा कच्चा आहे, पण गाडी व्यवस्थित गावापर्यंत जाते. गुगल मॅपमध्ये शेवटचे २०० मी.

अंतर पायी जावे लागते असे दर्शवले असले, तरीही कच्च्या मार्गावरून गाडी मंदिरासमोर पोहोचते. पेशवाईत अतिशय कठोर न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायशास्त्री प्रभुणे यांच्यानंतर बिवली गावातील नीळकंठशास्त्री थत्ते यांची नेमणूक झाली. इथली लक्ष्मी केशवाची मूर्ती थत्तेंना सापडली आणि त्यांनी बिवलीत प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले.

सन १८३० मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. हे देवस्थान थत्ते मंडळींचे कुलदैवत मानले जाते. पद्म-शंख-चक्र-गदा अशा क्रमात मूर्तीच्या हातातील आयुधे असल्याने ही मूर्ती केशवरूप मानली जाते. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर कोरीवकाम असलेल्या विष्णू मूर्ती पाहता येतात. ११-१२ व्या शतकात कोकणावर शिलाहार राजांचे शासन होते, तेव्हा यापैकी बहुतांश मूर्ती कोरल्या गेल्या. लेखाच्या शेवटी दिलेली लिंकही नक्की पाहा. त्याही नक्की पाहा. मूर्तीच्या गळ्यातील माळेत आंबा कोरला आहे, म्हणजे मूर्तिकार स्थानिकच असावा का? मूर्तीच्या पायाशी श्रीदेवी आणि नमस्कार मुद्रेतील गरुड दिसतो आणि सोबत सेविका आहेत. मूर्तीच्या हातातील कमळ एका बाजूने स्त्रीरूपाचा आभास निर्माण करते, यालाच लक्ष्मी मानले जाते. अतिशय सुंदर मुकुट, कोरीवकाम असलेली प्रभावळ आणि अगदी खरी वाटावीत अशी आभूषणे असे नाजूक कोरीव कामाने नटलेले हे शिल्प आहे. गाभाऱ्यासमोर गरुड शिल्प आहे, ते नवीन असावे. जसे शिवमंदिरात नंदी असतो, तसाच इथे गरुड आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Recent Posts

काव्यरंग

सांग कधी कळणार तुला सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला सांग कधी कळणार तुला…

2 mins ago

लज्जतदार : कविता आणि काव्यकोडी

आई म्हणते, मी दिसतो मस्त गुटगुटीत चवीचवीने खातो सगळे तब्येत ठणठणीत रसरशीत फळांचा मी पाडतो…

12 mins ago

स्नेहरूपी चाफा

माेरपीस: पूजा काळे वय वाढल्याचं हक्कानं दाखवून देणारा दिवस म्हणजे वाढदिवस. वर्षभराचा सुखदुःखाचा जमा-खर्च मांडण्याचा…

31 mins ago

ता­ऱ्यांचा प्रकाश

कथा - प्रा. देवबा पाटील यशश्रीसाठी परी म्हणजे ज्ञानाचे भांडार होते. म्हणून नेहमीप्रमाणे यशश्री ही…

32 mins ago

MI vs KKR: कोलकत्ताची प्लेऑफमध्ये दाबात एंट्री, मुंबईवर १८ धावांनी केली मात…

MI vs KKR: पावसामुळे मुंबई इंडियन्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स मधील सामना तब्बल पावने दोन…

39 mins ago

झटापट

ते म्हणतात ना हाताच्या काकणाला आरसा कशाला, प्रत्यक्ष स्पष्ट असणाऱ्या गोष्टीस पुरावा नको असतो हे…

45 mins ago