Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीराज्यात अवकाळी पावसाचा पून्हा धुमाकूळ, गारपिटीने मोठे नुकसान

राज्यात अवकाळी पावसाचा पून्हा धुमाकूळ, गारपिटीने मोठे नुकसान

बळीराजाची पुन्हा दैना, फळबागा, पिकांवर विपरित परिणाम

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतक-यांची झोप उडवली आहे. बळीराजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. राज्यात सर्व भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच राज्यात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे असून गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटी होण्याची शक्यता आहे.

आज झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला आंबा, काजू, कोकम गळून पडला आहे. द्राक्षांच्या बागांवरही विपरित परिणाण झाला आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या अवकाळीने मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची पुन्हा दैना झाली आहे.

दरम्यान, हवामान विभागाकडून मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तळकोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यभरात उकाडा जाणवत असताना दुपारपासून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पाठोपाठ सातारा, मेढा, जावली या भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुलगाव परिसरातील काही भागात पावसासह गारपीट झाली.

अकोल्यात पावसामुळे पातूर आणि बाळापुरात मोठं नुकसान झालं आहे. गारपिटीने संत्रा, भाजीपाला, गहू आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे अकोला बाजार समितीत शेतमालाचं नुकसान झालं. बाजार समितीत सध्या विकण्यासाठी आलेला हरभरा आणि गहू या पावसामुळे भिजला.

दरम्यान, तळकोकणातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. आंबोली, सिंधुदुर्ग, चौकुळ, गेळे परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे आंबा, काजूसह जांभुळ पिकाला फटका बसला आहे.

भारतीय हवामान खात्याकडून पुढचे २४ तास मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, दक्षिण कोकण, गोवा आणि पुढे पश्चिम किनारपट्टी, उत्तर कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांवर मेघगर्जनेच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिम विदर्भात गारपीटची शक्यता वर्तवण्यात आली असून काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -