Saturday, May 4, 2024
Homeकोकणरायगडवर्षा ऋतूत माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

वर्षा ऋतूत माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

माथेरान (वार्ताहर) : मुंबई आणि पुण्यापासून अगदी जवळचे रायगड जिल्ह्यातील एक सुंदर निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणजे अर्थातच माथेरान असल्यामुळे या वर्षा ऋतूत दर शनिवार आणि रविवार सुट्ट्यांच्या दिवशी तर पर्यटकांची अक्षरशः मांदियाळी दिसत असून या दिवसांत इथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले पाहावयास मिळत आहे.

मुंबई पुण्यावरून येताना नेरळ रेल्वे स्टेशनमध्ये उतरल्यावर माथेरानला येण्यासाठी नेरळ ते माथेरान दरम्यान मिनिट्रेन सेवा पावसाळ्यात चार महिने बंद करण्यात येते. त्यामुळेच सात किलोमीटरच्या या मनमोहक घाटरस्त्याच्या सुखद प्रवासासाठी टॅक्सीच्या साहाय्याने माथेरान गाठता येते. दस्तुरी नाका येथे उतरल्यावर काही अंतरावर अमन लॉज रेल्वे स्टेशनवरून गावात जाण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा बाराही महिने उपलब्ध असते. आपल्या खिशाला परवडणारे खर्चिक हौशी पर्यटक घोड्यावरून तर आबालवृद्ध मंडळी हातरीक्षाचा आधार घेऊन येत असतात.

डोंगरांचे नयनरम्य देखावे मनाला भुरळ घालतात त्यामुळेच शटल सेवेच्या प्रवासात सर्व मरगळ, थकवा निघून जातो. माथेरान स्टेशनवर आल्यावर आपले हॉटेल अथवा लॉज निश्चित केल्यानंतर भटकंतीसाठी महत्त्वाचे जवळपास दहा ते पंधरा पॉइंटस पाहण्याजोगे आहेत. त्यावरून नैसर्गिक देखावे न्याहाळत असताना खरोखरच तहानभूक हरवून जाते आणि नकळत आपण निसर्गाच्या सान्निध्यात एकरूप होऊन जातो. एखाद्या पॉइंटवरून निसर्गाचा नजारा न्याहाळताना गर्द धुक्याच्या लोटांमुळे अनेकदा समोरचे दृश्य डोळ्यांनी दिसत नाही; परंतु हे धुके हळूहळू लोप पावल्यावर समोर दिसणाऱ्या डोंगररांगा आणि त्यावरून मुक्तपणे उंचीवरून पडणारे शुभ्र जलप्रपात, संपूर्ण डोंगर न्हाऊन निघाल्यामुळे हिरवा शालू परिधान केलेले डोंगर अन वाऱ्यांची झुळूक, मध्येच येणारे रिमझिम पावसाचे थेंब अंगावर रोमांच उभे करतात.

माथेरानचा एकंदरीत परिसर हा १६७० एकरांत ५२ किलोमीटर मध्ये वसलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचे पॉइंटस पाहण्यासाठी निदान दोन दिवसांचा मुक्काम असणे आवश्यक आहे. अनेक पर्यटक पायी चालत इथल्या निसर्गाच्या सानिध्यात वावरताना दिसतात. या ठिकाणी पावसाळी धबधबे नाहीत त्यामुळे अनेकदा पर्यटक येथील शारलोट लेकच्या ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली मनसोक्तपणे भिजण्याचा आनंद घेतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -