Sunday, May 19, 2024
Homeदेशपहिल्याच दिवशी घेतले तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन

पहिल्याच दिवशी घेतले तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन

गर्दी नियंत्रणासाठी एटीएस कमांडो आणि आरएएफचे ८००० हून अधिक जवान तैनात

अयोध्या: देशावासियांचे तब्बल ५०० वर्षांचे स्वप्न २२ जानेवारीला पूर्ण झाले आणि रामलल्ला अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. त्यानंतर आता मंगळवारपासून हे मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहे. मंगळवारी पहाटेपासूनच रामभक्तांनी श्री राम मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अयोध्येत मंगळवारी सुमारे तीन लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले. तितक्याच संख्येने भाविक दर्शनाच्या प्रतीक्षेत असून, भाविकांना अखंड दर्शन मिळावे यासाठी स्थानिक प्रशासन सर्व व्यवस्था करत आहे.

अयोध्येतील श्री राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याने सर्व सीमा पुन्हा सील करण्यात आल्या आहेत. अयोध्येकडे कोणत्याही वाहनाला जाऊ दिले जात नाही. बांबूच्या खांबांसह ट्रॉली बॅरिअर्स लावून पोलीस कर्मचाऱ्यांसह निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. केवळ पासधारक, आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका, परीक्षार्थी, शेतकऱ्यांना डिझेल, पेट्रोल, दूध, भाजीपाला, गॅस सिलिंडर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने यांची तपासणी आणि खातरजमा केल्यानंतरच सोडण्यात येत आहेत.

दरम्यान, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. भाविकांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी ८००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. उत्तर प्रदेशचे प्रधान सचिव गृह संजय प्रसाद आणि पोलीस महासंचालक प्रशांत कुमार परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी राम मंदिरात उपस्थित आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. राम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीचे नियोजन न केल्याने योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांवर नाराज आहेत.

बाराबंकी पोलिसांनी अयोध्येत येणाऱ्या भाविकांना विनंती केली आहे की, काही वेळ थांबा, सध्या अयोध्येला येऊ नका. दरम्यान, अयोध्येत लोटलेला जनसागर पाहून पोलिसांनी अनेक ठिकाणी रस्ते वळवले आहेत. अनेक भागांमध्ये मोठी वाहतूक कोंडीही झाली आहे. सकाळी पोलिसांनी बॅरिकेट्स हटवल्यानंतर भक्तांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर गर्दी इतकी वाढत गेली की, पोलीस आता मर्यादित संख्येने आणि टप्प्याटप्याने भाविकांना मंदिर परिसरात सोडत आहेत.
श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या २ आठवडे आधी अयोध्येतील सर्व हॉटेल्समध्ये ८० टक्के बुकिंग झाले आहेत. येथील हॉटेलांमध्ये एक दिवस राहण्यासाठी पाच टक्के अधिक पैसे द्यावे लागत आहेत. काही आलिशान खोल्यांच्या किंमती १ लाखांपर्यंत गेल्या आहेत.

मंदिराबाहेर भक्तांची इतकी गर्दी जमली आहे की, अनेक ठिकाणी डिव्हाईडर तुटले आहेत, बेरिकेट्स मोडले आहेत. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिक पोलीस कुमक अयोध्येत बोलावण्यात आली आहे. पोलीस महासंचालक प्रशांत कूमार आणि प्रधान सचिव गृह संजय प्रसाद हेही राममंदिरात पोहचले. त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घेतली. परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक सुजीत पांडेय यांनादेखील सकाळी अयोध्येत यावे लागले. प्रचंड गर्दी पाहता इतर जिल्ह्यातून अयोध्येकडे येणाऱ्या मार्गांवरूनही वाहने थांबवली जात आहेत. अयोध्येतील प्रचंड गर्दी झाल्यामुळे भाविकांना दुसऱ्या दिवशी दर्शनाला येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गर्दी नियत्रंणासाठी पोलीसफाटा तैनात

पांडेय म्हणाले, सध्या परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी अधिक पोलीसफाटा तैनात करण्यात आला आहे. मंदिरातील वाढती गर्दी पाहून एटीएस आणि आरएएफच्या जवानांना रामलल्ला मंदिराच्या आत पाठवण्यात आले आहे. भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत कोणत्याही गोष्टी घडू नये म्हणून एटीएस कमांडो टीम आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांना मंदिरात तपासणी आणि सुरक्षेसाठी पाठवण्यात आले आहे.

वाहतुक मार्गात बदल

दरम्यान बाराबांकी पोलिसांनी गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अयोध्येतील अनेक मार्ग वळवण्यात आले आहेत. आता गर्दी कमी झाल्यानंतरच मार्ग पुन्हा होते तसे केले जातील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -