Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखWinter: यंदाचा हिवाळा असेल ऊबदार

Winter: यंदाचा हिवाळा असेल ऊबदार

डॉ. मुकुंद गायकवाड, कृषितज्ज्ञ

अल-निनोचा प्रभाव पडल्याचा परिणाम ऋतूचक्रावर झाला आहे. या वर्षी हिवाळ्यात थंडी कमी राहील, असा अंदाज गेल्या महिन्यात वर्तवला होता. आता तोच अंदाज हवामानाचा अभ्यास करणाऱ्या विविध देश-विदेशातील संस्थांनी दिला आहे. या हिवाळ्यात कडाक्याची थंडी फारच कमी पडणार असल्याने हुरळून जाण्याचे कारण नाही. त्याचा फटका पिकांना बसणार आहे. त्याचबरोबर येता उन्हाळाही कडक असणार आहे.

गेल्या फेब्रुवारीमध्येच अल-निनोचा प्रभाव भारतावर प्रतिकूल परिणाम करेल, असे अंदाज होते; परंतु भारतीय हवामान विभागाने सरासरीइतका पाऊस पडेल, असे सांगितले होते. या वर्षी बहुतांश लोकांचे हवामान अंदाज चुकले. त्यांना अल-निनोचा किती प्रभाव पडेल, याचा अंदाजच लावता आला नाही. भारतात या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. परतीचा पाऊस फक्त काही दिवस पडला. २८ ऑक्टोबरनंतर पाऊस पडेल, असे काही हवामानतज्ज्ञ सांगत होते; परंतु तेही तोंडावर पडले. वादळाने दिशा बदलल्याने पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. आता तर थंडी जाणवायला लागली आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा कसा असेल, याबाबत औत्सुक्य असणे स्वाभाविक आहे; परंतु हवामान बदलामुळे ऋतुचक्र पूर्वीसारखे राहिले नाही, हे आपण आता लक्षात घेतले पाहिजे. ऋतुचक्र एक तर पुढे सरकले आहे किंवा त्या त्या ऋतूमध्ये त्याची पूर्वीसारखी वैशिष्ट्ये दिसत नाहीत. या वेळी ‘अल-निनो’च्या स्थितीची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा आणि उन्हाळाही सरासरीपेक्षा जास्त उष्ण राहण्याचा अंदाज आहे. अल-निनोचे सुपर अल-निनोमध्ये रूपांतर झाल्यास पुढील मोसमी पावसाच्या हंगामावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील ‘नॅशनल ओशोनिक अँड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ने (नोआ) दिलेल्या माहितीनुसार ‘अल-निनो’ची स्थिती मे महिन्यापर्यंत तीव्र होण्याची ८० टक्के शक्यता आहे. ‘अल-निनो’ची स्थिती पुढील वर्षीही कायम राहून प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील तापमान सरासरीपेक्षा १.५ अंश सेल्सिअसने वाढण्याचा अंदाज आहे. त्यात आणखी भर पडून तापमान दोन अंश सेल्सिअसने वाढून तीव्र अल-निनोची तीव्र स्थिती निर्माण होण्याची ३० टक्के शक्यता आहे.

तीव्र अल-निनो म्हणजेच सुपर अल-निनोची स्थिती निर्माण झाल्यास उत्तर गोलार्धावर विपरीत परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने आजवरच्या निरीक्षणानुसार डिसेंबरपर्यंत अल-निनोची स्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याचा परिणाम म्हणून हिवाळा सरासरीपेक्षा उष्ण राहू शकतो. प्रशांत महासागरातील अल-निनोची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा आणि उन्हाळाही सरासरीपेक्षा जास्त उष्ण राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा प्रवाह कमजोर राहून, कोरडे, कमी बाष्पयुक्त वारे भारतात दाखल झाल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची भीती आहे.

यंदा अल-निनोमुळेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याचे आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सरासरीपेक्षा उष्ण राहण्यामागे अल-निनो हे प्रमुख कारण असल्याचेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. आता नोव्हेंबर महिना सुरू आहे. सामान्यतः याच वेळी उत्तर भारतात हिवाळा सुरू होतो. यंदा हलक्या थंडीने प्रवेश केला असला तरी आगामी काळात कडाक्याची थंडी पाहायला मिळण्याची शक्यता नाही. हवामानातील या बदलामध्ये अल निनोसारख्या जागतिक घटकांचा नक्कीच प्रभाव आहे. याशिवाय वायव्य मैदानी प्रदेशातील स्थानिक घटकही याला कारणीभूत आहेत. प्रदूषणाचा थंडीवर काही परिणाम होतो की नाही हेदेखील हवामानाच्या घटकांवर अवलंबून असते. वाऱ्याचा वेग हे प्रदूषणाचे कण विखुरण्याचे सर्वात मोठे कारण बनते. म्हणजेच वाऱ्याचा वेग कमी होताच प्रदूषणाचा परिणाम अधिक होतो.

हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय सांगतात, कोरड्या हंगामात प्रदूषणाच्या कणांचा तापमानात वाढ किंवा घट होण्यावर थेट परिणाम होत नसला तरी प्रदूषणासोबत आर्द्रता येते, तेव्हा मात्र त्याचा परिणाम दिसून येतो. म्हणजेच अशा स्थितीत वातावरणातून उष्णता बाहेर पडू शकत नाही आणि रात्री उष्णतेचे प्रमाण कायम राहते; परंतु या वेळी दिल्ली आणि परिसरात सकाळ वगळता आर्द्रता फारच कमी असते. किमान तापमान १५ अंशांपेक्षा कमी असायला हवे; ते १७ अंशांच्या दरम्यान राहते. हे वर्ष अल निनो वर्ष आहे. म्हणजे समुद्राचे तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. अल निनोचा प्रभाव पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षी थंडीचे प्रमाण आणि काळही कमी राहण्याची शक्यता आहे. परिणामी, डिसेंबर-जानेवारी या कमालीच्या थंड महिन्यांमध्येही थंडीचा कडाका कमी राहण्याचा अंदाज आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता दरवाजे ठोठावू शकते. येत्या काही दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्याच्या कोरड्या हवामानात बदल होण्याची शक्यता कमी आहे. अल निनो प्रभावी असतो, त्या वर्षी वेस्टर्न डिस्टर्बन्सही कमी होतात. एव्हाना दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी जाणवू लागली आहे. डिसेंबर ते जानेवारीमध्ये या भागात कडाक्याची थंडी असते; मात्र या वेळी तसे होणार नाही. भारतातील बहुतांश भागात डिसेंबरपर्यंत सामान्य हिवाळ्यापेक्षा जास्त उष्णतेची शक्यता आहे. ‘साऊथ एशियन क्लायमेट आऊटलुक फोरम’ने तसे म्हटले आहे.

भारतासह दक्षिण आशियातील बहुतांश भागांमध्ये कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त असण्याची सर्वाधिक शक्यता दर्शवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी, मध्य, वायव्य आणि ईशान्य भारत आणि द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील काही राज्ये आणि उत्तर भारतातील काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. वायव्य, मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये या वर्षी डिसेंबरपर्यंत हिवाळ्यात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर महिन्यात वायव्य भारतातील काही भाग वगळता, तापमान सामान्यपेक्षा जास्त होते. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग तसेच अल निनोचा प्रभाव. कोरड्या हवामानामुळे आणि मोसमात निरभ्र आकाश यामुळे मध्य भारतातील काही भागांमध्ये दिवसाचे तापमानदेखील जास्त असू शकते. या वेळी हिवाळा कमी काळाचा असेल आणि थंडीदेखील कमी असेल. ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम हिवाळ्यावर होईल. तीव्र थंडीदेखील एक-दोन दिवस टिकते. पूर्वी ती चार-पाच दिवस राहायची. अल निनोच्या प्रभावाचा अर्थ असा की यावेळी हिवाळा लवकर सुरू होईल. देशाच्या उत्तर भागात आता थंडी जाणवू लागली आहे.

जागतिक हवामान संघटना (डब्ल्यूएमओ) आणि अमेरिकन हवामान संस्था ‘नोवा’नुसार उत्तर गोलार्धात मे २०२४ पर्यंत अल निनो सक्रिय राहण्याची शक्यता ८५ टक्के आहे. या परिणामामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सध्या सरासरीपेक्षा १.३ अंशांनी जास्त आहे. फेब्रुवारी-एप्रिल २०१६ नंतर प्रथमच थंडीमध्ये समुद्राच्या तापमानात इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. भूविज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि हवामानशास्त्रज्ञ डॉ. माधवन नय्यर राजीवन यांनी ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्ट मॉडेल’चा हवाला देत सांगितले की, अल निनोमुळे येणारा हिवाळा फारसा थंड राहणार नाही. थंडीची लाट येण्यास कमी वाव आहे.

भारतीय हवामान खात्याने मात्र अद्याप हिवाळी हंगामाचा अंदाज जाहीर केलेला नाही. शीत ऋतूचा कालावधी ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’नंतर येतो. पर्वतीय थंड वारे मैदानी भागात पोहोचतात आणि आकाश पूर्णपणे गारठते, तेव्हा कडक हिवाळ्याची जाणीव होते; पण या वेळी बर्फवृष्टीदेखील सामान्यपेक्षा कमी असू शकते. सक्रिय आणि प्रभावशाली वेस्टर्न डिस्टर्बन्सची संख्या यंदा कमी राहील, असे तज्ज्ञ सांगत आहेत. नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान दर महिन्याला चार ते सहा वेस्टर्न डिस्टर्बन्स आहेत; जे यावेळी ३ किंवा ४ असू शकतात. ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्यांचे पॅटर्नही बदलत आहेत. त्याचा फटका हिवाळी हंगामातील गहू, हरभरा तसेच अन्य पिकांना बसण्याची शक्यता आहे. कमी थंडीचा विचार करून शेतकऱ्यानी आता कमी कालावधीत, कमी थंडीत येणाऱ्या वाणांची आतापासूनच निवड करायला हवी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -