Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीगृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये आता 'हे' बंधनकारक

गृहनिर्माण प्रकल्पाच्या जाहिरातींमध्ये आता ‘हे’ बंधनकारक

> महारेराने काढले परिपत्रक > फ्लॅटची सद्यस्थिती घरबसल्या पाहता येणार

मुंबई : आपल्या गृहनिर्माण प्रकल्पात जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यासाठी विकासक वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप यांसारखी समाजमाध्यमे आणि विविध माध्यमांमार्फत आपल्या प्रकल्पाच्या गुणवैशिष्ट्यांबद्दल जाहिराती करतात. या जाहिरातींमध्ये आता महारेराने काढलेल्या परिपत्रकानुसार एक गोष्ट बंधनकारक करण्यात आली आहे. कुठलेही माध्यम वापरुन केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये आता १ ऑगस्टपासून महारेरा क्रमांक आणि महारेरा वेबसाईटसोबतच क्यूआर कोडही ठळकपणे दर्शवणे, छापणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासाठी सर्व नोंदणीकृत असलेल्या जुन्या प्रकल्पांना महारेराने प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोड द्यायला सुरुवात केली आहे. तसेच मार्च महिन्याच्या अखेरपासून नव्याने नोंदणी करणार्‍या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांनाही नोंदणी पत्रासोबत महारेराकडून क्यूआर कोड देण्यात येत आहेत.

अनेकदा ग्राहकांना केवळ जाहिरातीतून प्रकल्पाविषयी संबंध तपशील मिळणे कठीण होते. मात्र क्यूआर कोडच्या सुविधेमुळे ग्राहकाला एका क्लिकवर संपूर्ण माहिती मिळवता येईल व निर्णय घेणे सोपे होईल. स्थावर मालमत्ता खरेदी करताना अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. क्यूआर कोडमुळे सर्व प्राथमिक माहिती म्हणजेच प्रकल्पाचे नाव, विकासकाचे नाव, प्रकल्प कधी नोंदवला गेला व कधी पूर्ण होणे अपेक्षित आहे, इमारतीमधील फ्लॅटची सद्यस्थिती, प्रकल्पाविरुद्ध काही तक्रारी आहेत का, प्रकल्पाच्या विविध मंजुऱ्या, प्रकल्प सुरु झाल्यानंतर प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यात काही बदल केला का, प्रकल्पाच्या नोंदणीचे नूतनीकरण केले का, असा सर्व तपशील मिळेल.

याशिवाय, रेरा कायद्यातील तरतुदींनुसार, विकासकांना दर ३ व ६ महिन्यांनी त्यांच्या वेबसाइटवरील माहिती विविध स्वरूपात अपडेट करावी लागते. यामध्ये फॉर्म ५ हा अतिशय महत्वाचा फॉर्म असून दरवर्षी प्रकल्पाच्या वेबसाइटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. यात या प्रकल्पाची सद्यस्थिती, एकूण खर्च आणि बाकीचे तपशील उपलब्ध होतात. हे सर्व आता क्यूआर कोडमुळे घरबसल्या सहज पाहता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -