Tuesday, May 21, 2024
Homeमहामुंबईबीएमसी निवडणुकीतील तिकिटासाठी होतेय दोन कोटींची मागणी

बीएमसी निवडणुकीतील तिकिटासाठी होतेय दोन कोटींची मागणी

> काळ्या पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्ये > कर्जतच्या फार्महाऊसमध्ये दडवल्यात २०००च्या नोटा...

नितेश राणे यांची उबाठा सेनेवर घणाघाती टीका

मुंबई (विशेष प्रतिनिधी): ‘आदित्य उद्धव ठाकरे यांच्या युवा सेनेच्या माध्यमातून बीएमसी निवडणुकीतील उमेदवारांना तिकीट देण्यासाठी दोन कोटींची मागणी करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी आजपर्यंत पैसे घेतल्याशिवाय कोणाला काहीही दिलेले नाही. आता त्यांचा मुलगा आदित्य ठाकरेही देखील तेच काम करतो’, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत केला. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून लीलावती हॉस्पिटलमधले किती डॉक्टर, किती वेळा मातोश्रीमध्ये ब्लडप्रेशर तपासायला गेले होते, असा सवाल त्यांनी केला. तसेच काळ्या पैशांचा सर्वात मोठा दलाल कलानगरमध्येच बसला आहे. त्यांच्या कर्जत फार्महाऊसच्या जमिनीखाली दोन हजारांच्या किती नोटा दडवल्या गेल्या आहेत याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

बीडमध्ये उबाठा सेनेची महाप्रबोधन यात्रा झाली. ही यात्रा उबाठा सेनेची होती की राष्ट्रवादीची, हेच समजले नाही. संध्याकाळची पाचची वेळ दिली होती. रात्री आठ वाजता सभा सुरू झाली. कार्यकर्ते फिरकले नाहीत. खुर्च्या रिकाम्या होत्या. स्थानिक आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना किती वेळा फोन केले गेले, याचा थांगपत्ता नाही. स्वतःला जागतिक नेते समजणारे दोन प्रवक्ते सभेला साधी गर्दीही जमवू शकले नाहीत आणि हेच नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करतात. पूर्वी बाळासाहेबांच्या सभेत सुधीर जोशी, लीलाधर डाके, प्रमोद नवलकर अशा तोफा होत्या. तेव्हा खऱ्या अर्थाने प्रबोधन होत होते. आता सोफा, एसीची वसुली करणारे, बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारे, आदित्य ठाकरेंना पेंग्विन म्हणणारे, मुलाला संपवून टाकू असे बोलणारे वक्ते भाषण करताहेत, असे ते म्हणाले.

हे संजय राजाराम राऊत कालच्या भाषणाच्या वेळेला किती शुद्धीत होते हे त्यांनाच माहीत. दोन नाईन्टी घेतल्याशिवाय हा माणूस बोलत नाही. भाषणाआधी यांची अल्कोहोल टेस्ट केली की सगळं काही स्पष्ट होईल. जो माणूस शुद्धीत भाषण करू शकत नाही, वसुलीशिवाय सभा घेऊ शकत नाही आणि पंतप्रधानांवर टीका करतो… अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान ज्यांना मानसन्मान देतात, जागतिक स्तरावर ज्यांची कीर्ती आहे, त्यांच्यावर टीका करताना यांना काही वाटत नाही. तुमच्या मालकाला साधे कलानगरमध्ये कोण ओळखत नाही. फुकट्यासारखे आयुष्य जगणारे, स्वतःच्या पैशाने साधे परफ्युम मारत नाहीत. पंतप्रधानांवर टीका करण्याची तुमची हिम्मत कशी होते, असा सवाल राणे यांनी केला.

कर्जतला जे फार्महाऊस आहे त्याची जमीन जेसीबीने खोदा. देशातल्या दोन हजार नोटांमधल्या अर्ध्या नोटा तिथे सापडतील. सुशांत सिंगच्या हत्येनंतर एका टीव्हीचा पत्रकार फार्महाऊसपर्यंत पोहोचला होता; परंतु त्याला नंतर अटक झाली. महाविकास आघाडीच्या काळात, पंचवीस वर्षे महापालिका लुटली त्या काळातले पैसे, सगळे तिथेच दडलेले आहेत. आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी रेटकार्ड निघाले आहे. युवा सेनेतून तिकीट पाहिजे असेल तर दोन कोटींचा रेट चालू आहे. ज्याने घाम गाळला, ज्यांनी निष्ठा दाखवली, त्यांना मानसन्मान नाही. त्यांना तिकीट नाही. उद्धव ठाकरेंनी जी प्रथा सुरू केली तीच प्रथा त्यांचा मुलगा आता युवा सेनेत राबवतोय, असेही ते म्हणाले.

मातोश्रीचा पोपट मेलेला आहे. हे सरकार टिकलेले आहे. हे जितके लवकर पचवाल तितकी तुमची तब्येत चांगली राहील. शिंदे सरकार २०२४ पर्यंत राहणार आणि नंतरही आम्हीच सत्तेत येणार. त्यामुळे कितीही बोंबललात तरी काहीही होणार नाही, हे लक्षात ठेवा असे त्यांनी सांगितले.

कर्जतच्या फार्महाऊसची चौकशी केली तर समजेल की मराठी माणसाला लुटून यांनी कुठे पैसा पुरून ठेवला ते. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आपापले एजंट नेमले आहेत. भाचा, मेव्हणा, सगळ्या माध्यमातून कामे होतात. वैभव चेंबर्समध्ये डिलिंग होतात. तुमचे मालक सर्वात जास्त ४२० आहेत, हे संजय राजाराम राऊत यांना माहीत नाही का? नालेसफाईपासून रस्त्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत यांनी पैसा खाल्ला. आता पारदर्शकपणे काम होत आहे. त्यामुळे घेतलेले पैसे परत द्यावे लागतील या भीतीने, मासे जसे पाण्याशिवाय तडफडतात तशी आता यांची फडफड चालू आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -