Tuesday, April 22, 2025
HomeकोकणरायगडKashedi tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण

Kashedi tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम ८० टक्के पूर्ण

४४१ कोटींचा प्रकल्प; मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक बाजू होणार खुली

अलिबाग (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे (Kashedi tunnel) काम ८० टक्के पूर्ण झाले असून येत्या मार्च अखेरपर्यंत बोगद्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

सद्यस्थितीत बोगद्याचे जोडरस्ते आणि अंतर्गत रस्त्याचे काम शिल्लक असून, अल्पावधीत हे काम पूर्ण करून स्थानिकांसह पर्यटकांना कशेडी बोगदा या वर्षीच्या उन्हाळ्यात खुला होणार आहे. बोगद्याचे काम पूर्णत्वास जाताच कशेडी घाट वाहनाने अवघ्या ४५ मिनिटांत पार होणार असून रत्नागिरी ते रायगड जिल्ह्याशी अवघ्या दीड मिनिटात जोडला जाईल. तब्बल ४४१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मुंबई-गोवा महामार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई अधिक जवळ येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेला कशेडी बोगदा होय. चौपदरीकरणाच्या कामांतर्गत या बोगद्याचे काम २०१९ मध्ये सुरू झाले. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून, जोडरस्त्यावरील सर्व पूल, खोदकाम आणि बोगदे पूर्ण झाले आहेत. फक्त जोडरस्ते व अंतर्गत रस्ते करून बोगद्याच्या आतील काम करणे शिल्लक आहे. त्यामुळे येत्या मार्चअखेर कशेडी बोगद्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होणार आहे.

कशेडी घाटाला पर्याय म्हणून रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून दोन बोगदे खोदण्यात आले आहेत. दोन्ही बोगद्यांचे काम दोन्ही बाजूने पूर्ण झाले असून, केवळ अंतर्गत काही कामे शिल्लक आहेत, तर बोगद्याला जोडरस्ते आणि अंतर्गत रस्ते झाल्यानंतर हा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. दोन्ही बोगदे मनुष्यबळाचा वापर न करता बुमर मशिनने खोदण्यात आले आहेत. बोगद्याच्या अंतर्गत काँक्रिटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, उर्वरित कामेही मार्गी लागणार आहेत. दोन किलोमीटरचे दोन बोगदे तयार झाले असून, प्रत्येक बोगदा तीन लेन्सचा आहे. याशिवाय अपघातकालीन परिस्थितीत एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी सहा मार्ग तयार करण्यात आले आहेत. तसेच बोगद्यात एखादे वाहन बंद पडल्यास त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी चार ठिकाणी अधिकच्या जागा तयार करण्यात आल्या आहेत. हा बोगदा वाहतुकीस खुला झाल्यानंतर ८० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालविता येऊ शकतात. जो कशेडी घाट पार करण्यासाठी दीड ते पावणेदोन तास लागतात. त्याऐवजी अवघ्या ४५ मिनिटांत हा घाट पार करता येणार आहे.

Shraddha Walker : श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला लागले १० तास

कशेडी बोगद्याला जोडणारे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अजूनही सुरू झालेले नाही. मात्र या दरम्यानचे पाच मोठे पूल, दहा मोऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काँक्रीटचा रस्ता उर्वरित कालावधीत पूर्ण करणे सहज शक्य आहे. त्या दृष्टीने संबंधित यंत्रणाही कामाला लागलेली आहे. हा बोगदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेला असून, बुमर मशीनच्या साह्याने खोदण्यात आला आहे. बोगदा खोदण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करण्यात आलेला नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना न घडता बोगद्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. एका बोगद्यात एका वेळी तीन वाहने तीन लेनमधून जाऊ शकणार आहेत, तसेच वायुविजनासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. बोगद्यात अपघात झाल्यास तत्काळ संपर्क होण्यासाठी ‘एसओएस’ यंत्रणाही उभारण्यात येणार आहे. बोगद्यात जागोजागी फायर फायटिंग यंत्रणाही असेल. अंतर्गत पाण्याचे वहन करण्यासाठी ड्रेनेज यंत्रणा, एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी सहा ठिकाणी जोडमार्ग, विजेची व्यवस्था, अपघात झाल्यास चार ठिकाणी जादा स्पेस आहे, अशा अद्ययावत तंत्रज्ञानाने हा बोगदा तयार होणार आहे.

इंधनसह वेळ आणि पैसाही वाचणार

कशेडी घाट हा मुंबई-गोवा महामार्गातील एक खडतर घाट म्हणून ओळखला जातो. दर वर्षी या घाटात अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत. तसेच वाहनांचीही मोठी हानी झालेली आहे. मात्र, आता कशेडी बोगद्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्हा अवघ्या दीड मिनिटांत जोडला जाणार आहे. कशेडी ते भोगाव हे सद्यस्थितीतील अंतर १३ किलोमीटरपर्यंत आहे. बोगद्यामुळे चार किलोमीटरने अंतर कमी होणार असले, तरी प्रत्यक्षात लहान वाहनांसाठी ४५ मिनिटे, तर मोठ्या वाहनांसाठी एक ते दीड तासाचा वेळ वाचणार आहे. तसेच कशेडी घाटातील अवघड वळणे, चढ न लागता सरळ मार्ग उपलब्ध होणार असून यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि पैशाची बचत देखील होणार आहे.

मलेशियन तंत्रज्ञानाने दोन पुलांचे बांधकाम

कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या जड रस्त्यांमध्ये दोन पूल हे मलेशियन तंत्रज्ञानाने उभारले जात आहेत. या पुलाच्या गर्डरसाठी यू. एच. पी. एफ. आर. सी. हे तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे गर्डर तयार करून ते पिलरवर बसविले जाणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल अवघ्या एक महिन्यात तयार होऊ शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -