Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखखलनायक लष्करशहा

खलनायक लष्करशहा

कोणत्याही लष्करशहाचा शेवट त्याच्याच सैनिकांनी पुकारलेले बंड अन्यथा युद्धात होत असतो. अगदी जर्मनीचा चान्सलर हिटलरपासून ते अगदी लिबियाचा कर्नल गद्दाफी (हा नेहमी महिला सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राहात असे) व्हाया अन्वर सादातपर्यंत हुकूमशहांचा शेवट अगदी असाच झाला आहे. पण पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचा अपवाद करावा लागेल. अर्थात त्यांनाही त्यांच्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होतीच. पण त्यांनी परदेशात राजकीय आसरा घेतला आणि रविवारी त्यांचे आजाराने निधन झाले. मुशर्रफ यांच्या निधनाने भारताला वाईट वाटण्याचे जराही कारण नाही. कारण, भारतावर कारगील युद्ध लादण्याचे पाप करणारा सर्वात दुष्ट आणि भारतद्वेष्टा खलनायक मुशर्रफ हाच होता.

नवाझ शरीफ यांना शह देऊन त्याने पाकिस्तानची सत्ता आपल्या हाती घेतली ती २००१ मध्ये. पण तत्पूर्वी १९९९ मध्ये कारगीलमध्ये पाकिस्तानी सैनिकांना घुसवून भारतावर एक अकारण युद्ध लादणारा हुकूमशहा म्हणून त्याची नोंद इतिहास घेईलच. त्यात भारतीय सैन्याला अकारण आपल्या काही सैनिकांच्या प्राणांचे मोल द्यावे लागले. अर्थात नंतर भारताने दिलेल्या जबरदस्त उत्तरात पाकिस्तान पुरता उद्ध्वस्त झाला आणि नवाझ शरीफ यांना भारतासमोर गुडघे टेकून शरणागती पत्करावी लागली. तेव्हा मुशर्रफ यांनी सत्ता हातात घेऊन शरीफ यांना देशोधडीला लावले. पण वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यानंतर मुशर्रफ यांच्यावर अमेरिकेने भारताशी शांतता वाटाघाटी करण्यासाठी प्रचंड दबाव आणला. अगदी सीनियर जॉर्ज बुश यांनी तर पाकिस्तानवर अणुबाॅम्ब टाकण्याची धमकी दिली. तेव्हा हा मुजोर लष्करशहा भारताशी वाटाघाटी करण्यास तयार झाला. अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही, हा भाग वेगळा आहे. पण मुशर्रफ यांच्या काळापासून पाकिस्तानची जी अधोगती सुरू झाली, ती आजही थांबलेली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांची बस

डिप्लोमसी याच काळात झाली पण ती व्यर्थ ठरली. पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले. २००८ मध्ये मुंबईवर भयानक दहशतवादी हल्ला पाकिस्तानच्या मांडीवर बसून दहशतवाद्यांनी घडवला आणि तेव्हापासून भारत-पाकिस्तान संबंध कमालीचे बिघडले. मुशर्रफ यांच्या लष्करातील सहयोगी त्यांना शूर, धाडसी आणि स्पष्टवक्ता असे समजून त्यांचे कौतुक करत. पण मुशर्रफ यांच्याच काळात पाकिस्तान कित्येक दशके मागे रेटला गेला. असेच नुकसान पाकिस्तानचे मागे एकदा याह्या खान यांनी केले होते. त्यांच्या दुस्साहसामुळे तर पाकिस्तानचे तुकडे झाले. आज पाकिस्तान जो कंगालीच्या अवस्थेला पोहोचला आहे, त्याला पाकिस्तानातील वेळोवेळी आलेल्या हुकूमशहांच्या राजवटीच कारण आहेत. लोकशाहीतच देशाची प्रगती होऊ शकते, हे तत्त्व या हुकूमशहांनी पाकिस्तानला भारतावर विजय मिळवण्याचे स्वप्न दाखवून पटूच दिले नाही. त्यातच पाकिस्तानची अधोगती झाली.

वास्तविक मुशर्रफ यांनी जेव्हा बंड करून सत्ता हस्तगत केली, तेव्हा त्यांना पाकिस्तानला प्रगतीकडे नेण्याची एक फार मोठी संधी नियतीने दिली होती. पण ती आपल्या नादानपणामुळे दवडली आणि पाकिस्तान चीन आणि भारताप्रमाणे विकासाची फळे लुटू शकला नाही. भारत आणि चीनने जेव्हा उदारीकरणाची फळे चाखण्यास सुरुवात केली, तेव्हा पाकिस्तान अद्यापही मध्ययुगीन विचार आणि मागासलेपणात चाचपडत होता. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी सारी सुखे भोगत असताना जनता मात्र गरिबीच्या खाईत तडफडत होती. पण तिला तसेच तडफडत ठेवण्यात आले. पाकिस्तानी लष्करी अधिकारी मात्र कराचीच्या अालिशान भागात प्रचंड ऐषोरामी बंगल्यात अय्याशी करत होते आणि त्यांच्यासाठी मादक ललना आणि उंची मद्याचे पूर वाहत असत. त्यात हेरगिरीही होत असे आणि लष्कराची गुपिते मादक ललनांच्या माध्यमातून शत्रुराष्ट्राला विकली जात. यात जराही अतिशयोक्ती नाही. जनता असंतोष व्यक्त करेल, असे दिसले की, मग लष्कर भारताविरोधात सैनिकी कारवाई करत आणि भारताला कसे हरवले आहे, वगैरेच्या कपोलकल्पित कहाण्या त्यांच्या देशात रंगवून सांगत. या सर्वांचे म्होरके होते मुशर्रफ. पाकिस्तान या काळात मालामाल झाला. पण त्यात मुशर्रफ यांचा द्रष्टेपणा कारण नव्हता, तर दहशतवादाविरोधात अमेरिका जागतिक युद्ध लढत होती आणि त्यासाठी पाकिस्तानची मित्र म्हणून तिला मदत हवी होती. त्यामुळे अमेरिका पाकिस्तानात डॉलर्स ओतत होती. नंतर ते युद्ध संपले आणि ओसामाच्या खात्म्यानंतर, तर पाकिस्तानची आवश्यकताच संपली. त्यामुळे नंतर अमेरिकेने आपली मदत थांबवली आणि म्हणून पाकिस्तान आज कंगाल झाला आहे. मुशर्रफ जरी अमेरिकेच्या दबावामुळे भारताशी चर्चा करण्यास तयार झाले तरीही चर्चेच्या मध्यरात्री आपल्या मायदेशी अंधारात निघून गेले.

मुशर्रफ यांनीच कश्मीरमधील दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने तयार केले आहे, याची कबुली सातत्याने दिली. मुशर्रफ यांच्या कबुलीजबाबाकडे पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा पुरावा म्हणून वापर करता आला असता. पण तेव्हा देशात काँग्रेसचे ढिसाळ आणि पुचाट सरकार होते. देशातील कोणत्याही साधनसंपत्तीवर पहिला हक्क अल्पसंख्याकांचा आहे, असा युक्तिवाद करणारे मनमोहन सिंग यांच्यासारखा मवाळ नेता तेव्हा सत्ताधीश होता. त्यामुळे असे काही होणे शक्यच नव्हते. आजही काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी मुशर्रफ यांना शांततेसाठी काम करणारा अशी बिरुदावली लावली आहे. त्यांना इतिहास माहीत नाही किंवा काँग्रेसवाले मुद्दाम इतिहास चुकीचा देण्याचे प्रयत्न करतात. जो नेता स्वतःच लोकनियुक्त सरकार पाडून सत्ताधीश होतो, त्याला शांततेसाठी काम करणारा नेता असे म्हणणे म्हणजे नादानपणाची परिसीमा आहे. पण काँग्रेस नेते ते वारंवार करत असतात. अल्पसंख्याकांची मते मिळवण्यासाठी तो एक फंडा असतो. ते असो. पण मुशर्रफ यांच्या निधनामुळे भारताचा एक शत्रू काळाच्या पडद्याआड गेला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -