Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखइंडिया आघाडीला लागला सुरुंग

इंडिया आघाडीला लागला सुरुंग

देशातीलच नव्हे, तर जगभरात ज्यांचा दबदबा सतत वाढत आहे असे महाशक्तीशाली नेते, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा सर्वव्यापी असा भक्कम पक्ष भाजपा यांना कमकुवत करण्यासाठी, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षप्रणीत एनडीए आघाडीला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट करून इंडिया आघाडीची स्थापना केली. देशातील सर्वात जुना आणि राष्ट्रव्यापी (?) पक्ष काँग्रेसच्या पुढाकाराने मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, या एकाच विचाराने आघाडी तयार करण्यासाठी विविध पक्षांच्या अनेक बैठका झाल्या. एनडीएच्या विरोधात पर्यायाची घोषणा करण्यात आली. देशभरात भाजपाविरोधी वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला. मात्र त्याचा ठोस परिणाम निघाला नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत होता. मात्र आता या आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वीच जागावाटपावरून इंडिया आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्रित लढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद आहेत. पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि केरळसह अनेक राज्यांमधील या घटक पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. शिवाय पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंजाबमध्ये ‘आप’ने निवडणूक एकट्याने लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडिया आघाडीसाठी सर्वांत कठीण परिस्थिती ही पश्चिम बंगालमध्ये आहे. काँग्रेसपासून तयार झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला फक्त दोनच जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला व काँग्रेसची सध्याची औकात काय आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, असे म्हणायला हरकत नाही. तथापि काँग्रेसने मात्र हा प्रस्ताव फेटाळला असून, अधीर रंजन चौधरी यांनी या प्रस्तावावरून ममता बॅनर्जी यांच्यावरच तोफ डागली. त्यातूनच नंतर तृणमूल काँग्रेसने ‘एकाला चलो रे’चा नारा दिला.

विशेष म्हणजे डाव्यांचा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यांच्या पक्षाचा पायाच डाव्यांना विरोध हा आहे. कम्युनिस्ट पक्षांचे कुशासन, भ्रष्टाचार आणि हिंसाचार याविरोधात ममता बॅनर्जी निडरपणे रस्त्यावर उतरल्या होत्या. असे असताना लोकसभा निवडणुकीत त्याच डाव्यांसोबत जनतेसमोर कसे जायचे, हाही तृणमूलसमोरचा अवघड प्रश्न आहे. कारण जनतेला याचे उत्तर द्यावे लागेल की, ज्यांच्या विरोधात एवढी वर्षे लढलो आता त्यांच्याच सोबत जाण्याची वेळ का आली आहे. पुन्हा विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबतच दोन हात करायचे आहेत. त्यामुळे तृणमूलला लोकसभेत डाव्यांसोबत एकत्र लढणे शक्य नसल्यामुळेच ममतांनी ‘एकला चलो रे’चा निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी या प्रत्यक्ष बाहेर पडल्या नसल्या तरी त्यांनी सवता सुभा मांडल्यामुळे, इंडिया आघाडी काहीशी कमकुवत झाल्याचे दिसत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही (आप) स्वतंत्र लढण्याची मनीषा व्यक्त केल्याने आधीच डळमळीत झालेल्या या आघाडीचे मुख्य नेते व नियोजक नितीशकुमार यांनीच १८० अंशांची जबरदस्त गिरकी घेत भाजपाप्रणीत एनडीएमध्ये सामील होण्याचा अचानक निर्णय घेतल्याने या आघाडीला जणू सुरुंगच लागला आहे.

तसेच उत्तर प्रदेशातही अखिलेश यादव यांनी काँग्रेसला नेमकी परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगितल्यामुळे हा पक्ष नाराज झाला आहे. सध्याची ही परिस्थिती पाहता विरोधकांची ही इंडिया आघाडी आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुटणार असल्याचे दिसत आहे. त्यामागचे मूळ कारण असे होते की, ज्या राज्यांत आपला जनमानस गमावला होता, त्या राज्यांतील स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला आपली ताकद वाढवायची होती. पण लोकसभा निवडणुकांआधी जागा वाटपांवरून या बहुपक्षीय आघाडीत मतभेद होण्याची शक्यता असल्याचे भाकीत राजकीय विश्लेषकांकडून अनेकदा वर्तविण्यात आले होते. तथापि आता पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांनी घेतलेल्या वेगळ्या निर्णयांनंतर आता आघाडीत राहिलेल्या इतर पक्षांच्या भूमिकेत काय बदल होणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल, तर जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला यांनीही इंडिया आघाडीबाबत स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

अद्यापही वेळ गेलेली नाही. मात्र जागावाटपावर जर एकमत झाले नाही, तर इंडिया आघाडीचे काही खरे नाही, असा इशाराच फारुक अब्दुल्ला यांनी दिला आहे, तर महाराष्ट्रात इंडिया आघाडीत येऊ पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीलाही अद्याप निमंत्रण देण्यात आलेले नाही आणि स्थानही देण्यात आलेले नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत समाविष्ट होण्यास इच्छुक असलेल्या वंचितनेही नाराजीचा सूर लावला आहे. विरोधकांच्या मते एकाधिकारशाही म्हणजेच हुकूमशाही गाजविणारे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या दडपशाहीच्या विरोधात विरोधकांनी एकजूट करीत, इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र ही इंडिया आघाडी सुरुवातीपासूनच नाराजीच्या ग्रहणाने ग्रासलेली होती. इंडिया आघाडीतील काही नेते हे नेतृत्वावरून तसेच इंडिया आघाडीत मिळणाऱ्या मानावरून वरचेवर नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. लोकसभा निवडणुकांसाठी आता अगदीच कमी कालावधी आहे. त्यामुळे जागावाटप जर लवकर झाले नाही, तर इंडिया आघाडीसाठी हा मोठा धोका ठरू शकेल. इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये याबाबत लवकरच एकमत झाले नाही, ते पक्ष स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि असे झाले तर इंडिया आघाडीसाठी तो कपाळमोक्ष ठरू शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -