Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणरायगडमध्ये ‘लालपरी’ची सेवा अद्यापही ठप्पच

रायगडमध्ये ‘लालपरी’ची सेवा अद्यापही ठप्पच

पेण (वार्ताहर) : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणासह महागाई भत्ता, घरभत्ता या मागण्यांसाठी गेल्या सोमवारपासून सुरू झालेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने रायगड जिल्ह्यातील ‘लालपरी’ची सेवा सलग आठव्या दिवशी ठप्प झाली आहे.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर संपाचे हत्यार उगारले आहे. यातील महागाई भत्ता, घरभत्ता या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण या मागणीवर कोणताही निर्णय न झाल्याने या मागणीसाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या संपात रायगड विभागातील सर्व कर्मचारी विशेषतः चालक व वाहक आदी सर्व सामील झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात गावोगावी फिरणारी व लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लालपरी’ची सेवा गेल्या सोमवारपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. संपाचा आठवा दिवस असून राज्य सरकार व कर्मचारी यांच्यात अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

रायगड विभागाचे २ कोटी ८० लाखांचे नुकसान

रायगड विभागात असणाऱ्या पेण, माणगांव, अलिबाग, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, कर्जत, महाड या आठही आगारातील सर्वच कर्मचारी संपामध्ये सामील झाले आहेत. यामुळे रायगड विभागाला दिवसाला मिळणारे सुमारे ३५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून आता पर्यंत २ कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

रायगड विभागातील महाड, श्रीवर्धन, पेण, माणगांव, अलिबाग, मुरुड, कर्जत, रोहा या आठ आगारात १८४१ कर्मचारी काम करत आहेत. त्यामध्ये ५०३ वाहक, ४९३ चालक असून १९ वर्ग दोनचे अधिकारी व ८०६ प्रशासकीय तसेच कार्यशाळा कर्मचारी काम करत आहेत. यातील आगारातील वाहक व चालक यांच्याबरोबर इतर असे सुमारे जवळपास सर्वच कर्मचारी संपात सामील झाले आहेत. रायगड परिवहन विभागाचे मुख्यालय असलेल्या रामवाडी (पेण) येथील मुख्य कार्यालयातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ १५ टक्के असलेले अधिकारी वर्ग कामावर हजर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -