Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकिल्ले रायगडावरील गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार

किल्ले रायगडावरील गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार

स्थानिकांनी सर्व भाषा आत्मसात करण्याची गरज

संजय भुवड

महाड : हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाच्या जतन व संवर्धनाचे काम रायगड प्राधिकरण व पुरातत्त्व विभागाकडून सुरू आहे. येणाऱ्या चार ते पाच वर्षांत किल्ले रायगडाचे चित्र पूर्णपणे पालटणार असून गडाला पूर्वीचे वैभव प्राप्त होणार आहे. त्यामुळे ३५० वर्षांपूर्वी किल्ले रायगडावर असणारे वैभव ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक, शिवभक्त येणार असल्याने त्यांना रायगडावरील वैभवाची माहिती देण्यासाठी सर्व भाषांची जाण असणाऱ्या गाईड्सची आवश्यकता भासणार आहे.

आजमितीला येथील स्थानिक तरुण या व्यवसायावर आपली उपजिवीका चालवत आहेत, मात्र परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत रायगड समजावून सांगण्यासाठी स्थानिक तरुणांना सर्व भाषांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी येथील तरुणांनी उच्चशिक्षण घेऊन या व्यवसायात आपले करिअर करावे, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहेत.

किल्ले रायगडावर पिढ्यान् पिढ्या राहणाऱ्या कुटुंबातील तरुण व रायगडाच्या आसपासचे गावांतील तरुण गाईडचा व्यवसाय करताना दिसत आहेत. मात्र केवळ ७वी ते ८वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते या व्यवसायामधून मिळणाऱ्या रोजगारावर समाधान मानत आहेत. केवळ मराठी आणि मोडक्या-तोडक्या हिंदीत हे स्थानिक गाईड पर्यटकांना माहिती देत असतात. मात्र परदेशातून किल्ले रायगड जाणून घेण्यासाठी येणारे पर्यटक मुंबई-पुण्याहून सोबत गाईड घेऊन येत असतात.

स्थानिक गाइड्सची संख्या अधिक होणार

आजमितीला किल्ले रायगडावर दर आठवड्याला येणाऱ्या पर्यटकांची संख्या ५० ते ६० हजारांवर असून संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर या संख्येत फार मोठी वाढ होणार आहे. नव्याने साकारल्या जाणाऱ्या रायगडाचे रूप व त्यावरील ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना रायगडाची माहिती सांगण्यासाठी गाईड्सचीही मोठ्या संख्येने गरज लागणार आहे. पुढील चार-पाच वर्षांत गाईड व्यवसायाची व्याप्ती वाढणार असून स्थानिक तरुणांनी उच्च शिक्षणासोबत सर्व भाषा आत्मसात करून येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या भाषेत रायगडची माहिती सांगितल्यास त्याचा फायदा होऊन त्यांच्या उत्कर्षाला हातभार लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -