Friday, May 17, 2024
Homeरविवार विशेषप्रतिसादच महत्त्वाचा

प्रतिसादच महत्त्वाचा

ध्वनी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. या ध्वनीमुळेच संवेदना जागृत होतात. या ध्वनीमुळेच वातावरणात चैतन्य निर्माण होतं. सळसळणारी पानं, पक्ष्यांचा गुंजारव, प्राण्यांचे आवाज, मनुष्यांची अखंड बडबड, यंत्रगाड्या अशांसारख्या असंख्य गोष्टींचे आवाज सगळीकडे भरून राहिले आहेत आणि हाच ध्वनी वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आजूबाजूला वावरत असतो. या ध्वनीमध्ये रागदारीचे संगीत असते, रॅप असतो, रॉक असतो, एखादं हळुवार भावगीत असतं, भक्तीची वाट दाखवणारे टाळ मृदंग असतात. अगदी युद्धभूमीवर त्वेशाने भिडणाऱ्या तलवारी, धुडूम फुटणारे रणगाडे, रायफली, बॉम्ब असे कितीतरी प्रकारचे आवाज असतात. या सगळ्याला एक ध्वनी आहे. ध्वनीमध्ये समुद्राची गाज आहे, वाऱ्याचा वेग आहे, ढगांचा गडगडाट आहे, अगदी अंतरिक्षातसुद्धा हाच ध्वनी आहे. इतकं या ध्वनीला महत्त्व आहे. हा ध्वनी पृथ्वीच्या निर्मणापासून आहेच, मनुष्याच्या निर्मितीपासून आहे. या ध्वनीला हळूहळू शब्द मिळत केले आणि ध्वनीचे महत्त्व वाढत गेलं. संवाद वाढला. मनुष्य बोलू लागला. संवाद साधू लागला. एकाशी बोलताना दुसऱ्याकडून तेच बोलण्याची अपेक्षा व्यक्त करू लागला. म्हणजेच सादाला प्रतिसादाची अपेक्षा करू लागला आणि हळूहळू या सादापेक्षाही प्रतिसादाचे महत्त्व वाढू लागलं. एक माणूस अखंड बोलत असला तरीसुद्धा त्याला बोलताना प्रतिसादाची अपेक्षा असतेच. अगदी शाळेत महाविद्यालयातसुद्धा शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवताना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद अपेक्षित असतोच.

प्रतिसादच आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. हा मिळालाच नाही, तर आपलं आयुष्य एकसुरी होऊन जाईल. संवाद संपेल. पण गेल्या काही काळामध्ये हा प्रतिसाद हरवतोय का किंवा त्याचं महत्त्व कमी झालंय का किंवा या प्रतिसादचं महत्त्व मनुष्याला समजलंच नाही का, असे वाटणारे चित्र निर्माण झाले आहे. सोशल मीडियाच्या या मायाजालापूर्वी मनुष्य सहज वावरत होता. त्याच्याकडे संवाद या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. त्यामुळे गप्पाटप्पा मारताना, अगदी भांडण, रुसवे-फुगवे, मारामाऱ्यांपासून सगळ्यांमध्ये सादाला प्रतिसाद मिळत असे. आता मात्र सोशल मीडियाचे मायाजाल अधिक गडद होऊ लागले आहे. मनुष्य त्यात गुरफटू लागला आहे. आता माणसं प्रत्यक्ष संवादापेक्षा सोशल मीडियावरच्या वेगवेगळ्या चॅटिंग ॲप्समधून बोलू लागलेत. एखाद्या सार्वजनिक ठिकाणचे चित्र पाहिलं, तर ही गोष्ट अधिक निराश करणारी आहे. अशा अनेक ठिकाणी एकमेकांच्या शेजारी बसलेली माणसं आपल्याच सोशल मीडियाच्या मायाजालात गुरफटलेली दिसतात. जगाच्या एका टोकवर असलेल्या कुणाशीतरी ते बोलत असतील, पण शेजारी बसलेल्या एखाद्या आजोबांकडून, आजीकडून तिच्याकडच्या आठवणीच्या गाठोड्यातून काही आपल्यासाठी घ्यायला वेळ नसतो. एखाद्या आईच्या मांडीवर निरागसपणे खेळणाऱ्या निष्पाप बाळाच्या कृष्णालीला बघून स्वर्गीय आनंद घेताना दिसत नाहीत. आनंदाच्या क्षणाने आपल्याला याच रूपाने साद घातलेली असते. पण अशाला अनेकांकडून प्रतिसादच मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते आहे.

या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात, पण त्याला आपापल्या पद्धतीने आपण प्रतिसाद देणे हरवू लागलो की काय, असं आता वाटू लागले आहे. सोशल मीडिया आल्यापासून, चॅटिंगचे ॲप्स आल्यापासून प्रतिसादाची ही उणीव मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा असूदेत, गुड मॉर्निंगचे मेसेजेस असू दे की, एखाद्याच्या मृत्यूनंतर श्रद्धांजली वाहणारे शब्द असू देत, हे सगळेच शब्द आता सोशल मीडियावरून पाठवले जातात. आता प्रत्यक्ष बोलणं, एखाद्याला वाढदिवसाच्या दिवशी सकाळी फोन करून त्याला आनंदाने शुभेच्छा देऊन त्याच्या आनंदात सहभागी होणं किंवा एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाइकांशी फोनवर का होईना, पण बोलून त्याचे दुःख हलकं करण्याची एक जी भावना होती ती जणू संपलीय की काय असं वाटू लागले आहे. त्यातच चॅटिंगमुळे अनेक लोकांशी एकाच वेळेला बोलता येत असल्यामुळे आलेल्या मेसेजना प्रतिसाद देण्याच्या प्रायोरिटीज बदलून गेल्या आहेत. ज्या आईसाठी तिचं मुलं तिचं विश्व आहे, त्या मुलाच्या प्रतिसादच्या यादीत सगळ्यात शेवटी आईचं नाव येतं, एखादी आई लांब राहणाऱ्या मुलाला ‘जेवलास का रे?’ असा मेसेज व्हॉट्सअॅप वर पाठवते, त्यासाठी ती माऊली तिच्या उतरवयातसुद्धा जिद्दीने सोशल मीडिया वापरायला शिकते आणि मुलाकडून फक्त ‘होय आई मी जेवलो,’ एवढ्याच प्रतिसादाची अपेक्षा करत असते. पण आपल्याच विश्वात रमणाऱ्या या मुलाला आपल्या आईच्या चॅटिंगला रिप्लाय द्यायलासुद्धा वेळ मिळत नाही. प्रतिसाद त्याच्याकडून येत नाही आणि ती बिचारी आई त्या एकाच शब्दाच्या प्रतिसादाची अपेक्षा करत राहते, तशीच निराश मनाने केव्हातरी जाऊन झोपी जाते.

असे किती प्रसंग, अशा किती गोष्टी आहेत की, एका शब्दाच्या प्रतिसादावर सहज सोप्या होऊ शकतात. एक शब्द कधी कधी खूप महत्त्वाचा असतो. प्रतिसादाचा एक शब्द सुद्धा कितीतरी गोष्टी सहज आणि सोप्या करून जातो. प्रतिसाद हा ‘सादा’पेक्षाही महत्त्वाचा आहे. प्रतिसादाची अपेक्षा असेल, तरच कोणीतरी साद घालणारा असतो. जर समोरच्याकडून प्रतिसादच मिळणार नसेल तरी साद घालणारे असतात. पण जेव्हा ही अपेक्षा संपते तेव्हा आपल्याला साथ देणारा, आपल्याला साद घालणारा आपला साथीदार केव्हाच दूर होऊन जातो आणि खऱ्या अर्थाने आपण एकटे होतो.

खरं तर किती वेळ लागतो एका छोट्या रिप्लायला. सध्या तरी चॅटिंगच्या विश्वात चिन्हांकित मेसेज चिन्हांकित भाषा पुन्हा आली आहे. अंगठे उलटे सुलटे करून, बाण दाखवून, चित्र दाखवूनसुद्धा आता प्रतिसाद देता येऊ शकतो, इतकं सोपं झालंय. खूप पूर्वी जेव्हा भाषा मनुष्य शिकत होता, तेव्हा या चित्रलिपी निर्माण झाल्या होत्या. त्यातून तो बोलत होता. आता तेच सगळं पुन्हा सोशल मीडियावर आलं आहे. पण तोही रिप्लाय देण्याचा कधी कधी अनेकांना वेळ मिळत नाही. वास्तविक प्रायोरिटीज ठरवताना आपलं कुटुंब, आपल्यावर नितांत प्रेम करणारी, आपली माणसं, आपली काळजी घेणारी आपली माणसं, यांना प्रायोरिटी दिली पाहिजे. कुणाला कसा प्रतिसाद द्यायचा, अशी प्रायोरिटी ठरलीच पाहिजे. अशा वेळेला आपल्या माणसांचं स्थान हे नेहमीच वरचं असलं पाहिजे. कारण तीच माणसं सच्ची असतात, खरी असतात. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेनेच ते साद घालत असतात. ही माणसं लांब गेली की, अशी आपली आपुलकीची माणसं मिळत नाहीत. व्यवहाराची भाषा करणारे, व्यवहारापुरता संवाद साधणारी माणसं हे तत्कालिक असतात. त्यांचा काम संपलं की ते निघून जातात. म्हणून अनेक तास ‘आई जेवलो’ अशा एखाद्या शब्दासाठी वाट बघणारी आई, ‘नीट पोहोचलो’ या शब्दासाठी ताटकळलेली बायको, ‘हो चॉकलेट आणतो’ची वाट बघणारी मुलगी, असे कितीतरीजण प्रतिसादाची अपेक्षा करत असतात. त्या निर्व्याज्य, निष्पाप असतात. त्यानं अवश्य प्रतिसाद दिलाच पाहिजे. नाहीतर एका मायाजालात आपण कधी गुरफटू आणि आपलं जग कधी विसरू, हे सांगता येणार नाही.

-अनघा निकम-मगदूम

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -