Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखपंतप्रधान मोदींचा ध्यास, होतोय रेल्वेचा कायापालट

पंतप्रधान मोदींचा ध्यास, होतोय रेल्वेचा कायापालट

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत प्रवास करायचा असेल तर देशातील सर्वसामान्य नागरिकांना तुलनेने स्वस्त आणि सुरक्षित वाहनाचे साधन कोणते असे विचारले, तर चटकन डोळ्यांसमोर रेल्वे उभी राहते. हवाई प्रवास हा सर्वांच्या खिशाला परवडणारा नसतो. त्यामुळे ज्या भागापर्यंत रेल्वे पोहोचलेली आहे, त्या परिसरात विकास झाल्याचेही दिसून आलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील काही वर्षांत होणारे बदल आणि दूरदृष्टी ठेवून अमृत भारत स्थानके योजनेअंतर्गत रेल्वेचा कायापालट करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी पंतप्रधानांच्या हस्ते ४१ हजार कोटी रुपयांच्या देशभरातील सुमारे दोन हजारांहून अधिक रेल्वेविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची कोनशीला, उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला. त्यात १९ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ५५३ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे कार्य केले जाणार आहे. एकाच वेळी दोन हजार प्रकल्पांना गती मिळल्यास भारताच्या रेल्वेविषयक पायाभूत सुविधांमध्ये भव्य परिवर्तन आगामी काळात पाहायला मिळणार आहे.

ब्रिटिश काळात भारतीय रेल्वेच्या इतिहासाकडे पाहताना सुंदर गोष्ट समोर येते. उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी ब्रिटिशांना डोंगरांमध्ये जायला आवडत असे. तेथे लवकरात लवकर पोहोचता यावे म्हणून त्यांनी डोंगराळ भागांसाठी “चिमुकल्या झुकझुक गाड्या” बनवल्या. त्यामुळे, घोड्यावर जाण्यापेक्षा किंवा पालखीत बसून जाण्यापेक्षा हा प्रवास लवकर करता येऊ लागला. उदाहरणार्थ, दक्षिण भारतातील “चिमुकली झुकझुक गाडी” प्रवाशांना निलगिरी डोंगरांमध्ये किंवा निळ्या पर्वतांमध्ये घेऊन जात होती. ती ताशी १०.४ किलोमीटर वेगाने धावत होती आणि ती भारतातली सर्वात हळू जाणारी रेलगाडी असावी, असे बोलले जाते.

१९०० सालापर्यंत, भारतातील लोहमार्ग व्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची होती. वाफेवर, डिझेलवर आणि विद्युतशक्तीवर चालणारी इंजिने आणि प्रवासी डबे असलेल्या गाड्या पूर्वी आयात केल्या जात होत्या; परंतु आता स्थानिकरीत्या तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. मुंबई उपनगरातील रेल्वे, जगातील सर्वात मोठे जाळे असून सुमारे ७५ लाखो प्रवाशांची ने-आण करते; तेथील गाड्या कायम खच्चाखच भरलेल्या असतात. कोलकाता येथील भूमिगत मेट्रोने दररोज १७ लाख प्रवासी प्रवास करू शकतात. चेन्नई (पूर्वीचे मद्रास) येथे भारतातील सर्वात पहिला उंचावर बांधलेला लोहमार्ग आहे. कॉम्प्युटराईझ्ड बुकिंग आणि मल्टीमीडिया माहिती केंद्रे यांची भर अलीकडे पडली आहे.

रेल्वे स्थानकांवर जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी नेहमीच भर दिला आहे. एकूण २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ही रेल्वे स्थानके असून, शहराच्या दोन्ही टोकांना जोडणारी ‘सिटी सेंटर्स’ म्हणून काम करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. या रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा, सुंदर लँडस्केपिंग, इंटर मोडल कनेक्टिव्हिटी, आधुनिक दर्शनी भाग, मुलांसाठी खेळण्याचे क्षेत्र, दुकाने, फूड कोर्ट इत्यादी आधुनिक प्रवासी सुविधा असतील. या रेल्वे स्थानकांचा विकास पर्यावरणपूरक आणि दिव्यांग स्नेही म्हणून केला जाईल. स्थानकांमधील इमारतींची रचना स्थानिक संस्कृती, वारसा आणि स्थापत्यकलेपासून प्रेरित असेल, यावर भर देण्यात आलेला आहे.

विशेष म्हणजे या स्थानकांचा पुनर्विकास करताना पुरातन वारसांची प्रतीके जपण्याचा प्रयत्न केला आहे. ओडिशातील बालेश्वर स्थानकाची रचना भगवान जगन्नाथ मंदिराच्या संकल्पनेनुसार करण्यात येणार आहे. सिक्कीमच्या रंगपो स्थानकावर स्थानिक वास्तुकलेचा प्रभाव दिसणार आहे. राजस्थानमधील सांगनेर स्थानकावर १६ व्या शतकातील हँड-ब्लॉक प्रिंटिंग प्रदर्शित असणार आहे. तामिळनाडूमधील कुंभकोणम येथील स्थानक चोल काळातील वास्तुकला प्रदर्शित करेल आणि अहमदाबाद स्थानक मोढेरा सूर्य मंदिरापासून प्रेरित आहे, द्वारका स्थानक द्वारकाधीश मंदिरापासून प्रेरित आहे, आयटी सिटी गुरुग्राम स्थानक आयटीसाठी समर्पित असणार आहे. तसेच ही स्थानके विकसित करताना दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करण्यात आला आहे.

गेल्या १० वर्षांत विकसित भारताची उभारणी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. त्यात विशेषत: रेल्वेमध्ये हे बदल दिसून येत आहेत. वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत यांसारख्या आधुनिक सेमी हाय-स्पीड गाड्या, रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचा वेग आणि गाडीच्या आत आणि स्थानकाच्या फलाटावरील स्वच्छता ही उदाहरणे डोळ्यांसमोर आहेत. त्यामुळे ज्या सुविधा एकेकाळी अशक्य वाटत होत्या, त्या आता प्रत्यक्षात उतरल्या आहे. विमानतळावर असलेल्या आधुनिक सुविधांसारख्याच सुविधा आता देशातील गरीब आणि मध्यमवर्गासाठी रेल्वे स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात नागरिकांसाठी रेल्वे हा सुलभ प्रवासाचा मुख्य आधार होणार आहे.

भारतीय रेल्वे ही केवळ प्रवाशांसाठीची सुविधा नाही, तर ती भारताच्या कृषी आणि औद्योगिक प्रगतीची सर्वात मोठी वाहक असणार आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशातील प्रत्येक पैसा प्रवाशांच्या कल्याणासाठी वापरला जात आहे, याची ग्वाही पंतप्रधानांकडून देशवासीयांना मिळाली आहे. वेगवान रेल्वेमुळे वाहतुकीचा वेळ वाचेल आणि उद्योग क्षेत्राचा खर्चही कमी होईल आणि पर्यायाने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे. भारत हे गुंतवणुकीसाठी जगाच्या आकर्षणाचे केंद्र आहे. त्याचे कारण इथल्या आधुनिक पायाभूत सुविधांना देण्यात येते. पुढील ५ वर्षांत देशातील हजारो रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण झाल्यावर भारतीय रेल्वेची क्षमता सुधारेल आणि देशात गुंतवणुकीची मोठी क्रांती घडेल, यात तिळमात्र शंका नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -