Monday, May 13, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकुटुंबाला भोवते आहे वैचारिक दारिद्र्य...

कुटुंबाला भोवते आहे वैचारिक दारिद्र्य…

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

समुपदेशनाच्या अनेक प्रकारच्या केसेस सोडावताना, स्त्री, पुरुष, मुलं, कुटुंबातील अन्य व्यक्ती यांच्याशी सखोल चर्चा करताना काही बाबी प्रकर्षाने जाणवतात. केसच्या आनुषंगाने पती – पत्नी, मुले यांच्याशी तर बोलावे लागतेच पण त्याही पलीकडे जावून जेव्हा आपण त्यांनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे, त्यांना होत असलेला घरातील इतर व्यक्तींचा त्रास लक्षात घेऊन, त्यांच्या घरातील इतर नातेवाईक अथवा लोकांशी चर्चा करतो तेव्हा लक्षात येते की, कुटुंब विस्कळीत व्हायला कारणीभूत ठरते ती घरातील लोकांची कमकुवत विचार शैली, उथळ स्वभाव, अर्धवट ज्ञान, इतरांबद्दल मत बनविण्याची घाई, अति राग, अति द्वेष, मत्सर, जळाऊ वृत्ती, तिरस्कार आणि सतत आपापसात केलेली तुलना. स्वतःच्या अनुभवातून मत बनवणे, निर्णय घेणे, परिस्थितीचा सर्वांगीण अभ्यास करणे, दुसऱ्याचे ऐकून घ्यायला कमीपणा वाटणे, वास्तवापेक्षा ऐकिव माहितीवर पटकन विश्वास ठेवून खोट्या चुकीच्या वृत्तींना अधिक फोफावण्यासाठी खतपाणी घालणे.

सून नांदायला येत नाही, अशी तक्रार घेऊन जेव्हा सासू, नणंद अथवा नवरा येतो तेव्हा तिच्या अगणित चुकांचा पाढा वाचून दाखवला जातो. तिच्यामध्ये अनेक खोड्या काढून ती कशी आणि किती वाईट आहे हे सगळे सांगितले जाते. मग सून जर इतकी वाईट आहे हे तुम्ही स्वतः सांगताय, ठरवताय तर तुम्हाला ती परत नांदायला कशाला हवी आहे? परत तिला का बोलवायचे आहे? यालाच आपण वैचारिक दिवाळखोरी म्हणू शकतो. ज्या केसमध्ये पत्नी नवऱ्याची तक्रार सांगते त्यावेळी त्याचे सर्व अवगुणच सांगते. त्याच्यापासून होणारा त्रासच सांगते. त्याच्यात एकही चांगला गुण नसेल का की तो तुम्ही अभिमानाने सांगू शकता? मग असा इतका दुर्गुणी माणूस तुम्ही नवरा म्हणून का निवडला? की लग्न झाल्यावर तो इतका नालायक सिद्ध झाला?

कौटुंबिक समस्या सोडवताना प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा असतो घरातील लोकांनी एकमेकांना माघारी बोलणे आणि त्यातून निर्माण झालेला प्रचंड मोठा वैचारिक गुंता. आपण केस संदर्भात काहीही माहिती विचारल्यास लोकांची उत्तरे असतात तो म्हणत होता, ती सांगत होती, यांच्याकडून समजले, हा बोलला, तो बोलला, माझ्या कानावर आले. लोकांकडे फक्त ऐकीव डाटा उपलब्ध असतो हा डाटा खरा किती, खोटा किती याबद्दल त्यांना स्वतःलाच माहीत नसते. ऐकीव माहितीच्या आधारित सर्व अवलोकन केलेले असते. बरं तो डाटा म्हणजेच माहिती पण सुसंगत सुसूत्र असते असे नाही तर ती दहा ठिकाणावरून मिळालेली असते.

घरातीलच लोकांकडे एकमेकांबद्दल असलेल्या कोणत्याही माहितीला काहीही सबळ पुरावा, काही ठोस पार्श्वभूमी नसते, कोणत्याही वाक्याला गांभीर्य नसते. घरातील अत्यंत महत्त्वाच्या, संवेदनशील, तातडीच्या, भविष्यात त्रासदायक ठरणाऱ्या विषयावर काय कशी भूमिका घेणे योग्य राहील याबद्दल थोडा सुद्धा विचार कोणीही केलेला नसतो. घरातील आर्थिक व्यवहार, आर्थिक जबाबदाऱ्या, मुलांचे भवितव्य, आजारपण, घरातील लोकांची आर्थिक बचत यांमध्ये कुठलेही गांभीर्य नसते. त्यामुळे कोणतीही आर्थिक समस्या उभी राहिल्यावर एकमेकांना दोष देणे, हात वर करणे असे प्रकार घडतात.

एकमेकांबद्दल बोलणे, दोष देणे, आरोप करणे, कोणाची बदनामी करणे यात पूर्ण आयुष्य गेलेली व्यक्ती उतार वयात सुद्धा बदललेली नसते हे पाहून सुद्धा आश्यर्य वाटल्याशिवाय राहत नाही. अनेक ज्येष्ठ, साठी ओलांडलेले लोक सुद्धा बिनबुडाचे विधान करताना दिसतात. स्वतःच्या चुकांना स्वीकारताना त्यांना कमीपणा वाटतो. एकाच घरातील लोक एकमेकांना किती खालच्या दर्जाचे बोलू शकतात, कसे अपशब्द वापरू शकतात, घरातच लोकांना आपापसात आदर नाही हे पाहिल्यावर जाणवते की यांना अजून आयुष्याची संकल्पनाच समजली नाही. आपल्याच माणसांबद्दल जर आपणच इतके पातळी सोडून बोललो आणि वागलो तर आपले शिक्षण, संस्कार, सुसंस्कृतपणा, पैसा, श्रीमंती आणि बडेजाव सगळे व्यर्थ आहे हेच लोकांना समजत नाही.

अनेक सुशिक्षित कुटुंबे अनेक कारणांनी उद्ध्वस्त होताना आपण बघतोय. कोणाचा कोणाशी ताळमेळ नसल्यासारखे, कोणालाच कोणाची किंमत नसल्याने, फक्त स्वतःला कसा त्रास होणार नाही हे पाहून अनेकजण चालत असतात. कुटुंबात कितीही गंभीर, बिकट समस्या असली तरी मी कसा बरोब्बर आहे, माझ्यामुळे काहीच घडलेले नाही, माझा काहीच संबंध नाही हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. स्वतःची बाजू सुरक्षित करण्यात, अलिप्त राहण्यात जर तुम्हाला धन्यता मानायची असेल, तर अशा लोकांनी कोणाबद्दल काहीच मत मांडणे योग्य नाही. तटस्थ भूमिका घ्यायची असेल, तर एकदमच शांत आणि गप्प राहणे अपेक्षित आहे. समस्या अंगावर घ्यायची नाही, समस्या सोडवायची नाही मग त्याबद्दल स्वतःचे ज्ञान का पाजळावे? हे लोकांना कळत नाही.

अनेक जण तर सोईनुसार नाती बदलतात. एखाद्या नवऱ्याने चांगले काही केले तर बहिणी म्हणतात आमचा भाऊ! त्याने काही चूक केली की सुनेला म्हणणार तुझा नवरा, तुला ताब्यात ठेवता आला नाही का? बाईची काही चूक झाली तर तिच्या सासरचे तसेच आहेत म्हणून ती तशी वागली असे बोलून माहेरचे मोकळे होतात. घरातील लहान मुलांना पण यात सोडे जात नाही. मुले कुठे चुकली की आईचे वळण, आईचे संस्कार असे बोलून बाप मोकळा होणार, त्याच मुलाने काही यश मिळवले तर मग मुलगा कोणाचा आहे शेवटी! असे बोलून बाप श्रेय लाटणार. सासू – सुनांच्या बाबतीत तर आजही तोच पारंपरिक सासुरवास नित्यनियमाने सुरू असल्याचे दिसते. सून कितीही सुशिक्षित, कामावणारी असली तरी आज देखील सुनेबद्दल केल्या जाणाऱ्या तक्रारी काही कमी होताना दिसत नाहीत. लग्नाला १५-२० वर्षे झाल्यावरही नणंद – भावजय यांच्यामध्ये सुसंवाद आणि विचारविनिमय याचा अभाव जाणवतोय. एकमेकींचा पाणउतारा करण्यापेक्षा आपण एकमेकींच्या आयुष्यातील कमतरता कशा भरून काढू, आपले घर पुढे कस नेऊ, आपल्या गुणांचा वापर करून घराला हातभार कसा लावता येईल यावर कोणीच बोलत नाही.

‘जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा’, हा प्रत्येक मुलीला आईकडून दिला जाणारा मूलमंत्र आता काहीही झाले की, ताबडतोब पोलीस स्टेशनला जा या सल्ल्यात रूपांतरित झालेला दिसतो. अनेक कुटुंबातील वैचारिक दारिद्र्य इतकं विकोपाला गेलं आहे की प्रॉपर्टी, पैसा, वाटणी, हिस्सा यासाठी सर्व नातेसंबंध पायदळी तुडवले गेले आहेत. समुपदेशनला कोणत्याही स्वरूपाचा वाद आला की त्यामध्ये पैसा इस्टेट प्रॉपर्टी हा अग्रणीचा मुद्दा पुढे रेटला जातो. घरातली माणसे, त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा हा फक्त एकत्र फोटो काढून सामाजिक माध्यमात टाकण्याइतपत शिल्लक आहे असे वाटते.

आजमितीला समाजाची तसेच अनेक कुटुंबांची जी विदारक परिस्थिती झालेली आहे, विभक्त कुटुंब, घटस्फोट, विवाहबाह्यसंबंध, आत्महत्या, घात-पात, अपमृत्यू, ताण- तणावातून उद्भवणारे आजारपण, मानसिक आजरांचे वाढते स्वरूप, अपघात, व्यसनाधीनता, मुला-मुलींनी दिशाहीन होणे या सगळ्या गोष्टीना कारणीभूत घराघरातील मतभेद, वैचारिक दारिद्र्य, योग्य वेळी योग्य निर्णयशक्ती वापरण्याचा अभाव, कुटुंबाला एकत्रित ठेवण्यासाठी अपेक्षित असलेल्या दमदार नेतृत्वाचा आभाव. त्यामुळे या सगळ्याचा सर्वांगीण विचार करून आपण आपली संस्कृती, आपले कुटुंबं कसं जपायचं हे आता फक्त आपल्याच हातात आहे.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -