Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीकोकणी माणूस हा ‘प्रहार’चा केंद्रबिंदू

कोकणी माणूस हा ‘प्रहार’चा केंद्रबिंदू

इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर

दै. ‘प्रहार’च्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापन दिन आज (९ नोव्हेंबर) आहे. त्यानिमित्ताने…

नऊ ऑक्टोबर हा ‘प्रहार’च्या मुंबई आवृत्तीचा वर्धापन दिन आणि नऊ नोव्हेंबर ‘प्रहार’च्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आवृत्तीचा वर्धापन दिन. गेल्या वर्षी कोरोनाचा विळखा व सर्वत्र लॉकडाऊनचे सावट असल्याने वर्धापन दिन साजरा झाला नाही. धुवांधार पाऊस असो की, चक्रीवादळाचा तडाखा असो, वाशिष्ठी, जगबुडी, काळ, सावित्री, मुचकुंदी नद्यांना पूर येऊन गावागावांत पाणी शिरलेले असो की, मुंबई-गोवा महामार्गावर ट्रॅफिक जाम असो, ‘प्रहार’ कधी थांबला नाही. मुंबई-कोकणातील जनतेचा आवाज म्हणजे ‘प्रहार’ आहे. ‘प्रहार’ हे कोकणवासीयांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. प्रहार म्हणजे शब्दाला सत्याची धार हे आमचे ब्रीद वाक्य आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिलेले ब्रीद वाक्य प्रहारच्या प्रत्येक पानावर शब्दा-शब्दांत भिनले आहे. वृत्तपत्रसृष्टीत ‘प्रहार’ची नाळ कोकणाशी आणि कोकणी माणसाशी जोडलेली आहे.

‘प्रहार’च्या मुंबई आवृत्तीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या परिसरात आपला दबदबा निर्माण केला आहे तसेच ‘प्रहार’च्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी आवृत्तीने कोकणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्रसृष्टीला मोठा झटका बसला. अनेक वृत्तपत्रे बंद पडली, काही वृत्तपत्रांच्या वेगवेगळ्या आवृत्या बंद पडल्या. पत्रकार व अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर कपात झाली. बड्या मीडिया हाऊसमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आले. पण एवढ्या मोठ्या संकटात ‘प्रहार’ तग धरून आहे आणि पाय घट्ट रोवून आपली वाटचाल करीत आहे. नारायण राणे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे तसेच निलेश राणे व नितेश राणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळेच ‘प्रहार’ जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सदैव आक्रमक आहे.

तेरा वर्षांपूर्वी ‘प्रहार’ सुरू झाला तेव्हा नारायण राणे यांनी म्हटले होते, माझा पत्रकारितेचा केंद्रबिंदू हा महाराष्ट्रातील शेवटचा टोकाचा माणूस असेल. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रहार विकासाच्या विचाराचे प्रबोधन करील. ‘प्रहार’ वृत्तपत्र कधी विकले जाणार नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी धारदार शब्दांनी प्रहार करील. हे वृत्तपत्र निर्भीडपणे राज्याच्या विकासाकडे लक्ष वेधेल. विकासाच्या आड येणाऱ्यांवर, जनतेचे शोषण करणाऱ्यांवर आणि राज्याच्या मालमत्तेची लूट करणाऱ्यांवर प्रहार करील.…

कोकणातील घटना, कार्यक्रम, समस्या यांना ‘प्रहार’मध्ये प्राधान्य असते. कोकणात ज्यांनी मोठे यश संपादन केले त्यांचे ‘प्रहार’ने कौतुक केले. कोकणचे नाव उंचावण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्यांची ‘प्रहार’ने ठळक दखल घेतली. कोकणवासीयांच्या सुखदु:खाशी समरस झालेले वृत्तपत्र अशी ‘प्रहार’ने ओळख निर्माण केली आहे. शिमगा, गणेशोत्सव किंवा नवरात्रोत्सव या कोकणातील सणांना प्रहारचा विलक्षण साज असतो. गेल्या तेरा वर्षांत ‘प्रहार’ने अनेक चढउतार बघितले. अनेक वृत्तपत्रांनी सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या वेगवेगळ्या आवत्त्या काढल्या. पण आमची नाळ इथल्या जनतेशी जोडलेली आहे, म्हणून जनतेची ‘मन की बात’ ‘प्रहार’मध्ये दिसते. कोकणातील जनजीवन, कथा, साहित्य, समाज सेवा आणि दैनंदिन राजकारण याला प्रहारमधून ठळक प्रसिद्धी दिली जाते. ‘प्रहार’चे अग्रलेखही मिळमिळीत नसतात. कोकणातील रस्ते, पूल, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, प्रवासी वाहतूक, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये येथे अपेक्षेप्रमाणे काम होते की नाही, यावर ‘प्रहार’चे बारीक लक्ष असते. कोणी जनतेला मू्र्ख समजून आकाशातला चंद्र दाखवत असेल, तर त्यांच्यावर ‘प्रहार’ने आसूड ओढले आहेत. अगोदर विकास प्रकल्पांना विरोध करायचा व उद्घाटनाच्या वेळी त्या प्रकल्पाचे श्रेय लाटणारे फलक झळकवायचे, अशा दुटप्पी राजकारण्यांचा बुरखा ‘प्रहार’ने अनेकदा फाडला आहे. म्हणूनच कोकणातील जनतेचा आणि मुंबईतील कोकणी माणसाचा विश्वास ‘प्रहार’वर अधिक आहे.

यापूर्वी, वृत्तपत्र जगतावर वृत्तवाहिन्यांचे वृत्तपत्रांसमोर मोठे आव्हान होते. आता सोशल मीडियाने माध्यम जगतात झेप घेतली आहे. टीव्हीवर ब्रेकिंग येण्यापूर्वीच सोशल मीडियावर बातम्या व त्यावर प्रतिक्रिया झळकू लागल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्ट खऱ्या की खोट्या याची खातरजमा करणारी यंत्रणा नाही आणि त्यावर प्रभावी नियंत्रणही नाही. अशा वेळी जबाबदार व दर्जेदार वृत्तपत्र म्हणून ‘प्रहार’ने जनमानसात स्थान निर्माण केले आहे.

‘प्रहार’ व्यासपीठ हे वाचकांना आम्ही उपलब्ध करून दिले आहे. दर आठवड्याला प्रासंगिक विषयांवर वाचक त्यांची मते निर्भीडपणे मांडत असतात. लवकरच जनसमस्या हे नवे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या विभागातील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे व्यासपीठ असेल. माझे सहकारी संतोष वायंगणकर यांचे ‘माझे कोकण’ आणि नरेंद्र मोहिते यांचे ‘माझी रत्नागिरी’ या दोन स्तंभातून कोकणाचे अंतरंग दिसतात. विजया वाड, मृणालिनी कुलकर्णी, सतीश पाटणकर, शिबानी जोशी, मीनाक्षी जगदाळे, श्रीनिवास बेलसरे अशा नामवंत लेखकांच्या टीमबरोबर मुंबईचे विलास खानोलकर दर आठवड्याला ‘समर्थ कृपा’ आणि ‘साई श्रद्धा’ तर गोव्याच्या स्नेहा सुतार ‘सोहिरा म्हणे’ या स्तंभातून अध्यात्मिक समाधान मिळवून देतात. महामुंबईतील घडामोडींवर सीमा दाते यांचे ‘@ महानगर’ आणि पालघरमधील घडामोडींवर दीपक मोहिते यांचे ‘सूर्यातीर’ यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वाढदिवस, पंचांग आणि मंगेश महाडिक यांचे दैनंदिन व साप्ताहिक भविष्य हे ‘प्रहार’चे वैशिष्ट्य आहे.

कोकणात वृत्तपत्र काढणे व चालवणे ही काही सोपी गोष्ट नाही. वृत्तपत्र हा समाजाचा आरसा आहे. जनतेच्या भावभावनांचे प्रतिबिंब वृत्तपत्रात पडले पाहिजे. नारायण राणे तसेच निलेश व नितेश राणे यांची बोलण्याची एक शैली आहे. ती आक्रमक आहे, त्यात नेहमीच हल्लाबोल ध्वनित होत असतो. ही शैली जनतेला मनापासून आवडते. आपल्यासाठी राज्यकर्ते व प्रशासनाला अंगावर घेणारा हक्काचा नेता, अशी जनतेची राणे कुटुंबीयांविषयी भावना आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विकासकामांना ‘प्रहार’मधून चांगली प्रसिद्धी दिली जाते तसेच विकासकामांकडे दुर्लक्ष होत असेल, तर ‘प्रहार’मधून त्यांना जोरकसपणे फैलावरही घेतले जाते.

नारायण राणेसाहेबांनी घालून दिलेल्या दिशेनेच ‘प्रहार’ची वाटचाल गेली तेरा वर्षे अव्याहतपणे सुरू आहे व यापुढेही चालू राहील. आमची बांधिलकी ही वाचकांशी आणि कोकणवासीयांशी आहे. वाचकांना सत्य सांगणे, हे वृत्तपत्राचे कर्तव्य आहे व सत्य समजावून घेणे हा लोकांचा अधिकार आहे. हा आम्ही स्वेच्छेने वसा घेतला आहे. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा आम्ही टाकणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणी माणूस आणि त्याच्यावर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. तो आमचा श्वास आहे.

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -