Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखजगाला वेड लावणारा ‘आयपीएल’ सोहळा

जगाला वेड लावणारा ‘आयपीएल’ सोहळा

अवघ्या जगाला एका सूत्रात बांधून ठेवणारा आणि सर्व खंड, देश, वर्ण, धर्म यांच्या भिंती तोडून केवळ आणि केवळ देहभान हरपून भरभरून आनंद देणारा असा एकच पंथ आहे, तो म्हणजे क्रिकेट. याच क्रिकेट खेळाला चार चांद लावून तो अधिक बहुव्यापी बनलाय ‘आयपीएल’च्या स्पर्धांमुळे. जगातील सर्वात मोठ्या टी-२० क्रिकेट लीगपैकी एक असणारी ‘इंडियन प्रीमियर लीग’ या स्पर्धेला शुक्रवार ३१ मार्चपासून सुरुवात झाली आहे. तब्बल दोन महिने अविरतपणे हा स्पर्धारूपी सोहळा रंगणार असून यंदाच्या १६ व्या सीझनची ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्व संघांमध्ये प्रचंड चुरस पाहायला मिळणार आहे. यंदा १० संघ खेळणार असून त्यात मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली चॅलेंजर्स, लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे.

आयपीएलच्या ‘रन’संग्रामातील पहिला सामना जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर म्हणजेच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला. गतविजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळचे विजेते चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील ब्लॉकबस्टर लढतीने या आयपीएलच्या १६व्या हंगामाची सुरुवात दणक्यात झाली.

जगातील सर्वात मोठ्या या क्रिकेट लीगमध्ये रोमांच, संघर्ष आणि प्रचंड चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. ही बाब ध्यानी घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुन्हा एकदा ‘आयपीएल फॅन पार्क’ सुरू केले आहेत. आयपीएलची वाढत असलेली लोकप्रियता ध्यानी घेऊन २०१५ मध्ये आयपीएल फॅन पार्क सुरू झाले आणि ते २०१९ पर्यंत कायम सुरू होते. त्यानंतर मात्र कोविडचे संकट आल्याने हे फॅन पार्क बंद करण्यात आले. आता ४५ शहरांमध्ये हे फॅन पार्क तयार केले आहेत. त्यामध्ये सूरत, मदुराई, कोटा, हुबळी, डेहराडून या शहरांचा समावेश आहे. हे फॅन पार्क २० राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये असतील. क्रिकेट चाहत्यांना एक रोमांचक आणि मनोरंजक अनुभव देण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये हे बनवले गेले आहेत. स्पर्धेदरम्यान दर आठवड्याच्या शेवटी पाच फॅन पार्क असतील. चाहत्यांना २८ मे रोजी जम्मू, जमशेदपूर, पलक्कड, जोरहाट आणि भोपाळ येथील पाच फॅन पार्कवर ‘आयपीएल’चा अंतिम सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. आयपीएल फ्रँचायझी नसलेल्या राज्यांमध्ये ‘बीसीसीआय’तर्फे चाहत्यांना विनामूल्य सामने पाहण्यासाठी ‘फॅन पार्क’ तयार केले जातात. या दरम्यान, अनेक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर थेट सामना दाखविला जातो. तसेच प्रेक्षकांची येथे बसण्याची व्यवस्था असते. त्यासोबतच काही उपक्रमही ठेवले जातात. चाहत्यांना ‘आयपीएल’शी अधिक बांधून ठेवण्यासाठी, त्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि प्रत्यक्ष स्टेडियममध्ये सामना पाहत आहोत यांसारखा आनंद देणे हा यामागचा उद्देश आहे.

आयपीएल सीझन सुरू झाल्यावर कधी कधी एकाच दिवशी दोन सामने होणार आहेत. त्यातील पहिला सामना दुपारी ३.३० वाजता, तर दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. विशेष म्हणजे यंदा तब्बल दोन वर्षांनी आयपीएलचे सामने संघांच्या होम ग्राऊंडवर रंगणार आहेत. भारतातील १० प्रमुख शहरांमधील क्रिकेट स्टेडियमवर या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलमध्ये एकूण ५२ दिवसांमध्ये सुमारे ७० लीग सामने खेळले जाणार आहेत, तर फायनलचा सामना १ जून रोजी खेळवला जाईल. म्हणजे जगभरातील क्रिकेट शौकिनांसाठी जणू हा जंगी सोहळाच आहे. मात्र क्रिकेट जगतासाठी एक अत्यंत वाईट बातमी म्हणजे यंदाचा आयपीएल सोहळ्याच्या हंगामास सुरू होण्यास काही अवधी शिल्लक असतानाच मॅचफिक्सिंगबाबतच्या बातमीमुळे खळबळ उडाली आहे. एव्हढ्या मोठ्या ‘आयपीएल’ सोहळ्यावर सट्टेबाज आणि मॅचफिक्सर्स यांची वक्रदृष्टी पडली आहे.

आयपीएलमधून सट्टेबाज दररोज किमान ६०० कोटींचा नफा कमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. सट्टेबाजीच्या आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधित असलेल्या बुकींनी दुबई आणि कराची येथे बसून सट्टा खेळण्यास सुरुवात केली आहे. किमान १८ क्रिकेट सट्टेबाजी अॅप्सच्या माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यात येतो आणि ६० सट्टेबाजांच्या एक नेटवर्क कायरत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.त्यामध्ये भारतातील मोठ्या शहरांमधूनही भरपूर पैसा लावला जात आहे. त्यात दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, भोपाळ आणि हैदराबाद यांसारख्या शहरांचा समावेश आहे. आयपीएलच्या या हंगामात ६,१० आणि २० षटकांच्या प्रत्येक सेशनमध्ये प्रतिमॅच ३ हजार ५०० कोटी रुपयांचा सट्टा लावला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्याच्या आधुनिक युगात सट्टेबाजांचा बाजार फुलणार ही गोष्ट ध्यानी घेऊन आयोजकांनी आणि संबंधित देशांतील यंत्रणांनी हा ‘काळा बाजार’ रोखण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी. कारण ही कीड जर पसरली तर क्रिकेट स्पर्धांवरील शौकिनांचा विश्वासच उडून जाईल. तसे झाल्यास ‘आयपीएल’ला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाला ओहोटी लागेल आणि एक चांगली स्पर्धा नाहक बदनाम होऊन लयाला जाईल, अशी भीती आहे. आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीची सुरुवात झक्कास झाली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने स्टेजवर परफॉर्म केलेल्या गाण्यांवर चाहते मनसोक्त थिरकले. असा हा रंगारंग नेत्रदीपक सोहळा आणि क्रिकेटचा जलवा अविरत सुरू राहायलाच हवा. हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -