Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीविरोधी पक्षनेता देता येत नाही इतकी पक्षाची स्थिती खालवली

विरोधी पक्षनेता देता येत नाही इतकी पक्षाची स्थिती खालवली

राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांची काँग्रेसवर सडकून टीका

शिर्डी : इंडिया आघाडीची बैठक म्हणजे भारतीय जनता पार्टीला विरोध कसा करता येईल याचा एक कलमी कार्यक्रम असतो. काँग्रेसकडे अथवा आघाडीकडे विकास कसा होणार व लोकांसाठी काय करायचे याचे कुठलेही धोरण नसून भविष्यातही आघाडीचे काहीच खरे नसल्याचे सांगत काँग्रेसला साधा विरोधी पक्ष नेता ही देता येत नाही. इतकी या पक्षाची स्थिती खालवली असल्याने हा पक्ष जनतेला काय देणार, असा उपरोधिक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री खासदार प्रफुल पटेल यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री खा प्रफुल्ल पटेल यांनी सहपरिवार सोमवारी (दि.२९ रोजी) साईदरबारी हजेरी लावत श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर खा.पटेल यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष दिपक गोंदकर यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी प्रदेश सचिव संग्राम कोते, तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे, गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते, राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर,अमित शेळके, युवक अध्यक्ष निलेश शिंदे , शिवाजी ज्ञानेश्वर गोंदकर, अमोल सुपेकर, गंगाधर वाघ आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. साईसमाधी दर्शनानंतर खा. प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी ही कोणाची म्हणण्यापेक्षा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणून राष्ट्रवादी कार्यरत आहे. महायुतीमध्ये महाराष्ट्राच्या कल्याणासाठी राष्ट्रवादी शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य यासह सर्वच नागरिक तसेच विविध क्षेत्रातील घटकांसाठी सरकारमध्ये राहून अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत आहे .

इंडिया आघाडीवर टीका करताना प्रफुल पटेल म्हणाले की, मुळात त्या शब्दातच ठिकठिकाणी डॉट असून त्यामुळे आघाडीमध्ये एकमेकांसाठी गतिरोधक खूप आहेत. काँग्रेसला देशासाठी विरोधी पक्ष नेताही देता येत नाही, इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली असून पक्षाची स्थिती खालवली आहे. भाजपला कसा विरोध करायचा, याचाच अजेंडा बैठकीत ठरतो. मात्र देशाचा विकास कसा होणार, लोकांच्या हितासाठी व विकासासाठी काय करता येईल, याचा कुठलाही ठोस कार्यक्रम त्यांच्याकडे नाही. फक्त व्यक्तीविरोध करून अथवा भाजपला हटवण्याचा विचार करून लोकांची मते मिळवता येणार नाही, असा टोलाही लगावला. मागे चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये जनमत कोणाच्या बाजूने आहे. याचा अनुभव सर्वांना आला. लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही. यापूर्वीसुद्धा घटनेत मंडल आयोगासारख्या दुरुस्त्या करून आपण आरक्षण ओबीसींना दिलेले आहे. सरसकट आरक्षण हा वेगळा प्रश्न जरी असला तरी मराठा समाजाच्या आरक्षणावर सर्व सकारात्मक आहेत. मंत्री नारायण राणे यांची भूमिका सुद्धा योग्य असून ज्यांना मराठा म्हणून दाखले हवेत ते कुणबीचे दाखले घेणार नाहीत. तर ज्यांना कुणबी हवेत त्यांनी घ्यावे, हे त्यांचे मत योग्यच आहे. त्याला दुमत असण्याचे कारण नाही. जो चांगले काम करील तो मुख्यमंत्री होईल त्यात गैरकाय असे यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -