Saturday, May 18, 2024

कळीदार…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

कळीदार कपुरी पान…
हिरव्यागार रंगाचं, तळहाता एव्हढं… बदामाच्या आकाराचं, कधी महादेवाच्या पिंडीच्या आकाराचा भास होणारं…
विड्याचं पान!!

याचं महत्त्व काही वेगळंच… कोणतीही पूजा असो, चौरंगावर प्रथम जोडीने पांच पाने मांडून खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी आणि नाणं मांडल्या जातं… हा पहिला मान पानांचा… कलशावर सुद्धा विड्याचे पांच पानं वर नारळ ठेवला जातो… पूजेपूर्वीची ही मांडणी लाल पिवळ्या आसनावर हिरव्या पानांचा साज… पवित्रतेची, मंगलतेची साक्ष!!
पूर्वी लग्न ठरविताना मुला-मुलींच्या हाती विडा सुपारी देऊन लग्न पक्के केले जात असे. शुभशकून विड्याच्या पानांचा! लग्नामध्ये सुद्धा वऱ्हाडी मंडळीचे स्वागत पान सुपारी देऊन मान केला जात असे!

नुसतं पूजेतच नव्हे…तर… पोटपुजे नंतरही या पानाचा फार मान! सुग्रास भोजनानंतर विडा हवाच… तब्येत खूष होऊन जाते…राजा रजवाड्यांपासून विडा खाण्याची खानदानी पद्धत आहे…

माहूरच्या गडावर रेणुका देवीचा प्रसाद म्हणजेच तांबूल… विड्याच्या पानांचाच… तो प्रसाद घेतल्यावर मन अंतरबाह्य तृप्त भासते!! जुन्या काळी घरोघरी पानदान असे… वेगवेगळ्या आकाराचे, नक्षीदार, पेटीवजा… चांदीचे, पितळेचे! घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत चहा-पानानी होत असे! विड्याला आतून बाहेरून जेव्हढे सजवावे, तेव्हढे ते शाही! वर्ख लावलेले, मगई पान म्हणजे एकदम लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारं… या पानाचा तोरा मोठा!!
पान रंगलं की वाहिदा रहेमान नक्कीच आठवणार…‘ पान खाये सैंय्या हमारो…’
विडा जितका रंगला…
तेव्हढं किंवा जरा जास्तच गाणं रंगलं… झकास!!
गोविंद विडा…
हा पांच पानांचा… ह्या विड्यात मस्त शाही मसाला टाकून एक एक पानाची घडी करत बांधत न्यायचा, पेटी सारखा आकार घेतो चौकोनी… त्यावर मधोमध लवंग टोचली जाते… जणू मालामाल असलेल्या पेटीला कुलूप लावावे! पानाची घडी त्रिकोणी असो वा चौकोनी विडा, लवंग टोचली जाते… घडी उघडत नाही! पान खाणारे रसिक निराळेच…

‘सैंय्या है व्यापारी, खाई के बिडा पान…
पुरे रायपूर में अलग है सैंय्याजी की शान…
ससुराल गेंदा फुल…’ असे गाणे ही पानांवर तयार झाले.
लखनऊ बनारसमध्ये विड्याच्या पानांचे शौकीन फार… एकदम उस्ताद… तिथले पान ही एकदम चवदार, झिंग आणणारे. खाल्ल्यावर ब्राम्हनंदी टाळी लागलीच पाहिजे… तोंडात टाकायचं… डाव्या किंवा उजव्या गालात खुपसायचं..उं… अहाहा… बसले जागेवर… आता रवंथ आरामात! भरभर खाऊन संपवण्यात काही मजा नाही… एक पिचकारी… उं.. अहा…’ खैके पान बनारस वाला ‘ ओठावर येणारच…’ फिर तो ऐसा करे कमाल ‘… असे हे बनारसी रसिक पान!!

अशा रसाळ पानाची एक कथा… मस्तानीला आरस पानी सौन्दर्याची उपमा दिली गेली होती. ती जेव्हा पान खायची तेव्हा तिच्या गळ्यातून पीक उतरताना दिसे… इतकी नितळ काया तिची… दिवाने हां दिवाने… दिवाने हो गये!
आयुष्य ही असच आहे… सजतं, धजतं, खुलतं, रंगतं, अन् पिकतं…
पण मन नेहमी ताजं असावं, हृदयाच्या आकाराचं हिरव्यागार विड्याच्या पानासारखं… रंगलेल्या विड्यासारखं आयुष्य ठेवावं…

‘पिकल्या पानाचा…अहो… पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा…!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -