Saturday, May 4, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वTesla In India : टेस्लाचे भारतात आगमन; कुणाची चांदी, कुणाचा बाजार उठणार...

Tesla In India : टेस्लाचे भारतात आगमन; कुणाची चांदी, कुणाचा बाजार उठणार…

  • अर्थभूमी : उमेश कुलकर्णी

इलन मस्क यांच्या स्वस्तातील विद्युत वाहन बनवणारी कंपनी टेस्ला हिला भारत सरकारने भारतात कार उत्पादन कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सध्या कार उत्पादन क्षेत्रात अग्रणी असलेल्या टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांचा बाजार उठण्याचीच जास्त शक्यता आहे. मस्क यांना पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या अमेरिका दौऱ्यात भारतात कारखाना उभारण्याचे आमंत्रण दिले होते. आयात शुल्क कमी करण्याची मस्क यांची प्रमुख मागणी होती. ती भारत सरकारने मान्य केल्यात जमा आहे. पंतप्रधानांनी संबंधित विभागांना टेस्लाचा भारतात प्रवेश जलदगती व्हावा यासाठी तयार करण्यास आदेश दिला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लवकर म्हणजे जानेवारी २०२४ मध्ये भारतात टेस्लाचे आगमन होईल. चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या भारतात आता टेस्लाचे आगमन होत आहे. पंतप्रधान मोदी यांचे दोन हेतू यातून समोर येतात. एक तर कमी आयात शुल्क लावण्याची कंपनीचे मालक इलन मस्क यांची मागणी मान्य केली तर भारतात या कार्स स्वस्तात उपलब्ध होतील. दुसरी गोष्ट म्हणजे देशातील कमालीचे वाढलेले प्रदूषण त्यामुळे किती तरी प्रमाणात कमी होईल. सामान्य जनांना स्वस्त कार मिळाव्यात, हा मोदी यांचा हेतू आहे. त्यामुळे पूर्वी जसे केवळ श्रीमंतानाच आलिशान आणि आरामदायक वस्तूंचा लाभ कसा मिळेल, हे पाहिले जायचे. तसे आता नाही तर गरिबांनाही म्हणजे सामान्य मध्यमवर्गीयांनाही कारसारख्या वस्तूंचा उपभोग घेता येईल. टेस्लाची विद्युत कार ही २० लाख रुपयांपासून सुरू होत असल्याने भारताची अर्थव्यवस्था पहाता ही रक्कम फार वाटण्याची शक्यता नाही. अर्थात हे भारतातील धनाढ्य वर्गासाठी म्हणत आहे. कार बाजारपेठ ही ओलिगोपोली बाजारपेठ असल्याने येथे विक्रेत्यांची म्हणजे सेलर्सची संख्या कमी असते. त्यामुळे एकाने भाव कमी केले की दुसऱ्यांनाही ते कमी करावेच लागतात. त्यामुळे टेस्लाच्या स्पर्धेत उतरणाऱ्या सर्वच कंपन्यांना स्वस्तात विद्युत वाहने द्यावी लागतील. अर्थात टेस्लामुळे टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांचा बाजार उठण्याचीच जास्त शक्यता आहे. टेस्ला ही अमेरिकन कार उत्पादक कंपनी आहे. भारतातील कार बाजारपेठ ही आता प्रगल्भ झाली आहे, यावर टेस्लाच्या प्रवेशाने शिक्कामोर्तब होईल. भारतानंतर जर्मनी आणि चीन मध्येच टेस्लाचे कारखाने आहेत. पाश्चात्य देशांना ढासळत्या अर्थव्यवस्थांशी जोरदार स्पर्धा करावी लागत असल्याने आणि टेस्लालाही चीनमध्ये इतर विद्युत वाहन कंपन्यांकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत असल्याने भारतात विद्युत कार विकणे हा अमेरिकन कंपनीसाठी एक आकर्षक प्रस्ताव दिसत आहे. सुरुवातीला कंपनी पूर्णपणे आयात केलेल्या कार्स विकेल. त्यानंतर भारतात उत्पादन सुरू होईल.

टेस्लासाठी भारत आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे आणि यामुळे भारतातील इतर विद्युत वाहन कंपन्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली होती. भारतात कारवरील उत्पादन शुल्क खूप जास्त आहे. ते कमी करण्यासाठी मस्क आणि भारत सरकार यांच्यात प्रदीर्घकाळ वाटाघाटी सुरू होत्या. त्यात आता यश येऊ लागले आहे. टेस्लाचा आणखी एक लाभ असा होणार आहे की युरोपियन देशांनी भारतावर कार्बन कर लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे भारताला कार्बन उत्सर्जनासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. विद्युत वाहने भारतात आली आणि त्यांची स्वस्तात विक्री झाली तर या कार्बन करापासून भारत बचावणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी ‘आम्ही कार्बन कराचा स्वीकार कधीही करणार नाही’, असे म्हटले आहे. सध्या भारतात आयातीत कारवर ४० टक्के कर आहे.

पण आयात शुल्क कमी केल्याने भारतात कारची आयात वाढेल. पण त्यामुळे कंपन्या भारतात कार्सचे उत्पादन करणारे कारखाने सुरू करणार नाहीत आणि त्यामुळे भारतीय तरुणांना रोजगार मिळणार नाहीत, ही भारताची शंका खरी ठरली. त्यामुळे आता भारताने कंपनीला भारतात कारखाना उभारण्याची परवानगी दिली आहे. कंपन्या जर भारतात कारखाना उभारण्यास तयार झाल्या नाहीत तर भारतातील गुंतवणुकीवर विपरित परिणाम होणार आहे. विद्युत वाहनांसाठी नवे धोरण आखण्याची तयारी करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यानुसार प्रदूषण न करणाऱ्या कंपन्यांना म्हणजे स्वच्छ ऊर्जा वापरणाऱ्या कार उत्पादक कंपन्यांना कमी कर लावण्यासाठी त्यांचा नवीन वर्ग तयार करण्याची ही योजना आहे. कमी आयात शुल्काच्या मोबदल्यात टेस्लाला भारतात कारखाना उभारावा लागेल. टेस्लाच्या आगमनाचा भारतातील इतर कार कंपन्यांना काय परिणाम होईल हे जाणूया. टेस्लाने कमी आयात शुल्काची जी मागणी केली आहे त्यामुळे भारतातील स्थानिक कार कंपन्यांत मतभेद झाले आहेत. त्यांनी कंपनीला अशी आयात शुल्कात सवलत देऊ नये, अशी मागणी केली आहे. टाटा मोटर्स आणि इतर कंपन्यांनी या आयात शुल्क कपातीस तीव्र विरोध केला आहे. इतर कंपन्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर त्याचा गंभीर परिणाम होईल, असा त्यांचा दावा आहे. यात टाटा मोटर्स शिवाय ओला कंपनीही अग्रेसर आहे. पण ह्युंदाई, बीएमडब्ल्यू आणि ऑडी इंडिया यांनी टेस्लाच्या मागणीला पाठिंबाही दिला आहे. आयात शुल्क कमी केल्यास कार्सची मागणी वाढेल आणि सर्वांनाच त्याचा लाभ होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. टेस्लाच्या आगमनाने मास मार्केटमध्ये ज्या कारचा दबदबा आहे, त्यांच्यावर मात्र फार मोठा परिणाम होणार आहे. पण कमी आयात शुल्क असल्याने स्थानिक स्वस्तातील कार्स उत्पादकांना अधिक तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. टेस्लाने वीस लाख रूपयांपासून कार उपलब्ध होतील, असे म्हटले आहे.त्यामुळे सामान्य वर्गाचे कार बाळगण्याचे स्वप्न साकार होईल. पण सरकारने मात्र सर्व कार कंपन्यांना लेव्हल प्लेईंग फिल्ड म्हणजे सर्वांना समान संधी दिली जाईल असे ही स्पष्ट केले आहे. पण टेस्लाच्या आगमनामुळे इतर विद्युत वाहनांच्या कंपन्यांना आपल्या भारतातील योजना लवकरात लवकर पूर्ण कराव्या लागतील. कारण त्यांना टेस्लाच्या स्पर्धेत हार स्वीकारता येणार नाही. भारतातील विद्युत वाहनांची बाजारपेठ म्हणजे केवळ इंटर्नल कंबस्शन इंजिन आणि विद्त वाहने यांच्यातील स्पर्धा एवढ्यापुरतेच मर्यादित नाही.

प्रवासी वाहनांची बाजारपेठ ही चार प्रकारात विभागली गेली आहे. त्यात विद्युत वाहनांना सीएनजीची जोरदार स्पर्धा आहे. या तुकड्या तुकड्यातील विभागणीमुळे प्रत्येक विभागात नवीच कंपनी अग्रगण्य नेता म्हणून उदयास येत आहे. टाटा मोटर्स आणि एमजी मोटर्स हे विद्युत वाहनांच्या कंपन्यांमध्ये नेते आहेत.

तर मारूती सुझुकी ही सीएनजीमध्ये बाजारपेठ काबीज करून बसललेली आहे. सध्याच्या घडीला इव्हीज म्हणजे विद्युत वाहने अगदी अलिकडे स्टार झालेली असली तरीही त्यांना हायब्रीड म्हणजे सीएनजी क्षेत्राकडून जोरदार स्पर्धेला लवकरच तोंड द्यावे लागेल. इव्हीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्याच समस्या टेस्लालाही भेडसावतील. म्हणजे बॅटरी चार्जिंगची, वेगवेगळ्या ठिकाणी चार्जिंग केंद्रे उभारण्याची समस्या अशा अनेक आहेत. त्यांना ग्राहक कसे स्वीकारतात, यावर टेस्लाचे भवितव्य अवलंबून असेल.

umesh.wodehouse@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -