Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखशिक्षकरूपी मार्गदर्शक ते आदर्श विद्यार्थी

शिक्षकरूपी मार्गदर्शक ते आदर्श विद्यार्थी

डॉ. वीणा त्यागराज खाडिलकर, मुंबई

आपल्यापैकी प्रत्येकास शिक्षक या शब्दाची ओळख आहे. या शब्दाशी परिचय नाही अशी व्यक्ती सापडणार नाही. साधारणपणे बालवाडीत प्रवेश घेण्यापूर्वी लहान मुलांच्या ‘प्ले ग्रुप’मध्ये मुलांना दाखल केले जाते. तिथूनच त्यांना शिक्षक या शब्दाशी ओळख होण्यास आरंभ होतो. शिक्षक म्हणजे काय? ते आपल्याला घडवण्यासाठी किती मेहनत घेतात? याची पुसटशी कल्पनाही त्या बालवयात नसते. जस जसे आपण शिक्षणाची पुढील पायरी गाठत जातो. तस तसे शिक्षकांचे आपल्या जीवनातील अमूल्य महत्त्व लक्षात येत जाते. विशेषतः बालवाडीत (ज्युनियर आणि सीनिअर केजी) शिकवणाऱ्या शिक्षकांची खरंच कमाल वाटते. कारण त्यांना मुलांना अक्षरे, अंक यांची ओळख करून देण्याचे आव्हान पेलायचे असते. कौतुकास्पद म्हणजे हे आव्हान (चॅलेंज) ते सहजपणे पेलतात. लहान मुलांना हाताळणे म्हणजे अत्यंत कठीण काम व ते सहजपणे करतात.

समोर विविध स्वभावाची मुले असतात. कोणी खोडकर, कोणी शांत, कोणी सतत रडणारे इत्यादी. असे असताना त्या मुलांना अक्षरे, अंक यांची ओळख करून देत घडवणे सोपे कार्य नाही. त्यांच्या जीवनाची शैक्षणिक सुरुवात जोमाने करण्यात या शिक्षकांचे असणारे योगदान कितीही उच्चशिक्षित झालो, उच्चपदस्थ असलो तरी विसरण्याचा कृतघ्नपणा करू नये. तशी काळजी घेतली पाहिजे. व्यक्ती जी घडते ती प्राथमिकपणे या शिक्षकांमुळेच. त्यानंतर घेत असलेल्या शैक्षणिक टप्प्यावर विविध शिक्षक भेटत जातात. त्यांचाही आदर राखला पाहिजे. असे सांगण्याचे कारण हेच की, माणसाच्या कानात अहंकाराचा वारा पटकन शिरतो. तो एकदा का शिरला की मग त्या व्यक्तीचे पाय जमिनीवर टिकत नाहीत. ज्याला आपण ‘याचे पाय कायम हवेत असतात’ असे म्हणतो.

काही मुलांना एकदा वाचले की, दीर्घकाळ स्मरणात राहाते; तर काहींना वारंवार उजळणी करावी लागते. असे असले तरी शिक्षणाच्या त्या वळणावर योग्य मार्गदर्शन करणारे शिक्षकच असतात. समोर ज्ञानाचा सागर असतो. पण त्यातून नेमके कोणते ज्ञान आताच्या शिक्षणाला अनुरूप आहे, हे शिक्षक सांगत असतात आणि त्यानुसार विद्यार्थी अभ्यासाची दिशा ठेवतात. समुद्रात जहाजांना दिशा दर्शन करण्यासाठी होकायंत्र तर असतेच. मात्र यासह दीपस्तंभही असतो. त्याचेही पुष्कळ साहाय्य होते. शिक्षक विद्यार्थ्यांना दीपस्तंभ आणि होकायंत्र असे दोन्ही बनून मार्गदर्शन करत असतात. भारताला गुरुकुल परंपरा आहे. गुरुकुल शिक्षणपद्धती ही भारताचा पाया आहे. प्राचीन काळी मुले गुरुकुलात शिकण्यासाठी जात असत आणि विविध विद्या – कला शिकून येत असत. यासह त्यांना नितीमत्ता – नैतिकता यांचेही बाळकडू गुरुकुलात दिले जात असल्याने ते आदर्श व्यक्ती म्हणूनही घडत असत. ध्यानसाधनाही त्यांच्याकडून करवून घेतली जात असे. त्यामुळे त्यांची नाळ नामस्मरणाशी जोडलेली असे. भारताने पुन्हा या शिक्षण पद्धतीकडे वळले पाहिजे.

शिक्षक विद्यार्थ्यांवर शाळा-महाविद्यालयांत ते असेपर्यंत लक्ष ठेवून राहू शकतात. पण त्यानंतर विद्यार्थ्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव असणे महत्त्वाचे असते. आपण कसे वागतो, बोलतो, सवयी, संगत या सर्वांवर भविष्यात होणारी जडणघडण अवलंबून असते. कोणीही शिक्षक सांगत नाही की, तुम्ही चुकीच्या सवयी अंगीकारा, त्यातच तुमचे भले आहे. पण तरीही समाजात चुकीच्या गोष्टींचा आलेख वाढता दिसतो. असे का? कारण योग्य काय आणि अयोग्य काय? यातील फरकच जाणून न घेता जे झगमगत असते त्यालाच भुलले जाते आणि मुलांकडून स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला जातो. चार समजुतीच्या चांगल्या गोष्टी सांगितल्या जात असताना शिक्षकांची चेष्टा केली जाते. ही वस्तुस्थिती आहे. असे करण्यास धजावले तरी कसे जाते? तरुण वयात बेभानपणे वागले जात असेल, तर त्याला वेळीच लगाम घातला पाहिजे. असे असले तरी संस्कारांचा पाया बालपणापासूनच भक्कम करणे गरजेचे असते. तसे असेल तर आयुष्यात चुकीच्या गोष्टींच्या आहारी जाण्यापासून स्वतःला रोखता येईल. कॉलेजला प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी शाळेच्या बंधनातून सुटल्याप्रमाणे मोकाट असतात. त्यांची केशरचना, पेहराव यांकडे बघून या बाबी लक्षात येतात. सर्वचजण असे करतात असे नाही. पण याचे प्रमाण जास्त आहे. वाणी अपशब्दयुक्त होऊन प्रसंगी शिव्यांचाही उपयोग केला जातो. आई – वडील हे आपले गुरू असतात याचे भान ठेवले जात नाही. त्यांनाही उलटसुलट बोलले जाते. ना शिक्षकांविषयी आदर ना पालकांबद्दल आदर. मग आदर नेमका होतो कोणाचा? तर स्वतःला हवे तसे जगण्याच्या बाबींचा आदर केला जातो आणि तसेच असायला हवे अशी व्यर्थ अपेक्षाही असते. पालक – शिक्षक यांना सुसंस्कारित पिढी हवी आहे. पण त्याचे प्रमाण खूपच कमी आहे.

शिक्षण एके शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी स्वतः अंतर्मुख होत आपण नक्की काय करत आहोत याचा विचार केला पाहिजे. केवळ बेभान आयुष्य जगण्याला अर्थ नाही. ज्यांनी ते टाळले ते जीवनात यशस्वी झाले. पद, पैसा, प्रसिद्धी यांचे आकर्षण वाटते. या मार्गावर असताना वाटचाल कशी असावी? आणि देश, समाज यांचा आदर करत त्यांच्या जडणघडणीत आपले योगदान कसे राहील याचा प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करायला हवा. असे केल्यास त्या त्या शाळा – महाविद्यालयांच्या शिक्षकांना चार चौघांना सांगताना अभिमान वाटेल की अमुक मुलगा – मुलगी हे माझे विद्यार्थी आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -