Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : स्वामी तीर्थ पाणी‚ अमृतावाणी !

Swami Samartha : स्वामी तीर्थ पाणी‚ अमृतावाणी !

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

माणसाच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर व्हावा, ज्ञानाच्या प्रकाशात त्याचे जीवन उजळून निघावे, भक्तांचा उद्धार व्हावा, लोकांच्या मनातील वैरभाव नष्ट व्हावा, अंधश्रद्धा नाहीशी होऊन धर्मश्रद्धा वाढावी, भक्ती दृढ व्हावी, यासाठी श्री स्वामी समर्थांनी या धरणीवर अवतार घेतला. लोक-कल्याण व्हावे व भक्ती वाढावी म्हणून श्री स्वामी समर्थांनी अनेकदा चमत्कारही केलेत.

एकदा भल्या सकाळी महाराज मैंदरगी नावाच्या गावी गेले. त्यांच्यासोबत किमान शंभर-दीडशे लोक होते. मैंदर्गीला आल्यावर महाराजांनी आपला मुक्काम गावाबाहेरच्या एका मठात केला. मठाच्या भोवताली हिरवीगार वनराई होती. झाडांवर पक्षी चिवचिवत होते. परिसर रम्य होता, त्यामुळे सर्वांना आनंद झाला. मठाच्या आवारात एक विहीर होती. ती विहीर खोल होती. किमान २० – २५ फुटांवर पाणी होते, पण ते पाणी दूषित होते. त्याचा वास येत होता. ते पाणी काहीच कामाचे नव्हते. मठाच्या आसपास कुठलीही विहीर किंवा नदी नव्हती, त्यामुळे लोकांना मोठी चिंता वाटू लागली. पाणी आणावे कोठून? हा मोठा प्रश्न होता. महाराजांनी मात्र निर्धास्तपणे तिथेच मुक्काम ठोकला. सकाळची वेळ असल्यामुळे काही लोकांनी गावात, तर काही लोकांनी कोसभर दूर जाऊन आंघोळी केल्या होत्या. येताना काहींनी थोडे पाणीही आणले होते, त्यामुळे काही जणांनी स्वयंपाक करून महाराजांना नैवेद्य दाखविला.

जेमतेम करून एक दिवस तर निघाला. दुसऱ्या दिवशी महाराज आपला मुक्काम अन्यत्र हलवतील असे सेवेकऱ्यांना वाटत होते, पण तसे काही चिन्ह दिसेना. मग भक्तगण विचारात पडले.

त्या शंभर – दीडशे लोकांमध्ये जे जुनेजाणते वयस्कर सेवेकरी होते, त्यांच्या कानांवर लोकांनी आपली अडचण घातली. त्या जुन्या सेवेकऱ्यांनीही स्वामींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण श्री स्वामींनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पाण्याचा प्रश्न काही सुटू शकला नाही. पाण्यासाठी लोकांचे फार हाल झाले. गावाबाहेर असलेल्या त्या मठातील विहिरीचे पाणी दूषित असल्यामुळे कोणी त्या विहिरीकडे फिरकतही नाही, अशी माहिती भक्तांना मिळाली.

दुपारच्या वेळी महाराज विश्रांती घेत होते. तिसऱ्या प्रहरी महाराज उठले आणि ताड्ताड् चालत विहिरीपाशी गेले. त्यांच्या हातात दोन फूट लांबीची एक काठी होती. त्यांच्या मागोमाग काही सेवेकरीही धावत गेले. महाराजांनी आपल्या हातातील काठी विहिरीत बुडवली. विहिरीचे पाणी वीस-पंचवीस फूट खोल होते, तर काठी फक्त दोन फुटांची होती. ती पाण्यात कशी बुडणार?, असा प्रश्न लोकांच्या मनात उभा राहिला. पण महाराजांची लीला महाराजच जाणोत !

महाराजांनी काठी बाहेर काढली व आपल्या नाकाला लावली. काठीचा वास घेऊन ती काठी परत पाण्यात बुडवली आणि काठीला लागलेले पाणी समोरच्या एका झाडावर शिंपडून ते माघारी वळले आणि आले तसेच मठात निघून गेले. हा प्रकार बघून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. महाराजांच्या लीला अगाध, अगम्य होत्या. त्यांच्या कृतीचा अर्थ लोकांना उशिरा कळत असे.

एका सेवेकऱ्याला तहान लागली होती, पण पाणी तर नव्हते म्हणून विहिरीपाशी येऊन त्याने पाणी काढले. त्याने चूळ भरली, तर त्याला पाणी गोड लागले. पाण्यातील दुर्गंधी नाहीशी होऊन पाणी स्वच्छ, पिण्यायोग्य झाले होते. त्याने ओरडून सर्वांना ही गोष्ट सांगितली तेव्हा सेवेकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वामींच्या कृतीचा अर्थ आता सर्वांच्या लक्षात आला. लोक-कल्याणासाठी महाराजांनी दूषित पाण्याची विहीर गोड पाण्याची केली होती व स्वामी कृपेने तुडूंब भरली होती व गावातील पाण्याचा दुष्काळ दूर झाला.गावकऱ्यांना जेव्हा ही वार्ता समजली, तेव्हा शेकडो लोक महाराजांच्या दर्शनाला व गोड पाण्याची विहीर पाहायला आले. सर्वांनी महाराजांच्या नावाचा जयजयकार केला. महाराजांच्या कृपेने गावकऱ्यांची तहान भागणार होती. सर्व गावकरी भक्तिरसात नाचू लागले.

स्वामींचा जगभर भक्तिसागर

बाबा महाराजकरिती माझाच प्रचार
बेलसरे गुरुजी वाढविती माझाच विचार ||१||
वामन देशपांडे माझाच विचार
हाटेबुवा माझाच प्रचार ||२||
कोचरेकर केले शिष्य हजार
बारस्कर वाटले प्रसाद हजार ||३||
तावडे नलावडे शिष्य हजार
मोठेमोठे भक्त दशहजार ||४||
अयोध्येतही मी करतो वास
काशी विश्वेश्वर माझा आवास ||५||
कृष्णाची मथुरा माझे आवास
बारा ज्योर्तिलिंगात माझाच प्रवास ||६||
अष्टविनायकात ही माझाच आवास
नवदुर्गेतही माझाच आवास ||७||
काश्मीर ते कन्याकुमारी वेगाने प्रवास
गुजरात ते कोलकाता माझा प्रवास ||८||
भारत देशात माझीच देवळे
परदेशातही माझीच देवळे ||९||
नको मला काही ओवळे सोवळे
वाटतो भक्तीचे सोने पिवळे ||१०||

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -