Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : “सद्गुरू कृपेवाचून सर्व व्यर्थ!”

Swami Samartha : “सद्गुरू कृपेवाचून सर्व व्यर्थ!”

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

खरे काय आहे ते पाहण्यासाठी वामनबुवा बडोदेकर अक्कलकोटास आले. तेव्हा श्री स्वामी समर्थ हदरे या गावी होते. दुसरे दिवशी रोगी व मिरगी या दोन गावांमधील पायोनदीत श्री स्वामी समर्थानी बुवांस दर्शन दिले आणि म्हणाले, “काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस?” अशी खूण पटताच वामनबुवांनी स्नान वगैरे केले. श्री स्वामी महाराजांचे पूजन करून त्यांना प्रार्थना केली की, “महाराज मजला अनुग्रह द्यावा.”

बुवांनी असे म्हणताच श्री स्वामी महाराजांनी त्याजकडे ‘अवधूत गीता’ टाकून ते म्हणाले, “आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि गाठोडे आम्हास दे.” नंतर वामनबुवांनी लंगोटी नेसून सर्व सामान श्री समर्थांपुढे ठेवले. श्री स्वामी महाराजांनी ते परत दिले.

अक्कलकोटला जाऊन खात्री करून घ्यावी, असेच वामनबुवांसह त्यांच्या सर्व विद्वान मित्रांना वाटले. कारण त्या तेज:पुंज ब्राह्मणाने त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले, “सद्गुरू कृपेवाचून त्यांच्या पांडित्यपूर्ण चर्चांचा काथ्याकूट सर्व व्यर्थ आहे!” ते सर्व काय समजायचे ते समजून चुकले. तो ब्राह्मण कुठे गेला, हे शोधत असता तो त्यांना कोणासही दिसला नाही. श्री स्वामी समर्थांनीच (ब्राह्मण रूपात) त्या विद्वानांच्या कोंडाळ्यात येऊन सद्गुरूंबाबत मार्गदर्शन केले. इथेच त्यांना आश्चर्याचा धक्का त्यांनी दिला. दिव्यत्वाची प्रचिती त्यांना आली. आता श्री स्वामींना हात जोडण्यासाठी आणि दर्शनासाठी बुवा अक्कलकोटला निघाले.

येथे घटना कशा घडत गेल्या, त्या समजून घेतल्या पाहिजेत. विद्वान वामनबुवांस कार्यप्रवण करण्यासाठी, त्यांच्या चिकित्सक; परंतु अस्थिर चित्ताला शांत करण्यासाठी श्री स्वामींनी ब्राह्मण वेशात येऊन अक्कलकोटला येण्याचे सूचित केले. अक्कलकोटला आल्यावर बुवांसारख्या विद्वानाला “काय रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस?” असे सांगून श्री स्वामींनी बुवांस त्यांच्या सर्व व्यापकतेची खूण पटवून दिली. श्री स्वामींच्या या उद्गाराने वामनबुवाच काय, पण कुणीही आश्चर्यचकित होईल. झालेही तसेच. बुवा श्री स्वामींपुढे शरणागत झाले, दीपून गेले की, त्यांच्या सवयीनुसार त्यांना श्री स्वामींशी चर्चा करण्याची, शंका-कुशंका विचारण्याची आवश्यकताच वाटली नाही. हेच आपले सद्गुरू, या चरणांशिवाय अन्य दुसरे चरण नाही, अशी त्यांची मनोमन भावना झाली. त्यांचा अहंपणा, विद्वत्तेचा ‘मी’पणा सारे काही श्री स्वामींजवळ विरघळून गेले.

श्री स्वामींची यथोचित पूजा करून, “महाराज, मजला अनुग्रह द्यावा” म्हणून बुवांनी प्रार्थना केली. गुरुशरण अवस्थेत आलेल्या बुवांकडे श्री स्वामींनी ‘अवधूत गीता’ टाकली. “त्यांची नोकरी कर” म्हणून बुवांस सांगितले. वामनबुवा खरोखर भाग्यवानच. कारण त्यांना साक्षात परमेश्वर सद्गुरू श्री स्वामी समर्थ चाकरी (नोकरी) करावयास सांगतात, कोणती नोकरी? तुमच्या माझ्या कल्पनेपेक्षा वेगळी नोकरी. श्री स्वामींच्या व्यापक, सर्वस्पर्शी, कालातीत आचार-विचार धर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची चाकरी. वामनबुवांनी श्रीगुरुलीलामृतासारखी ५५ अध्यायी ९७५७ ओव्या, ७२० पृष्ठांची अजरामर अशी श्रीगुरुलीलामृत नावाची पोथी लिहिली. या लोकप्रिय पोथीने वामनरावजी वैद्य हे ब्रह्मनिष्ठ झाले, अजरामर बनले. बुवांचे गाठोडे श्री स्वामींनी घेतले याचा मथितार्थ बुवांचे जे काय प्रारब्ध होते, ते श्री स्वामींनी स्वतःकडे घेतले. बुवांचेही चित्त आता शांत झाले होते, त्यांना हवा तसा सद्गुरू भेटला होता. बुवा लंगोटी नेसले व श्री स्वामींकडे सामान सुपूर्द केले. श्री स्वामींनी ते बुवास परत दिले. वामनबुवा वैद्यांच्या स्थित्यंतरातून आपणा सर्वांसही काही बोध घेता येईल का? याचे आत्मचिंतन करावयास लावणारी ही लीला आहे.

“नववर्ष समर्थ स्वागत गीत”

नववर्ष आले
इंद्रधनुष्याचे रंग
उधळीत आले॥१॥
समर्थांचे स्वागतास
रविराज आले
सात घोड्यांचा रथ
घेऊन आले॥२॥
स्वामींच्या स्वागतास रविकिरण आले
समर्थच जणू पृथ्वीवर आले॥३॥
स्वामी समर्थ माझे आई
धाव पाव घ्यावा आई॥४॥
स्वामी समर्थ माझे बाबाआई
खरेखरे ते साईबाबा साई॥५॥
स्वामी समर्थ ताई-माई-आई,
तेच माझे मुक्ताई बहिणाबाई॥६॥
अक्कलकोटच माझे
माहेर आई
केव्हा भेटण्यास येऊ मी आई॥७॥
स्वामींचा मठच वाटे आई
काशी, गया आणि वाई॥८॥
श्री गुरू स्वामी समर्थ
जय जय स्वामी समर्थ॥९॥
तुम्ही दिलात जगण्याला अर्थ
सारे काम करतो मी निःस्वार्थ॥१०॥
गरिबांच्या सेवेत खरा अर्थ
अपंगांची सेवा हाच परमार्थ॥११॥
गरीब भुकेलेल्या अन्नदान
राष्ट्रासाठी देईन देहदान॥१२॥
स्वामी म्हणती व्हा मोठे
गोमातेसाठी बांधा गोठे॥१३॥
पराक्रमाने महाराष्ट्र करा मोठे
एकतेने राष्ट्र करा मोठे॥१४॥
स्वामींसाठी गुलाबाचा ताटवा
देह स्वामीचरणी वहावा॥१६॥
सुगंधात शरीराचा रोमरोम वहावा
आत्म्याने आपलाच देह पहावा॥१७॥
ओंकार स्वरूपात प्रवेश करावा
सारा देह सुगंधी-चंदन व्हावा॥१८॥
चंद्राला टाटा करिती सहर्ष
रवी किरणांचा गुलाबी स्पर्श॥१९॥
समर्थ म्हणती तुम्ही व्हा मोठे
स्वामी करतील तुम्हाला मोठे॥२०॥
देशसेवेने राष्ट्र करा मोठे
मुला-मुलींनो तुम्ही व्हा मोठे॥२१॥
चला स्वामी आले नववर्ष
झाला साऱ्यांना आनंद हर्ष॥२२॥
इमान जागृत ठेवा मातीशी
जागृत राहा भारत मातेशी॥२३॥
सारे जग तुझ्या पाठीशी
भिऊ नको स्वामी तुझ्या पाठीशी॥२४॥
बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -