Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजऐतिहासिक काळातील किंजवड्याचे स्थानेश्वर मंदिर

ऐतिहासिक काळातील किंजवड्याचे स्थानेश्वर मंदिर

कोकणी बाणा: सतीश पाटणकर

कोकण प्रदेशातील मंदिर बांधकामासह त्यातील काष्ठशिल्पाकृती हा आमच्या प्राचीन कलेचा वारसा आहे. नैसर्गिक पार्श्वभूमीच्या कोकण भूमीवरील सर्वच मंदिर शिल्प उभारताना शिल्पकारांनी परिसरातील भौगोलिक वातावरणाचा पर्यावरणासह अभ्यास केल्याचं जाणवतं. इतकंच नव्हे, तर मंदिर वास्तू नैसर्गिक वातावरणातच असावी, असा जणू आग्रह होता. अनेक राजकीय स्थित्यंतरातून प्रवास करताना त्या त्या राजवटीचा प्रकार जसा कोकणाच्या मंदिर उभारणीवर पडलाय, तसेच त्याला अनुसरून नागर-भूमिज-वेसर वा द्रविड शैलीची मंदिरे उभी राहिली.

कोकण प्रदेशातील जवळजवळ सर्वच मंदिरांना अवतीभवतीच्या वातावरणातील निसर्ग, पाण्याचा नैसर्गिक स्रोत तसेच पशू-पक्ष्यांचा अधिवास जसा लाभलाय, त्याचबरोबर बऱ्याच मंदिरांच्या प्रवेशद्वारीच्या दीपमाळा हे एक खास वैशिष्ट्य आहे. दीपमाळ निर्मितीसाठी प्रामुख्याने दगडांचा उपयोग केला गेला आहे. दगडाच्या वरील भागी निमुळता होणारा स्तंभ तयार करून तो दगडी चौथऱ्यावर बसवला जातो, त्यावर दगडाचेच पद्धतशीर ठरावीक अंतरावर हात बसवून या दीपमाळा तयार केल्या जातात. विविध उत्सव व सप्ताहप्रसंगी यावर पणत्यांची आरास साकारून जी रोषणाई केली जाते, त्यातून मंदिराचं अनोखं सौंदर्य जास्तच खुलतं.

देवगड तालुक्यात अनेक ग्रामदेवतांची मंदिरे, दर्गा, त्यातील काष्ठशिल्पाकृती प्राचीन कलेचा वारसा जपणारी आहेत. धार्मिक पर्यटक व अभ्यासकांचे ते मोठे आकर्षण आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी तालुक्यातील अशा छोट्या-मोठ्या पण आजपर्यंत दुर्लक्षित असलेल्या स्थळांकडे आता पर्यटक वळू लागले आहेत. किंजवडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. इतिहास काळात गावचा राजा देव मानून कारभार चालवण्याची पद्धत होती. ही गावे देवस्थान इनाम राहिली आहेत. अशाच प्रकारचे देवगड तालुक्यातील किंजवडे गावातील ऐतिहासिक काळातील स्थानेश्वराचे तीनशे वर्षांपूर्वीचे जुने आहे. शिवाचे प्रतीक असलेले हे देवस्थान स्वयंभू असून देवगड तालुक्यात अशी चारच देवस्थाने पाहावयास मिळतात. आकारातील सात्त्विक देवस्थान म्हणून हे ओळखले जाते.

देव स्थानेश्वराच्या पिंडीच्या स्थापनेची दंतकथा सांगितली जाते. किंजवडे गावातील एक शेतकरी आपल्या शेतात फावड्याने बांधाजवळील माती खणताना माती खाली असलेल्या दगडाला फावडे लागल्याने रक्त वाहू लागले. त्याचे आश्चर्य वाटून त्याने आजूबाजूच्या लोकांना हाका मारून तो चमत्कार दाखवला. त्यांनी दगडाच्या आजूबाजूची माती बाजूला केली, तेव्हा तो दगड म्हणजे स्वयंभू शंकर असल्याची सर्वांची खात्री झाली. त्यांनी नमस्कार करून झाल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली आणि त्या जागेची शुद्धी करून त्याच जागी पिंडीची स्थापना करून ब्राह्मणाकडून पूजा केली. ज्या भागात शिवलिंग सापडले ते नदीकडील पवित्र स्थान असल्याकारणाने त्याला स्थानेश्वर असे नाव ठेवण्यात आले.

दररोज पूजा-नैवेद्य करण्यासाठी हरीभट नावाच्या भटजीची नेमणूक केली. त्या काळी देवासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनी उभे केलेले देवालय हे काठ्या-बांबूचे होते. एके दिवशी जोराचा वारा सुटून देवळावरील गवत उडून ते पेटत्या पणतीवर पडल्याने गवताने पेट घेतला. आता देऊळच जळून खाक होणार हे जाणून हरीभटाने स्थानेश्वराच्या पिंडीला मिठी मारली आणि देवालयाबरोबर हरीभट जळून गेला. तेव्हापासून देवाबरोबर लोकांना हरीभटाचे स्मरण राहावे म्हणून हरीभट – स्थानेश्वर असा उल्लेख केला जातो. नंतर देवालयाच्या जागी गावकऱ्यांनी नवीन दगडांचे लहानसे देवालय उभे केले आणि पूर्वीप्रमाणेच तेथे पूजाअर्चा होऊ लागली.

एकदा कोल्हापूरचे शिवभक्त छत्रपती शंभू राजे शिकारीनिमित्त किंजवडे गावी आले असता त्यांनी स्थानेश्वराचे दर्शन घेतले आणि शंभू महादेवा आपण स्वयंभू आहात, माझी मनोकामना पूर्ण झाल्यास मी आपली सेवा करीन, अशी स्थानेश्वराला प्रार्थना केली. स्थानेश्वर कृपेने त्यांचे मनोरथ पूर्ण होताच त्यांनी पुन्हा येऊन देवदर्शन घेतले आणि आपण या ठिकाणी स्थानेश्वराचे भव्य मंदिर बांधणार असल्याचे त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. आजचे भव्य-दिव्य असे चिरेबंदी, नक्षीदार खांब आणि देखावे असलेले मंदिर त्या वेळी छत्रपती शंभूराजे यांच्याकडून बांधले गेले आहे. त्याचबरोबर किंजवडे व तोरसोळे गाव देवस्थानच्या कारभारासाठी इनाम म्हणून दिले.

देवस्थानाचा कारभार उत्तम प्रकारे चालावा तसेच आर्थिक व्यवहार सांभाळावा यासाठी विश्वस्त नेमले गेले. देवाची पूजा, नैवेद्य, देवळात होणारे वार्षिक उत्सव, देवसेवक यांचा सर्व खर्च भागवण्यासाठी जमिनीचा महसूल त्यांच्याकडे जमा करण्यात येऊ लागला. कालांतराने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. कोटकामते येथील श्री देवी भगवती संस्थानासारखाच या देवस्थानाचा थाटमाट असतो. गावकऱ्यांचा असा समज आहे की, या देवाची पूजा ही तेव्हाच संपन्न होते, जेव्हा हरीभट यांचीही लोक पूजा करतात. देव आणि भक्त यांची सुरेख जोडी देव स्थानेश्वराच्या ठिकाणी पाहायला मिळते. मंदिराच्या बाजूला घाट आहे. त्याच्या जवळून अन्नपूर्णा नदी वाहते. भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा स्थानेश्वर भक्तांचे चिरंतन श्रद्धास्थान आहे. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -