Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखश्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली

श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली

सेवाव्रती: शिबानी जोशी

डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या कोणालाही “गणेश मंदिर संस्थान” माहीत नाही अशी एकही व्यक्ती सापडायची नाही. आज या संस्थानाची माहिती देण्याचं कारण म्हणजे यंदा संस्थानला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. एका छोट्याशा कौलारू वास्तूत सुरुवात झालेल्या या संस्थानाचे कार्य आता अनेक क्षेत्रात डोंबिवलीभर विस्तारले आहे.

सुमारे शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी डोंबिवली विस्तारली नव्हती. या परिसरात मालगाड्या थांबवून वॅगन फोडीचे प्रकार वरचे वर होत असत. त्याला आळा बसावा या उद्देशाने तत्कालीन सरकारने सुशिक्षित मध्यमवर्गाची वसाहत वसविण्यासाठी विविध सरकारी खात्यांमध्ये काम करणाऱ्या मंडळींना अतिशय कमी किमतीत जमिनी काही लीजवर तर काही विकत दिल्या आणि साधारणतः १९१५ सालाच्या आसपास डोंबिवलीत मध्यम वर्गाची वसाहत सुरू झाली. १०० वर्षांपूर्वी लोकवस्ती सुमारे तीन ते चार हजारांच्या आसपास असावी. वस्ती निर्माण झाली की सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम सुरू होतातच. घरी एखादं लग्न, मुंज असं कार्य आलं की शुभ कार्यापूर्वी देवळात जाण्याची परंपरा आहे. पण त्यासाठी या भागात मंदिरच नव्हतं. तसेच सर्वांना एकत्र बसून भेटण्यासाठीही स्थान नव्हते, काही उपक्रम करायचे असतील, तर एक ठिकाण नव्हते.

“ग्रामदैवतेशिवाय गांव अपूर्ण आहे” या जाणिवेतून काही समविचारी, हौशी लोकांनी लोक वर्गणीतून गणेश मंदिराची निर्मिती केली. संस्थानची घटना वाचली, तर लक्षात येईल की, केवळ धार्मिक हेतू ठेवून गणेश मंदिर संस्थानची निर्मिती झाली नसून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीही यथायोग्य कार्य करणे हा संस्थानाचा उद्देश राहिलेला आहे. यंदा संस्थान शंभराव्या वर्षांत पदार्पण केल्यानिमित्ताने या वर्षभरात डोंबिवलीकरांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. यानिमित्ताने एक विशेष अशी परिषद आयोजित केली गेली होती, ती म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांच्या विश्वस्तांची परिषद. या परिषदेत “मंदिर व्यवस्थापन, सामाजिक समस्यांमध्ये मंदिरांची भूमिका” या विषयावर चर्चासत्र झाली आणि मंदिर संस्थान सामाजिक कार्यात कसा हातभार लावू शकतात यावर चर्चा झाली. त्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त ‘महारक्तदान शिबीर’, ‘सामवेद निरूपण’, सुदर्शन याग’, ‘बालगोकुळम्’ ही बालगोपाळांसाठी वेशभूषा स्पर्धा, ‘आरोग्य शिबीर, तीनदिवसीय धन्वंतरी व्याख्यानमाला’, ‘सांस्कृतिक कला महोत्सव, तीन दिवसांची व्याख्यानमाला’, गीताजयंतीनिमित्त ‘सामुदायिक गीता पठण’, ‘संगीत महोत्सव’, राष्ट्रभक्तीपर गीतांवर आधारित पुढच्या वर्षी अयोध्येतील भव्य अशा श्री राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानिमित्ताने उद्घाटन दिनी भव्य असा विशेष कार्यक्रम होणार आहे. त्याशिवाय शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागासह जागतिक सूर्यनमस्कार दिन, ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’, ‘भाषाप्रभू पु. भा. भावे व्याख्यानमाला असे कार्यक्रम होतीलच.

सुरुवातीला छान छोटसं कौलारू मंदिर होतं. हळूहळू दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आज दिसत असलेलं मंदिर आणि इतर सामाजिक कामं उभी राहिली आहेत. मुख्य कार्य मंदिर असलं तरीही “जनसेवा हीच ईश्वर सेवा” हे मानून सामाजिक बांधिलकी पहिल्यापासूनच संस्थानने जपली आहे. १९३६ साली गणेश मंदिर सर्व जाती-जमातींच्या हिंदू स्त्री-पुरुषांस प्रवेशासह दर्शनासाठी खुले असल्याचा ठराव करण्यात आला, हे सुद्धा एक पुरोगामी पाऊलच त्या काळात उचललं गेलं होते. आज आपण काही ठिकाणी महिला पुजारी पाहतो; परंतु डोंबिवलीच्या गणेश मंदिरात पहिल्या दिवसापासून गोडबोले मावशींसारख्या महिला पहिली चार वर्षे दररोज गणपतीची पूजा करत होत्या. त्यांना अतिशय कमी असं मानधन दिले जात असे. ते मानधनही जमवून त्यांनी याच गणपती मंदिराच्या झाडाजवळ पार बांधून घेतला होता. गोडबोले मावशींप्रमाणेच माटे काकूंनी देखील काकड आरती उपक्रम देवळात सुरू केला. आजही हा काकड आरती उपक्रम सुरू आहे. सकाळच्या आरतीला आजही शंभर, दीडशे माणसं सहज जमतात. गणपतीला काकड आरती, भूपाळीपासून रात्रीच्या शेजारतीपर्यंत सर्व उपचार दररोज अव्यवहार्तपणे सुरू असलेले हे मंदिर आहे. वर्षाचे ३६५ दिवस कीर्तन, प्रवचन सेवा आणि दैनंदिन अभिषेक अव्यवहार्तपणे सुरू असणाऱ्या मोजक्या मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. इतर कार्यांबरोबर उत्तर क्रिया, दशक्रिया या अंतिम विधींसाठी देखील सोय व्हावी म्हणून या विधींसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे.

स्थानिक हिंदू संस्थांना कार्यक्रम करायला जागा उपलब्ध नसे म्हणून त्यांना कार्यक्रमांसाठी सभागृहाची जागा दिली जाऊ लागली आहे. १९६३ पासून धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना आर्थिक मदत देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. आजपर्यंत अनेक संस्थांना असं आर्थिक सहकार्य करण्यात आलं आहे. इथला सार्वजनिक गणेशोत्सव आणि माघी गणेशोत्सव डोंबिवलीतील एक खास वैशिष्ट्य ठरत आहे. गणेशोत्सवही शंभरीकडे पावलं टाकत आहे आणि माघी गणेशोत्सव प्रधान दैवत म्हणून गेली २० वर्षं सुरू आहे. धार्मिक अधिष्ठान व त्याबरोबरच असलेली सामाजिक दृष्टिकोनाची जोड यामुळे विश्वस्त मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम सुरू केलेत. वैद्यकीय सेवेत गरजू रुग्णांना आर्थिक मदतीचा हात, नेत्रदान जनजागृती अभियान, नोंदणी, रक्तदान, वैद्यकीय शिबिरे, चाचण्यांचे आयोजन, ‘निरोगी भारत’ मासिक व्याख्यानमाले दरम्यान विविध डॉक्टरांच्या व्याख्यानांचं आयोजन केलं जातं.

सामाजिक उपक्रमात नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना सहकार्य, जलसंवर्धनासाठी लोकसहभागातून विविध उपक्रम, सेवावृत्तीने कार्य करणाऱ्या संस्थांसाठी सर्व सोयीसह सुसज्ज पाच सभागृह, अंत्येष्टी क्रियाकर्म स्वतंत्र कक्ष, देशाची भावी पिढी सुदृढ व्हावी म्हणून “रिंक ओपन जीम” असे अनेक उपक्रम आबाल वृद्धांसाठी वर्षभर होत असतात. पर्यावरणाच्या असंतुलनामुळे निर्माण झालेले प्रश्न पाहता त्यासाठी खारीचा वाटा उचलावा म्हणून निर्माल्यापासून खतनिर्मितीसाठी ‘श्रीगणेश निर्माल्य प्रकल्प’ राबवला जातो•. देवळातलं तसंच नागरिकांनी ठेवलेलं निर्मल्य जमवून त्याचं खत केलं जातं. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती, आकाशकंदील, नैसर्गिक रंग बनविण्याच्या कार्यशाळाचं आयोजन केलं जाते. परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शनपर व्याख्याने, योग, तत्त्वज्ञान, अध्यात्म, प्राणायम, संस्कृत गीता पठण, पार्थिव पूजन बाबत कार्यशाळा घेतल्या जातात. “वाचाल तर वाचाल” असं म्हटलं जातं आणि “ग्रंथ हे खरे गुरू आहेत” असे म्हटले जाते. संस्थानावर विश्वास ठेवून महापालिकेने एक ग्रंथालय संस्थेला चालवायला दिलं असून, ज्यांच यंदा १२५ व जयंती वर्षं आहे, ते ज्येष्ठ नाटककार, कवी, निर्माते आचार्य अत्रे यांच्या नावाने वाचनालय सुरू आहे. इथे मोफत वृत्तपत्र वाचनालय सुरू असतं. आज सर्वत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी दिसत असताना इथे मात्र सुमारे २५०० सभासदांसह सुमारे ५२००० पुस्तकं, मासिक उपलब्ध आहेत. २५० विद्यार्थी बसू शकतील अशी सुसज्ज वातानुकूलित संगणकीय सोयीने युक्त अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केली आहे. गृहिणी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र,दृष्टिहिन विद्यार्थ्यांसाठी ध्वनिमुद्रित पुस्तकालयाची सोय, वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी टॅली, अकाऊंट्स लेखन व टॅक्सेसबाबत मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी एका संस्थेबरोबर कार्यक्रम हाती घेतला आहे.

संगीत क्षेत्रातील तरुण तसेच अनुभवी कलाकारांसाठी ‘रविवारीय संगीत सेवा” म्हणजे संगीत प्रेमींना सुरांची मेजवानीच असते. दिवाळी पहाटनिमित्त ‘युवा शक्ती भक्ती दिन’ आयोजन, ‘वार्षिक संगीतोत्सव’, विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जाते. संगीत महोत्सवात आत्तापर्यंत राहुल देशपांडे, महेश काळे, उपेंद्र भट, शौनक अभिषेकी, आरती अंकलीकर, अजित कडकडे, सावनी शेंडे असे अनेक कलाकार संगीताची मेजवानी देऊन गेले आहेत. हिंदू धर्मातील प्रत्येक सण उत्साहन साजरे होतो. हे मंदिर संस्थान केवळ ज्येष्ठच नाही तर तरुणाईचही एक आकर्षणाच केंद्र ठरत आहे. सध्या आपण गुढीपाडवा शोभायात्रा जागोजागी मोठ्या प्रमाणात साजरा होताना पाहतो, पण त्याची सुरुवात डोंबिवली येथे झाली आणि त्याला देखील याच गणेश मंदिर संस्थानच आयोजन लाभल होत. डोंबिवलीची शोभायात्रा हा डोंबिवलीचा एक मानबिंदू ठरला आहे. ही शोभा यात्रा पंचवीस वर्षं आयोजित केली जात आहे.

असंख्य ज्येष्ठ कलावंत, संत, महंत, नेते यांनी संस्थानाला भेट दिली आहे. सज्जन गडावरील पू. श्रीधर स्वामी, तसेच संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या पदस्पर्शाने गणेश मंदिर पावन झाल आहे, साधारण १९७८-७९ या काळात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येऊन प्रशस्त सभामंडप आणि वैशिष्ट्य पूर्ण कळसा सहित गणेश मंदिराची सुंदर नवीन वास्तू उभी राहिली.  या मंदिराला डोंबिवलीचं ग्रामदैवत मानलं जातं. आणि एखाद्या ग्रामदैवताप्रमाणेच गणेश मंदिर संस्थान डोंबिवलीकरांच्या सर्व समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न करत असत. डोंबिवलीची  वाढती लोकवस्ती आणि बदलती जीवन शैली यामुळे विविध आजार आणि त्यावरील उपचार हे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर होत गेले. रक्त तपासणी, क्षकिरण, ई, तपासण्या आवश्यक होत गेल्या. श्री गणेश मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांनी अतिशय कमी दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.

अध्यक्ष आबासाहेब पटवारी आणि उपाध्यक्ष बंडोपंत कानिटकर यांच्या पुढाकारान श्रीखंडे वाडी येथील डॉ. पटवर्धन यांच्या अक्षय हॉस्पिटलमधील काही जागा भाड्याने घेण्यात आली आणि एप्रिल २००० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरू  डाॅ. स्नेहलता देशमुख यांचे हस्ते “गणेश अल्ट्रा सोनोग्राफी सेंटरचे” उद्घाटन करण्यात आले. अतिशय माफक दरात दर्जेदार सोनोग्राफी सेवा उपलब्ध होत असल्यामुळे शहरातील तसेच शहरा बाहेरील ग्रामीण भागातीलही अनेक गरजू व्यक्ती त्याचा लाभ घेत आहेत. “गणेश वाटिका” हा एक वेगळाच उपक्रम संस्थेने सुरू केला. गणेश वाटिकेच्या जागी सुमारे १९४० साला पूर्वी “बलवंत व्यायाम शाळा” नावाची  प्रसिद्ध व्यायाम शाळा होती. त्या काळातील गांवातील बहुतेक तरुण मंडळी तेथे बलोपासना करीत असत. ही व्यायाम शाळा” हे गांवातील तरुणांचे आकर्षणाचे आणि एकत्र जमण्याचे ठिकाण होते; परंतु हळूहळू तेथील काम मंदावत गेलं आणि अचानक एकदा कुठलीही कल्पना नसताना एक दिवस व्यायाम शाळेची वास्तू नेस्तनाबूत झालेली दिसली. महानगरपालिकेने ती पाडल्याचे कळलं. व्यायाम शाळा पाडल्यावर त्या मोकळ्या जागेवर वस्ती आणि अनधिकृत कामे होऊ नये या उद्देशाने २००० च्या सुमारास नगरसेवक कै. नंदू जोशी यांनी मंदिराच्या विश्वस्तांशी संपर्क साधून सदर जागेचा ताबा घेऊन काही उपक्रम चालू करावे असे सुचविले. खास ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांतीसाठी स्थान निर्माण करावे या हेतूने गणेश मंदिराच्या विश्वस्तांनी २००१ च्या सुमारास त्याजागी “गणेश वाटिका” नामक बागेची निर्मिती केली. तत्कालीन विधानसभेचे सभापती अरूण गुजराथी यांचे हस्ते “गणेश वाटिकेचे” उद्घाटन झाले.

महानगरपालिकेने संस्थेला चालवायला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान विकसित करून सुसज्ज बनवून लहान मुलांना खेळायला उपलब्ध करून दिलं आहे. अशा तऱ्हेने गणेश मंदिर संस्थान हे डोंबिवलीकरांचे धार्मिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक केंद्र बनले आहे. या शतक महोत्सवी वर्षात मंदिराचे सुशोभीकरण, डोंबिवली पश्चिम येथे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा आणि विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिकेचा संकल्प संस्थानच्या विश्वस्त मंडळाने केला आहे.

joshishibani@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -