Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सMarathi theatre : मराठी रंगभूमीवरील काही महत्त्वाचे टप्पे

Marathi theatre : मराठी रंगभूमीवरील काही महत्त्वाचे टप्पे

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

मराठी रंगभूमी “रंगभूमी दिन” साजरा करावा इतपत प्रौढ आणि प्रगल्भ झालेली आपण अनुभवतो आहोतच. गेल्या ३५० वर्षांच्या कालखंडात मराठी रंगभूमी नामक वटवृक्षाच्या शाखा देखील फोफावू लागल्या होत्या, तर काही विकसित न होता गळून पडल्या होत्या. लोकरंगभूमी प्रादेशिक असल्याने विकसित झालेल्या मराठी रंगभूमीचा प्रभाव पडणे अपरिहार्य होते. पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात तमाशा, दशावतार, खेळे आदी लोककलांनी पारंपरिक तत्त्व ठेऊन सादरीकरणात अनेक बदल घडवून आणले. तांत्रिक बदलांनी तर या लोककलांचे प्रेक्षकप्रिय निकष व्यावसायिक मराठी नाटकाशी साधर्म्य साधू लागले. दशावतारात रंजकता वाढावी म्हणून ट्रिक सीन्सनी लोकप्रियता गाठलेली आज दिसते आहे. पारंपरिक पूर्वरंग आणि उत्तरंगापैकी, पूर्वरंगाला फाटा देऊन काही दशावतारी मंडळे उत्तरंगातील आख्यानाला सुरुवात करतात आणि प्रेक्षकही या बदलाच्या विरोधात नाहीत. हीच गोष्ट तमाशाबाबतही आढळून आली आहे. लावणी हे तमाशातील किंवा वगातील रंजकतेचे हमखास अस्त्र समजले जाते. आज केवळ लावण्यांचे कार्यक्रम जन्माला घातले जातायत. गण, गौळण, बतावणी आणि वग हा सादरीकरणाचा क्रम तर केव्हाच मोडून पडलाय. अगदी विदर्भातील दंडार, खडीगम्मतही हा बदल लक्षात येतो. विदर्भात तर लोककला मिश्रित “झाडीपट्टी” नामक नव्या नाट्यप्रकाराला सुरुवात झाली आहे. काही नाट्यअभ्यासक या नाट्यप्रकाराला इतिहास असून तो इतर लोककला प्रकारांप्रमाणेच आदीम असल्याचाही दावा करीत आहेत; परंतु मराठी रंगभूमीची ती एक विकसित होऊ पाहाणारी शाखा आहे, याबाबत दुमत होऊ शकत नाही.

सिनेमा माध्यमाप्रमाणे मराठी व्यावसायिक नाटक देखील “मेन स्ट्रीम कॅटेगरीत” गणले जाऊ लागले आहे. व्यावसायिक नाटक जेव्हा या लोककलेच्या आधारे सादर केले जाते, तेव्हा त्यातील कथाबीज अथवा सादरीकरणाची पोत सांभाळण्याचे प्रमुख काम ती लोककला करत असते. मराठी रंगभूमीवर अशा अनेक नाटकांची उदाहरणे आपणास देता येतील. विच्छा माझी पुरी करा ते ओक्के हाये एकदमपर्यंतची तमाशा प्रधान नाटके, तसेच अलवरा डाकू, वस्त्रहरण, आर्य चाणक्य, सखी प्रिय सखी, खंडोबाचं लगीन, जांभूळ आख्यान, नागमंडल, घाशिराम कोतवाल, कलगीतुरा या गाजलेल्या मराठी नाटकांना लोककलांचा बाज होता. विविध लोककलांमधून सादर झालेले कथानक मराठी प्रेक्षकांनी आवडीने स्वीकारले आणि स्वीकारताहेत.

मराठी रंगभूमीच्या विकासाच्या वाटचालीत काही प्रेरणास्थाने या रंगभूमीस लाभली. त्यांचा आवर्जून उल्लेख करणे गरजेचे आहे. पैकी गेली ६२ वर्षे अविरत सुरू असलेली महाराष्ट्र शासन पुरस्कृत राज्यनाट्य स्पर्धा होय. संपूर्ण महाराष्ट्रात १९ केंद्रावर हौशी नाट्यकर्मींसाठी केलेल्या आयोजनामुळे मराठी रंगभूमीच्या विकासाला चालना मिळत आहे. देशभरात शासनाने पुरस्कृत केलेल्या स्पर्धांमधे फक्त महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे व्यावसायिक नाट्यस्पर्धा देखील आयोजित करते. या स्पर्धांमधून आजवर मराठी रंगभूमीला हजारो कलावंत लाभलेले आहेत. विविध नाट्य‘प्रयोग’ याच स्पर्धांमधून पडताळले गेल्याची उदाहरणेही अनेक आहेत. उदाहरणच घ्यायचे झाल्यास पृथ्वीतलावर कुठेही बोलली न जाणारी भाषा निर्माण करण्याचे श्रेय प्र. ल. मयेकरांच्या “अथ मनूस जगन हं” या मराठी नाटकाचे आहे. नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत, रंगभूषेत केलेले प्रयोग तर इतके आहूत की ज्यांचा उल्लेखही जतन केलेला नाही. या स्पर्धांच्या आयोजनातून मिळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थापन शिक्षणाबद्दल, तर कुणी ढुंकूनही बोलत नाही. स्पर्धा आयोजन करणारे हीच शासनाची समन्वयक मंडळी आज आपल्याला व्यावसायिक रंगभूमीवर मॅनेजर म्हणून दिसताहेत.

बालरंगभूमी हे या स्पर्धांमधून वाढीस लागलेले व सद्य स्थितीत बहरलेले रोपटे म्हणावे लागेल. दरवर्षी या स्पर्धेस अंदाजे २०० ते २५० बालनाट्यांचा प्रतिसाद लाभत असतो त्यामुळे बालरंगभूमी हा मराठी रंगभूमीच्या वाटचालीतला एक टप्पा मानायलाच हवा. बालरंगभूमी व्यावसायिकतेकडे देखील अगदी ७०च्या दशकापासून कार्यरत आहे. सई परांजपे, रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर, कांचन सोनटक्के, दिलीप प्रभावळकर, अशोक जोगळेकर ते अगदी आतापर्यंत सक्रिय असलेले मुक्ता बर्वे, अतुल परचुरे, राजू तुलालवार यानी बालरंगभूमी सातत्याने जिवंत ठेवण्याचे काम केले. मुंबई-पुण्याप्रमाणे नाशिक, जळगाव, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आदी शहरांमधेही बालरंगभूमी नाट्यकर्मींद्वारा एक चळवळ म्हणून स्वीकारली गेली आहे. दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत बालनाट्यांची निर्मिती होत असतेच. मराठी रंगभूमीवरील विशेषतः मुंबईत उगम पावलेल्या आणि सद्या नामशेष होत चाललेल्या “कामगार रंगभूमी”चा उल्लेख केल्यावाचून मराठी रंगभूमीच्या स्थित्यंतराविषयी लिहिता येणार नाही. साधारणतः ३०च्या दशकात या रंगभूमीची पाळेमुळे मुंबईतील गिरणगावात रुजली. कामगारांनी, कामगारांसाठी, कामगारांच्या जीवनासंबंधी भाष्य करणारी ती “कामगार रंगभूमी” अशी याची साधी सोपी व्याख्या करता येईल. मुंबईत स्थायिक झालेला मिल मजूर महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून आलेला होता. येताना आपली प्रादेशिक संस्कृती त्याने सोबत आणली होती. आपल्या सांस्कृतिकतेचं सादरीकरण म्हणजेच ही कामगार रंगभूमी होती. मुंबईतला कापड मिल उद्योग लयाला गेला आणि त्यासोबत मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमटवणारे अनेक रंगकर्मी आणि नाट्यप्रयोग लयास जाताना आमच्या पिढीने पाहिले. मध्य मुंबईतील लालबाग, परळ, शिवडी, आगरबाजार, सातरस्ता, वरळी, काळाचौकी या विभागात असलेल्या मिलमजुरांनी कामगार रंगभूमी बहरास आणली. सुरुवातीला गणेशोत्सव, नवरात्र अथवा सामूहिक सणा-समारंभापुरती मर्यादित असलेली ही रंगभूमी १९३९ ते १९५० या कालावधीत झपाट्याने फोफावत गेली. साधारणपणे १९४८ ते १९६३ हा कामगार रंगभूमीचा सुवर्णकाळ समजला जातो. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत कामगार रंगभूमीचे योगदान विसरता येणार नाही. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशकातल्या मिल मजुरांच्या मनोरंजनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन सादर होणारी निर्भेळ करमणूक राजकीय आणि सामाजिक चळवळीचा भाग बनली. लालबागचे हनुमान थिएटर, दामोदर हाॅल, गिरगावातील भांगवाडी नाट्यगृह अशा १५ ते २० नाट्यगृहात कामगार रंगभूमीवरील नाटके सातत्याने होत असत. नाटके लिहिणे, दिग्दर्शित करणे, त्यात अभिनय करणे, संगीत, नेपथ्य ते तिकीट विक्री या सर्व कामात मिलमध्ये काम करणारे मिलमजूर हिरीरिने भाग घेत. त्यात सर्वात आवड असलेला कामगारवर्ग हा कोकणातला होता. होळी, गोकुळाष्टमी, गणपतीसाठी हमखास गावी जाणारा आणि गावात चाकरमानी म्हणून मिरवणारा हा वर्गच ‘नाट्यनिर्माता’ होता. कित्येक नाटके कामगार रंगभूमीवर केवळ मनोरंजन हा हेतू न बाळगता, समाज प्रबोधनाचे कार्य करणारी होती. सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे हमखास माध्यम म्हणून या कामगार रंगभूमीकडे पाहिले जाई. मात्र ८० च्या दशकातील मिल कामगारांचा संप जसा या वर्गाला उध्वस्त करुन गेला, तसाच तो मुंबईत स्थित असलेली कामगार रंगभूमी पार लयाला घेऊन गेला. दुर्दैवाने आज मुंबईत नामशेष होत चाललेल्या मराठी माणसासोबत कामगार रंगभूमीच्या खाणाखुणा पुसल्या जाऊ शकतात ही भीती आम्हा नाट्य अभ्यासकांच्या मनात घर करून राहिली आहे. मात्र याच कामगार वर्गाकडून नवीन रंगभूमी जन्माला घातली जात आहे. विस्थापित झालेला कामगारवर्ग जेव्हा आपल्या गावी परतला, तेव्हा उत्सवांच्या निमित्ताने याच कामगार रंगभूमीचे उत्सवी स्वरूप सामाजिक नाटकांद्वारे प्रकट होऊ लागले आहे. या रंगभूमीच्या नवीन टप्प्याचे आपण सारेच साक्षीदार असणार आहोत त्यामुळे आपणास या रंगभूमीस “उत्सवी रंगभूमी” संबोधण्यास काहीच हरकत नाही.

मराठी रंगभूमीने अनेक स्थित्यंतरे पाहिली आणि त्यात स्थित्यंतरे घडवून प्रयोगनिष्ठ रंगभूमीचा उल्लेख करावयाचा झाल्यास “प्रायोगिक रंगभूमी”चा उल्लेख आवर्जून करावा लागेल. महात्मा जोतिबा फुले यांचे तृतिय रत्न हे नाटक पहिले प्रायोगिक नाटक समजले जाते. १९५५ ते २०२३ एवढा अमर्याद प्रवास प्रायोगिक रंगभूमीच्या वाट्याला आला आहे. मराठी रंगभूमीने आजवर जैव रंगभूमी (लिव्हिंग थिएटर), मृषा रंगभूमी (अॅब्जर्ड थिएटर), निकट रंगभूमी (इंटिमेट थिएटर), पाॅकेट थिएटर, रुम थिएटर, थिएटर आॅफ रिलेव्हंस आदी मराठी रंगभूमीवरील नाट्यप्रकारांस आणि त्यातील नवनाट्याच्या सादरीकरणास खतपाणी घातले आहे.बघायला गेलं तर मराठी नाटकातील महत्त्वाचे टप्पे एवढ्या संक्षिप्त रुपात मांडता येणार नाहीत. मराठी नाटकांतून लेकनाद्वारे व प्रयोगाद्वारे मांडल्या गेलेल्या सैद्धांतिक संज्ञा मांडावयाच्या झाल्यास एक वेगळाच अभ्यास भारतीय रंगभूमीपुढे मराठी रंगभूमी आपल्या विविध टप्प्यांद्वारे मांडू शकते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -