Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखExit poll: एक्झिट पोलमध्ये भाजपाच भारी...

Exit poll: एक्झिट पोलमध्ये भाजपाच भारी…

नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या मतदानानंतरचे एक्झिट पोल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाले आणि काँग्रेस पक्षाची चिंता वाढली. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पाचही राज्यांत कुठेही भाजपाला कौल मिळाला नव्हता. पण काँग्रेसला मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या तीन राज्यांत सत्ता मिळाली. राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार पाच वर्षे रडत-खडत चालले, मध्य प्रदेशमध्ये पक्षांतर्गत मोठा उठाव झाल्यानंतर काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचाराचे वारेमाप आरोप झाले. अशा वातावरणात या तीनही राज्यात गेल्या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या.

जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यांत भाजपाचे पारडे जड आहे आणि तेलगंणा व छत्तीसगड या दोन छोट्या राज्यात काँग्रेसला सत्ता मिळू शकेल, अशी परिस्थिती आहे. मिझोरामची परिस्थिती वेगळीच आहे. तेथे प्रादेशिक पक्षांमध्ये लढत आहे. भाजपाविरोधात विशेषत: मोदी सरकारच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने प्रचारात रान पेटवले होते, मग त्याचा लाभ त्यांना काय झाला? शेवटी जनतेचा भाजपावर व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच काँग्रेसपेक्षा जास्त विश्वास आहे, हे एक्झिट पोलच्या आकेडवारीतून दिसून येते.

राजस्थानच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांना फार मोठा झटका बसला आहे. पोलस्टारच्या पाहणीनुसार २०० जागांच्या विधानसभेत भाजपाला १०० ते ११० जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपा हा राजस्थानात सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल, असे या पाहणीत म्हटले आहे. काँग्रेसला राजस्थानात ९० ते १०० जागा मिळू शकतात. राजस्थानात प्रत्येक निवडणुकीत सत्ता बदल होतो, ही परंपरा आहे. तीच परंपरा यावर्षी चालू राहील. काँग्रेसला सत्ता गमवावी लागेल व भाजपाचे सरकार जयपूरमध्ये स्थापन होईल, असे एक्झिट पोलवरून दिसते.

राजस्थानातील एक्झिट पोलमध्ये भाजपाला ४१.८ टक्के मते मिळतील, असे म्हटले आहे, तर काँग्रेसला ३९.९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्येही राजस्थानात जनतेचा कौल भाजपालाच आहे, असे म्हटले आहे. टाइम्स नाऊनुसार भाजपाला ११० ते १२८ जागा मिळतील, तर काँग्रेसला ५६ ते ७२ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. ‘जन की बात’च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला राजस्थानात १०० ते १२२ व काँग्रेसला ६२ ते ८५ जागा मिळतील, असे म्हटले आहे. केवळ एक्सिस माय इंडियाने काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील असे म्हटले आहे. त्यांच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला ८६ ते १०६ व भाजपाला ८० ते १०० जागा मिळतील.

बहुतेक सारे एक्झिट पोल हे राजस्थानात काँग्रेसची सत्ता जाणार असे सांगत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोट मात्र मतमोजणीनंतर काँग्रेसच पुन्हा सत्तेवर येणार, असा विश्वास प्रकट करीत आहेत. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सत्ताविरोधी लाटेचा फटका बसणार व काँग्रेसच सत्तेवर येणार, असा प्रचार काँग्रेसने गेले दोन महिने चालवला होता. पण एक्झिट पोलमध्ये कोणत्याही संस्थेने काँग्रेसला या राज्यात बहुमत मिळेल व सत्ता येईल, असा दावा केलेला नाही. मध्य प्रदेशची सत्ता खेचून घेण्यासाठी काँग्रेसने या राज्यात सर्वस्व पणाला लावले होते. २३० सदस्यांच्या विधानसभेत मध्य प्रदेशात भाजपाला ४५ टक्के मते व १५० जागा मिळतील, असे न्यूज २४-टुडे चाणक्यने म्हटले आहे. रिपब्लिक मैट्रीजच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल. रिपब्लिकनुसार भाजपाला ११८ ते १३० जागा मिळतील, तर काँग्रेसला ९७ ते १०७ जागा मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही ९ पोलस्ट्रेटने मात्र मध्य प्रदेशात काँग्रेसला १११ ते १२१ जागा मिळतील व भाजपाला १०८ ते ११६ जागा मिळतील असे म्हटले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड व मिझोराम या पाचही राज्यांत ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्तेवर येईल, हे स्पष्ट होईल. लोकसभा २०२४ ची पाच राज्यातील विधानसभा निवडणुका ही मिनी इलेक्शन असल्याचे म्हटले गेले. जनतेचा कौल कोणाकडे आहे, मतदारांची मानसिकता कशी आहे, त्याचा अंदाज या निवडणुकीच्या निकालातून दिसून येईल. सर्व देशाचे लक्ष हे मध्य प्रदेश व राजस्थानकडे आहे. राजस्थानातील सर्वाधिक एक्झिट पोलमध्ये भाजपा सत्तेवर येणार असे चित्र आहे.

मध्य प्रदेशात सर्व प्रमुख संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपालाच मतदारांनी सत्तेवर येण्यासाठी कौल दिला आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असे दिसत आहे. तर मिझोराममध्ये त्रिशंकू विधानसभा येईल, असा अंदाज आहे. मिझोराममध्ये एका एक्झिट पोलमध्ये झोरम पीपल्स मुव्हमेंटचे सरकार स्थापन होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. राजस्थानमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येकवेळी सरकार बदलण्याची प्रथा आहे. एका उमेदवारांचे निधन झाल्यामुळे राजस्थानात १९९ जागांवर मतदान झाले. मध्य प्रदेश व राजस्थान या दोन राज्यात भाजपा व तेलंगणा व छत्तीसगडमध्ये काँग्रेस असा सर्वसाधारण निष्कर्ष एक्झिट पोलचा आहे.

राजस्थानची सत्ता गमवली व मध्य प्रदेशमध्ये बहुमत मिळाले नाही तर काँग्रेसला फार मोठा धक्का बसू शकतो. या दोन राज्यांसाठी राहुल गांधी, अशोक गेहलोट, कमलनाथ यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. पाच राज्यांत काँग्रेसची सत्ता येणार व भाजपा कुठेही येणार नाही, असे भाजपा विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाचे नेते सातत्याने सांगत होते. मतमोजणीनंतर त्यांचीच पोल खुलणार का हे ३ डिसेंबरला उघड होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -