Saturday, May 4, 2024
Homeसंपादकीयअग्रलेख‘तो’ पराभव मानहानिकारक अन् लज्जास्पदही

‘तो’ पराभव मानहानिकारक अन् लज्जास्पदही

इंग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले आणि या काळात त्यांनी वाघिणीचे दूध समजल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेसह अनेक छोट्या – मोठ्या, महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला दिल्या किंवा आपल्याला त्या घ्याव्याशा वाटल्या. त्यापैकी काहींची आपल्याला भुरळ पडली आणि ती इतकी टोकाची आहे की, आपण आपल्या घरच्या गोष्टीही पार विसरून गेलो. त्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेट हा खेळ. क्रिकेट हा आपल्यासाठी धर्म आहे आणि या खेळासाठी आपल्यापैकी कित्येकजण तहान-भूक हरपून दूरदर्शनवर, मोबाइलवर डोळे लावून बसलेले असतात. सध्या तर टी-२० विश्वचषक सुरू असल्याने अवघी तरुणाईच नाही, तर क्रिकेट ज्यांच्यासाठी सर्वकाही आहे, अशा सर्वांचेच लक्ष त्याकडे होते. इतकेच नाही तर यंदाचा हा विश्वचषक आपण जिंकणारच अशी शंभर टक्के शक्यता वाटत होती व आपण त्या दिशेने मोठ्या आत्मविश्वासाने मार्गक्रमण करीत होतो. या स्पर्धेत आपण साखळीत आपला पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवले. पाकिस्तान, बांगलादेश यांना पाणी पाजल्यानंतर उपांत्य फेरीत भारत इंग्लंडला मात देईल आणि पाकिस्तानशी दोन हात करून वर्ल्डकप जिंकेल, अशी आशा तमाम भारतीयांना होती.

क्रिकेटप्रेमींच्या आशा आणखी पल्लवीत झाल्या व आता विश्वचषकावर आपल्या देशाचे नाव कोरले जाणार यावर जणू शिक्कामोर्तब झाले. मात्र इंग्लंडविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवाने भारतीय संघाचे नाक कापले गेले. या पराभवानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या भूमीत खेळताना भारतीय संघाला अडचण येणार, अशी सुरुवातीपासूनच चर्चा होती. कारण उसळत्या खेळपट्टीवर खेळताना भारतीय फलंदाजांची धांदल उडणार, हे सगळ्यांच्याच मनी होते. विश्वचषकात अगदीच तसे चित्र दिसले नाही, पण कधी फलंदाजांनी माती खाल्ली, तर कधी गोलंदाजांनी कच खाल्ली. पाकिस्तान, बांगलादेशने तर अगदी शेवटच्या बॉलपर्यंत भारतीय संघाला झुंजवले होते. तरीही आपल्या संघातील दिग्गज आणि अष्टपैलू खेळाडूंच्या भरवशावर आपण यावेळी बाजी मारणार असेच चित्र होते. उपांत्य फेरीच्या इंग्लंडविरोधातील सामन्यात सलामीच्या जोडीचे अपयश, पॉवरप्लेच्या षटकांमध्ये भारतीय खेळाडूंची अतिशय संथ सुरुवात, गोलंदाजांची सुमार कामगिरी अशा अनेक कारणांनी या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. हा पराभव इतका लाजीरवाणा होता की, भारताला आबही राखता आलेली नाही. क्रिकेटविश्वात सर्वात मजबूत वाटणारा आपला भारतीय संघ या समान्यात पार ढेपाळलेला दिसला. प्रथम फलंदाजी करत भारताने १६८ धावा केल्या होत्या. इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि एलेक्स हेल्स यांनी नाबाद ही धावसंख्या पार केली. इंग्लंडने १० विकेट्सने पाणी पाजून भारताला क्रिकेटबाबतच्या सर्वच व्यूहरचनांचा फेर विचार करायला भाग पाडले. त्यामुळे मोठ्या स्पर्धेत कच खाण्याचा इतिहास भारताने यावेळीही अबाधित ठेवला, असे म्हणावे लागेल.

या अत्यंत मानहानिकारक पराभवानंतर कुणीही कुणाशी क्रिकेट या विषयावर चर्चा करण्यास धजावत नाही, हे सध्याचे वास्तव आहे. कारण आपल्या खेळाडूंनी या सामन्यात सर्वच बाबतीत कच खाल्लेली दिसली. सहज जिंकू असा वाटणारा हा सामना असा सहजगत्या हातातून निसटून जाणे हे कुणालाच भावलेले नाही. या सामन्यात भारताला इंग्लंडची एकही विकेट काढता आली नाही आणि त्यामुळेच हा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी लागला. रोहित शर्मालाही यावेळी रडू थांबवता आले नाही. यानंतर रोहितला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने त्याला धीर दिला. रोहित शर्माने या विश्वचषकात फक्त एकच अर्धशतक झळकावले अन्य सामन्यांत रोहितला मोठी खेळी साकारण्यात अपयश आले. भारताच्या पराभवासाठी दुसरा खेळाडू जबाबदार ठरला तो म्हणजे लोकेश राहुल. लोकेशने या विश्वचषकात दोन अर्धशतके झळकावली खरी, पण ती कोणत्या संघांविरुद्ध झळकावली, हे माहिती आहे.

भारताला एकाही सामन्यात चांगली सलामी मिळाली नाही आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झाल्याचे चित्र आहे. या पराभवानंतर भारतीय नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विदेशी लीगमध्ये खेळल्याने भारतीय खेळाडूंना मोठा फायदा होईल. आमच्या खेळाडूंना विदेशी खेळपट्टीचा अंदाज येईल. त्यांचा विदेशात खेळण्याचा सराव झाल्याने त्यांच्या फलंदाजीत कमालीची सुधारणा होऊ शकते. घरच्या मैदानावर शेर आणि विदेशात ढेर अशी परिस्थिती त्यांची होणार नाही. म्हणून आपल्या खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्यास परवानगी द्यायला हवी; परंतु हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआयवर अवलंबून आहे आणि त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. बीसीसीआय नेहमीच भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळण्यास मनाई करते. दुसरीकडे, इंग्लंडचा प्रत्येक खेळाडू जगभरातील लीगमध्ये खेळतो, ज्याचा त्यांना नेहमीच फायदा होतो. दुसरीकडे भारताविरुद्ध अप्रतिम फलंदाजी करणारे जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स जगभरातील लीगमध्ये खेळतात. हेल्स भारतातील ‘आयपीएल’व्यतिरिक्त कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळला आहे. अॅलेक्स हेल्सला बिग बॅशमध्ये खेळण्याचा खूप फायदा झाला असून या खेळाडूने टी-२० विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. परदेशी लीग खेळल्याने, तुम्हाला त्या देशाची परिस्थिती आणि खेळपट्टीची चांगली कल्पना येते आणि त्याचा फायदा आयसीसी टूर्नामेंटमध्ये होतो, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. आता या पराभवातून अधिक चांगले निष्पन्न होऊन क्रिकेटची भरभराट होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -