Share

पाण्याने सदैव ओतप्रोत भरलेला असलेल्या एका मोठ्या सरोवराशेजारी बसलेले फूलगाव नावाचे एक छोटेसे गाव होते. तलावाकाठच्या सुंदरशा वनश्रीने सजलेले नि छानशा हिरवाईने बहरलेले. या गावात किशोर नावाचा एक मुलगा होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तो दररोज फुले विकून आपला शाळेचा खर्च भागवायचा. तो दररोज सकाळी नित्यनेमाने तलावावर जायचा, तलावाच्या सभोवती असलेली फुले तोडून, आपल्याजवळील हयात नीट रचून ठेवून आणायचा व बाजूच्या आनंदपूर शहरात जाऊन विकायचा.

हनुमंताचे मंदिर नाही असे आपल्या भारतात एकही गाव नसेल. छोटासा का होईना, पण प्रत्येक मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो म्हणजे होतोच. फूलगावातही हनुमंताचे मंदिर होतेच. आनंदपूर मोठे शहर असल्याने आनंदपुरात तर मोहल्ल्या मोहल्ल्यात हनुमंताची मंदिरे होती. रामभक्तांनी रामनवमीचा सोहळा साजरा केल्यानंतर हनुमान जयंती जवळ आली होती. तरुण मंडळी आता हनुमान जयंतीच्या उत्सवाच्या तयारीस लागली होती. दुस­ऱ्या दिवशी हनुमान जयंती होती. योगायोगाने त्या दिवशी रविवार आला होता. त्यामुळे तरुणाईच्या आनंदाला पारावारच राहिला नव्हता. हनुमंताची पूजा करण्यासाठी आनंदपूरच्या ब­ऱ्याच जणांनी आदल्या दिवशी किशोरला रुईची फुले आणण्यास सांगितले. हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी किशोर दररोजपेक्षा लवकरच उठला व आपला नेहमीसारखा फुले तोडायला तळ्याकडे निघाला.

त्याने आपली रोजची फुले आधी तोडून घेतली. ती एका बाजूने हा­ऱ्यात नीट रचून ठेवली. नंतर रुईची फुले तोडू लागला. फुले तोडता तोडता त्याचे सहजच एका पिंपळाच्या झाडाकडे लक्ष गेले. त्याच्या एका फांदीवर त्याला किड्यांनी तयार केलेला लाख दिसला. हा लाख आपल्या हल्ली काही कामाचा नाही, असे मनाशी म्हणत तो आपल्या कामाला लागला.

रविवारची सुट्टी असल्याने किशोर आपला आरामात रुईची फुले तोडू लागला. एवढ्यात त्याच्यापासून थोड्या अंतरावर असणा­ऱ्या रस्त्यावर एक कार थांबली. कारचा चालक कारमधून खाली उतरला व किशोरजवळ आला नि म्हणाला, “गड्या, तुझ्याजवळ काही प्लास्टिकचा कागदबिगद आहे काय?”

“भाऊ कस्याले पायजे तुमाले पलासटिकचा कागद?” किशोरने विचारले.

“अरे आमच्या कारच्या पेट्रोलवाहक लोखंडी नळीला रस्त्यातील थोडा उंच अणकुचीदार दगड लागला. त्यामुळे तिला बारीकसे सुईच्या टोकाएवढे छिद्र पडले. तेथे बांधण्यासाठी पाहिजे. आनंदपूरला गॅरेजला जाईपर्यंत गाडीतले पेट्रोल पुरले पाहिजे.” त्याने सांगितले.

“थांबा जरा मी तुमाले डिकमेन देतो.” असे म्हणून किशोर पटकन त्या पिंपळाच्या झाडाकडे पळत गेला. तो काय करतो हे न समजल्याने कारचा चालक नुसता त्याच्याकडे बघतच राहिला.

किशोर झटकन त्या पिंपळाच्या झाडावर चढला. त्याने तो लाख काढला व खाली उतरला. त्याने त्याचा चिकट गोळा तयार केला.

“दाखवा कुठी छिदरं पळलं ते. माह्या हातानं लावून देतो.” किशोर त्याला म्हणाला.

चालक व तो कारजवळ गेले. चालकाने दाखविल्यानुसार किशोरने तो लगदा नळीच्या छिद्रावर चिकटविला. नळीतून होणारी पेट्रोलची गळती थांबली. तरी किशोरने आपल्याजवळील फुलांसाठी आणलेला प्लास्टिकचा कागद फाडून त्याची चिंधी त्या कारचालकाजवळ दिली. त्याने त्याच्या हाताने तो कागद त्या ठिकाणी व्यवस्थित गुंडाळला. किशोरने तो आपल्याजवळील दो­ऱ्याने नीट पक्का बांधून दिला. तो चालक आनंदित झाला.

ही सारी बांधाबांध चालू असताना बोलता-बोलता किशोरला फुले घेऊन आनंदपूरलाच जायचे आहे, हे त्या चालकाला समजले होते. त्याने किशोरला कारमधूनच आनंदपूरला चलण्याविषयी सुचविले. किशोरने आधी त्याला नकार दिला पण तो म्हणाला, “अरे, तू मला साहाय्य केले तसे मी तुला साहाय्य करतो. एकमेका साहाय्य करू, दोघेही धरू सुपंथ. चल घे तुझा हारा नि ठेव माझ्या कारमध्ये.” त्याचा फारच आग्रह झाला, तेव्हा किशोर तयार झाला. त्याने स्वत:च किशोरचा फुलांचा हारा उचलला व कारच्या मागच्या डिक्कीत ठेवला. किशोरला आपल्या बाजूलाच समोरच्या सीटवर कारमध्ये बसवून आनंदपूरला आणले. किशोरने आपल्या हुशारीने कारवाल्यास साहाय्य केले, कारवाल्याने किशोरला मदत केली. किशोरला त्याने किशोरने सांगितलेल्या ठिकाणी उतरवून दिले व त्याची कार घेऊन गॅरेजकडे निघून गेला. किशोरने प्रथम आपल्या रोजच्या फुलांचे वाटप केले. नंतर हनुमानभक्तांनी सांगितलेली रुईची फुले त्यांच्याकडे पोहोचती केली. आपले काम संपवून आपल्या गावाला हनुमान जयंतीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी निघून आला.

– प्रा. देवबा पाटील

Recent Posts

गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलक नव्हतेच

हा प्रायोजित कार्यक्रम असल्याचा पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड : माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा…

53 mins ago

T20 World Cup : एक जूनपासून टी२० वर्ल्डकपचा थरार!

९ जूनला भारत पाकिस्तान सामना रंगणार! रोहित शर्मा कर्णधार तर हार्दिक पांड्या उपकर्णधार नवी दिल्ली…

2 hours ago

मुंबईतील सर्व जागा महायुतीच जिंकणार

केलेल्या कामांची पावती जनता देणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास मुंबई : गेल्या दोन…

2 hours ago

ग्रामपंचायत गैरव्यवहाराबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार – संजय जांभळे

पेण : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत डोलवी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत प्रशासकीय अधिकारी हे ग्रामसेवक, सरपंच व…

3 hours ago

कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर भ्रष्टाचाराचे आरोप

चीनच्या सरकारने केले निलंबित बिजिंग : चीनच्या पहिल्या कोविड - १९ वरील लस निर्मिती करणाऱ्या…

3 hours ago

Jwari Bhakri : व्हाईट हाऊसच्या जेवणातही ज्वारीची भाकरी!

माढा : धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ज्वारीला आता श्रीअन्न (Jwari…

3 hours ago