Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीMilind Ingale : गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे प्रहारच्या 'गजाली'त...

Milind Ingale : गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे प्रहारच्या ‘गजाली’त…

तप्त उन्हाच्या काहिलीतही एक अद्भुत अशी गारव्याची अनुभूती आली, ती कानसेनांना तृप्त करणाऱ्या शब्दांच्या सुखद, सुरेल सुरावटींनी. कारण दैनिक ‘प्रहार’च्या ‘गजाली’ या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांच्या सपत्नीक आगमनानंतर एक मैफील रंगत गेली. त्यांच्या सदाबहार गाण्यांची लकेर मनं प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करून गेली. या वेळी दैनिक ‘प्रहार’चे संपादक डाॅ. सुकृत खांडेकर तसेच लेखा व प्रशासन विभाग प्रमुख ज्ञानेश सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला त्यांच्या पत्नी मानसी यांनीही तितकीच दाद दिली. या वेळी ज्येष्ठ पत्रकार वैजयंती आपटे देखील उपस्थित होत्या. या मैफिलीत मिंलिंद यांच्या प्रवासाचे आणि गाण्याचे अनेक पैलू उलगडत गेले. पावसाच्या प्रत्येक हळूवार थेंबासारखे…

हळुवार गीतांचा किमयागार : मिलिंद इंगळे

विनिशा धामणकर

छतावरच्या पागोळीतून हळुवारपणे जमिनीवर उतरणाऱ्या रिमझिम पाऊस धारा तापलेल्या धरणीला ओलेत्या करतात, धरणी सुखावून जाते, आनंदून मृद्गंधाची पखरण करत आपला प्रतिसाद देते. तसंच काहीसं ‘प्रहार गजाली’च्या कार्यक्रमात घडलं. कारण यावेळचे पाहुणे होते-निरागस प्रेम आणि नितळ पाऊसधारांचा आपल्या गाण्यातून वर्षाव करणारे, नामवंत गायक मिलिंद इंगळे आणि त्यांची पत्नी मानसी इंगळे. त्यांच्याशी गप्पा मारताना, प्रचंड उकाड्यातही एक प्रसन्न ‘गारवा’ पसरला.

खरं तर मिलिंद यांच्या डीएनएतच गाणं आहे. ते त्यांच्या कुटुंबातील ग्वाल्हेर घराण्याचे पाचव्या पिढीचे गायक आहेत. त्यांचे खापरपणजोबा कीर्तनकार होते. पणजोबा गुंडोबुवा इंगळे हे सांगलीच्या दरबारात तर आजोबा केशवबुवा इंगळे इचलकरंजीच्या दरबारातील गायक होते. वडील माधव इंगळे शास्त्रीय गायक होते. मिलिंद यांचा जन्म पेणमध्ये देवांच्या आळीत झाला. संगीतकार यशवंत देव हे त्यांचे मामा. म्हणजे आई आणि वडील या दोघांकडून मिलिंद यांना गाणं वारशानं मिळालं. मिलिंद सहा महिन्यांचे असतानाच, वडिलांना कोलकात्याच्या बिर्ला हायस्कूलमध्ये संगीत शिक्षकाची नोकरी लागली आणि सर्व कुटुंब तिकडे स्थायिक झालं. ते कोलकात्यात महाराष्ट्र मंडळाच्या समोर राहायचे. तिथे भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर अशा मोठमोठ्या गायकांचे कार्यक्रम माधव इंगळे आयोजित करायचे. त्या वातावरणात मिलिंद यांच्या बालमनावर नकळतपणे या सगळ्यांचे संस्कार झाले. शिवाय रवींद्र संगीत आणि हेमंत कुमार, गायक शानचे वडील मानस मुखर्जी यांचे ‘आधुनिक गान’चे संस्कारही झाले. काळी काळनंतर इंगळे कुटुंबीय आधी पुण्यात आणि मग मुंबईत स्थायिक झाले. घरात गाणं असलं तरी मिलिंद यांना घरातून शास्त्रीय संगीताचं औपचारिक शिक्षण असं मिळालं नाही. मिलिंद यांच्या वडिलांनी त्यांना वाणिज्य शाखेत पदवी संपादन करण्यासाठी जोर दिला. मिलिंद देखील वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन, सरगमच्या जागी आकडेमोड करू लागले. यादरम्यान मेहंदी हसन, गुलाम अली यांच्या गझला त्यांनी खूप ऐकल्या. पुढे स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात करून, त्यात ते जिंकू लागले. कॉलेज जीवनातच त्यांच्या पुढील कारकिर्दीची बीजं रोवली गेली, ती किशोर कदम (सौमित्र) आणि अरूण दाते यांचा मुलगा अतुल दाते यांच्या मैत्रीमुळे. यांच्या मैत्रीतून मराठीतील अनेक लोकप्रिय गाणी जन्माला आली आणि मराठी मनाला आणि कानांना सुखावणारा ‘गारवा’ याच मैत्रीतून प्रसवला.

पुढे वडिलांनाही गाण्याच्या शिक्षणाला परवानगी दिली. त्यांचे दैवत असलेले गायक किशोर कुमार यांचं उदाहरण त्यांना मार्गदर्शक ठरलं. किशोरदा जर न शिकता गाऊ शकतात, तर आपण का नाही, असा एक मध्यम मार्ग त्यांना सापडला. त्यांनी शास्त्रीय संगीताचं यशवंत बुवा जोशी यांच्याकडे शिक्षण घेतलं. त्यानंतर ‘गझल’ गायकीकडे आपला मोर्चा वळवला. वडिलांच्या सांगण्यावरून आधी के. महावीर यांच्याकडे आणि नंतर राजकुमार रिझवी यांच्याकडे शिक्षण घेतलं. त्यानंतर सुरू झाला या क्षेत्रात पाय रोवण्याचा संघर्ष.

त्या काळात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये चित्रपटांना साजेशीच उडत्या चालीची गाणी असायची. मिलिंदना सुद्धा पहिला ब्रेक १९८५ साली कमलाकर तोरणे यांनी ‘आम्ही दोघे राजाराणी’ या चित्रपटात दिला. आशा भोसले यांच्यासोबत त्यांना हे गाणं गाण्याची संधी मिळाली आणि तेही गाणं होतं-‘येरे येरे पावसा.’ तिथूनच मिलिंद यांच्या गाण्यांचा पावसाळा सुरू झाला. त्यानंतर त्यांनी किमान २५-३० चित्रपटांसाठी गाणी गायली. सोबत हिंदीमध्ये संघर्ष सुरू होता. पण अशी गाणी आपण करू शकत नाही, असं त्यांच्या लक्षात आलं आणि ऐन पावसाळ्यात थोडी पानगळही लागली!

त्याचवेळी साधे शब्द आणि हळुवार चाल अशी गाणी आपण बनवावी असा विचार करून, हिंदीत ‘ये है प्रेम’, मराठीत ‘गारवा’, ‘सांज गारवा’ हे प्रचंड लोकप्रिय ठरलेले अल्बम त्यांनी केले. ही सर्व गाणी आजही रसिकांच्या मनावर रुंजी घालत आहेत. ‘ये है प्रेम’च्या यशाने त्यांना शाहरूख खान सोबत अमेरिकेतील २३ शहरात स्टेज शो करण्याची संधी मिळाली.

दरम्यान त्यांच्या लग्नाचा विषय घरात चर्चिला जाऊ लागला. मिलिंद त्यावेळी कोणतीही मोठी आर्थिक कमाई करीत नव्हते. त्यांनी निवडलेलं गाण्याचं क्षेत्र तर बिनभरवशाचं होतं. अशावेळी त्यांना मुलगी देणार कोण, हा प्रश्न होता. त्यांनी एके ठिकाणी जाहिरात दिली. त्याच मासिकात ‘गायक वर हवा’ अशी एक जाहिरात आली. अर्थातच या मुलीशी म्हणजेच मानसीशी मिलिंद यांची लग्नगाठ बांधली गेली. आपल्या या निवडीविषयी मानसी यांनी गजालीमध्ये सांगितलं की, त्यांनासुद्धा किशोर कुमार खूप आवडायचे, त्यांनी स्वत: गाण्याचे शिक्षण घेतलं, पण करिअर केलं नाही. त्यांनी आपला पती गायक असावा, ही अपेक्षा ठेवली. पतीच्या बिनभरवशाच्या क्षेत्राविषयी त्यांनी ठरवून टाकलं होतं की, मी भाकरी कमवीन आणि पतीने लोणी कमवावं, लोणी नसलं तरी चालेल, नुसती भाकरी खाता येईल. हा दुर्मीळ समंजसपणाच पुढे दोघांच्याही आयुष्यात स्थैर्य घेऊन आला. या गायक नवऱ्यानेही लग्नातच ‘मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो…’ म्हणत पुढलं सुखद चित्र रेखाटून ठेवलं आणि ते खरंही केलं. मानसी यांनी सुरुवातीला अनेक नामवंत वर्तमानपत्रात पत्रकारिता केली. आज त्यांनी मोठमोठ्या कार्यक्रमांचं इव्हेंट मॅनेजमेंट करून, स्वत:चीही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मिलिंद यांचा मुलगा सुरेल इंगळे हासुद्धा संगीताच्या क्षेत्रात आहे. त्याने अमेरिकेत पार्श्वसंगीताचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आहे. नुकतीच ओटीटीवर दाखल झालेल्या ‘सायलेन्स २’ या वेबसीरिजला त्याने दिलेल्या पार्श्वसंगीताची खोली त्याच्या ट्रेलरमध्ये सुद्धा जाणवते. अशा प्रकारे मिलिंद यांच्या आयुष्यातही ‘गारवा’ नांदतो आहे, त्यांच्याच गाण्याच्या शब्दात सांगायचं झालं तर,
पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा
दारास भास आता हळुवार पावलांचा….

…अँड द रेस्ट इज हिस्टरी!

सखी गुंडये

‘गारवा… वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा नवा नवा
प्रिये नभातही चांदवा नवा नवा…’
या ओळी ऐकल्या की, आपोआप भर उन्हात पाऊस घेऊन, आभाळ मनात दाटतं. सौमित्रांचे शब्द आणि त्यांना मिलिंद इगळेंनी दिलेली चाल आणि आवाज आजच्या तरुणाईलाही तितकीच भुरळ घालते. या अल्बमला २५ वर्षे पूर्ण झाली, तरी त्याची जादू कायम आहे. पण हा ‘गारवा’ तयार करण्यामागे किती अडचणींचा सामना करावा लागला, हे फार थोडक्या लोकांना माहीत आहे. ‘प्रहार’च्या ‘गजाली’मध्ये मिलिंद इंगळे यांनी गारवाची स्ट्रगल स्टोरी सांगितली.

एका कॉलेज फेस्टिव्हलदरम्यान मिलिंद इंगळे यांची किशोर कदम आणि अतुल दाते यांच्याशी ओळख झाली. पुढे त्याचे रुपांतर मैत्रीत झाले आणि मग अधूनमधून एकमेकांच्या घरी गप्पांचा फड रंगू लागला. किशोर कदम उत्तम लिहायचे. त्यांनी स्वतःच्या एका कवितेला मिलिंद यांना चाल लावायला सांगितली. ती चाल अतुल दाते यांनी रेकॉर्ड केली आणि अरूण दातेंना ती प्रचंड आवडली. मग त्यांनी आपल्या अल्बममध्ये त्या गाण्याचा समावेश केला आणि मिलिंद यांचा खऱ्या अर्थाने संगीत प्रवास सुरू झाला.

नॅशनल लेव्हलच्या गझल स्पर्धेत पहिले पारितोषिक पटकावत, मिलिंद यांनी १ लाख रुपये जिंकले. तेव्हा आलेल्या पैशांतून त्यांनी गारवाची गाणी रेकॉर्ड करून घेतली. १९९३-९४ साली या गाण्यांची एक कॅसेट तयार करून, ती प्रदर्शित करण्यासाठी, ते अनेक म्युझिक कंपन्यांकडे गेले. मात्र सकारात्मक प्रतिसाद येईना. मराठी गाणी आणि त्यात त्या गाण्यांना रवींद्र संगीताचा बाज असल्याने, ती गाणी कोणी ऐकणार नाहीत, अशी उत्तरे मिळत गेली. शेवटच्या प्रयत्नातही एका कंपनीने मानधन घेऊन किंवा फुकट गाणी प्रदर्शित करायलाही नकार दिला. या गाण्यांना एवढी वाईट किंमत असावी की, ती फुकटही प्रदर्शित होऊ नयेत? असे वाटून कोणत्याही कंपनीकडे न जाण्याचे मिलिंद यांनी ठरवले. त्यांनी ती कॅसेट कपाटात बंद करून ठेवली. जेव्हा कोणी गाण्यांविषयी विचारेल, तेव्हाच कपाट उघडेन, असा त्यांनी निश्चय केला आणि असा प्रसंग येण्यासाठी ४ वर्षे उलटावी लागली.

१९९७ साली रजत बडजात्या यांच्या कार्यालयातून मिलिंद यांना फोन आला. नवीन म्युझिक कंपनी सुरू करण्यासाठी, त्यांनी मिलिंद यांना गाण्याविषयी विचारले. परंतु गरज हिंदी गाण्यांची होती आणि गारवामधील सगळी गाणी मराठी होती. मग त्यांनी हिंदीमध्ये तात्पुरती गाणी लिहून मूळ चाली बडजात्या यांना ऐकवल्या आणि त्यांना ती गाणी प्रचंड आवडली. मात्र त्यांना हिंदीमध्येच गाणी हवी होती, त्यामुळे पुन्हा एक मोठा पेच पडला. मिलिंद यांनी नंतर वर्षभरात जवळपास ३० हिंदी गाणी करून, ती बडजात्या यांना ऐकवली. त्यातील १० गाण्यांचा ‘ये है प्रेम’ हा पहिला अल्बम प्रदर्शित करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान, मिलिंद गारवा अल्बम प्रदर्शित करण्यासाठीही सतत पाठपुरावा करत होते. अखेर ‘ये है प्रेम’ नंतर ३ महिन्यांनी २३ जुलै १९९८ साली ‘गारवा’ अल्बम प्रदर्शित करण्यात आला. अँड द रेस्ट इज हिस्टरी!

गवय्याच खरा खवय्या!

वैष्णवी भोगले

आपल्या सुरेल गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे सुप्रसिद्ध गायक म्हणजेच मिलिंद इंगळे. त्यांनी त्यांच्या गाण्यांमधून वेड लावलं आणि आता चविष्ट पदार्थांनी ते खवय्यांच्या जिभेला तृप्त करण्यास ‘गवय्या ते खवय्या’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली पाककला सादर करतात. मिलिंद इंगळे हे उत्तम कूक आहेत, हे कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पाककृतीसोबत ते गाणी, गाण्यांमागचे किस्से आपल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब चॅनलद्वारे सादर करतात. ते घरी देखील सुग्रास स्वयंपाक बनवतात, हे देखील विशेष.

आपल्या गाण्यांनी लाखो लोकांच्या मनात प्रेमाचे स्थान पटकावलेल्या, या गायकाचे ‘तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंसं गाव’, ‘गारवा’, ‘सांज गारवा’, ‘ये है प्रेम आदी’ त्यांचे अल्बम संगीत क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहेत. गारवा आणि सांजगारवा अभूतपर्व यशानंतर गायक मिलिंद इंगळे यांनी जवळजवळ सात वर्षांनंतर ‘तुझ्या टपोऱ्या डोळ्यात माझं इवलंस गाव’ नावाचा अल्बम प्रकाशित केला. प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांच्या हस्ते या अल्बमचे प्रकाशन करण्यात आले. या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ एकच गीत आहे, जे ३६ मिनिटांचे आहे. विदर्भातील प्रख्यात गीतकार ज्ञानेश वाकुडकर यांच्या ‘सखे साजणी’ या दीर्घ कवितेवर उच्चारित प्रेसयीच्या विलक्षण सौंदर्याचे कमालीचे वर्णन करण्यात आले आहे. या दीर्घ कवितेत एकूण २१ अंतरे आहेत. खरे तर ही जवळजवळ १०० पानांची दीर्घ कविता आहे. ज्यापैकी महत्त्वाच्या ओळींना मिलिंद इंगळे यांनी भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचा साज चढवला आहे.

या अल्बमबद्दल सांगायचे झाल्यास, या अल्बमला प्रकाशित करण्यासाठी पाच वर्षे काम करावे लागले. ‘तुझ्या टपोर डोळ्यात’ हा अल्बम खूप आधी प्रकाशित झाल्यामुळे, या अल्बमला यूट्यूबवर खूप व्ह्युज मिळत आहेत. त्यांनी ‘मुखादिब’ नावाचा गझल शो त्यांनी सुरू केला. ‘मुखातिब’ हा मूळ उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ संबोधित करणे वा संबोधित करणारा असा होतो. खूप वर्षांनंतर हा कार्यक्रम करत असल्यामुळे, त्याचं नावही तसंच हटके पण समर्पक हवं होतं. या कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे आणि गझलांचे अभ्यासक सलीम आरिफ यांनीच हे नाव सुचवलं.

मिलिंद इंगळे सांगतात की, अनेक भूमिका एकाच वेळी जगणारा अवलिया म्हणजे किशोर कुमार. अगदी दंतकथा ठरावी, असे त्यांचे आयुष्य. म्हणूनच त्याच्या आयुष्यातील घटना, प्रसंगांना ऐकण्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच होती. ही संधी मिलिंद इंगळे यांनी ‘आज मुझे कुछ कहना हैं’ या संपूर्ण संहिताबद्ध कार्यक्रमाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून दिली. ‘आज मुझे कूछ कहना है’ या शोमध्ये कार्यक्रमात किशोरदांची काल्पनिक डायरी, त्यांनी गायलेली मधाळ गाणी अन् त्या गाण्यांना मिलिंद इंगळेंच्या आवाजाचा साज अशी ही जुगलबंदी मस्त रंगली. या २० गाण्यांच्या शोमधून किशोर कुमार यांचा प्रवास उलघडत जातो. आरजे दिलीप यांनी किशोरदांच्या काल्पनिक डायरीतून त्यांच्या आयुष्यातील अनेक अस्पर्शित पैलू उलगडून दाखवले. ६० साली किशोर कुमार आणि सुधा मल्होत्रा यांनी ‘कश्ती का खामोश सफर है’ या गाण्यातील ‘मुझे कूछ कहना है’ हे शब्द त्यांना खूप आवडले व ‘आज मुझे कूछ कहना है’ हे नाव त्यांनी कार्यक्रमाला दिले.

तसेच मिलिंद इंगळे यांनी निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून मतदान जनजागृती करीता ‘ये पुढे मतदान कर’ हे गाणं राहुल सक्सेना आणि वैशाली भैसने-माडे यांनी गायलं. आज सर्व रेल्वे, बस, मेट्रो, आयपीएलमध्ये ‘ये पुढे मतदान कर’ हे गाणं गाजत आहे. तसेच गोव्याचे कवी मंगेश केरकर यांच्या मुक्तछंद अल्बममधील ४ गाणी मिलिंद इंगळे यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली आहेत. त्यातील ‘कोकण राज’ हे मिलिंद इंगळे यांनी गायलं व महेश खानोलकर यांनी त्या गाण्याला चाल लावली. यूट्यूबला या गाण्याला ९ दिवसांत २ लाख व्ह्यूज आहेत. या गाण्यामध्ये मनोहर गोलांबरे यांनी घातलेलं गाऱ्हाणं, प्रभाकर मोरे यांच्यावर शूट झालं आहे. माझ्या या एकंदरीत प्रवासात अनेकांनी साथ दिली व उत्तरोत्तर कलेची, गायनाची, माझी प्रगती होत गेली, असे मिलिंद इंगळे सांगतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -