Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडी‘अनाथांची माय’ सिंधूताई सपकाळ यांचे निधन

‘अनाथांची माय’ सिंधूताई सपकाळ यांचे निधन

पुणे (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेविका आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री निधन झाले. पुण्यात खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सपकाळ यांना महिन्याभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सपकाळ यांना केंद्र सरकारतर्फे ‘पद्मश्री’ किताब जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. नववर्षाच्या प्ररंभीच आलेल्या त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिंधुताईंना लोक प्रेमाने ‘माई’ म्हणत असत. सिंधुताई यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कारासह महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’, इचलकरंजीचा प्रतिष्ठित ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’ इ. उल्लेखनीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना ‘आनंदमयी पुरस्कार’ही मिळाला आहे. पंजाबमधील लुधियानाच्या ‘सत्पाल मित्तल नॅशनल अॅवॉर्ड’च्याही त्या मानकरी आहेत. या पुरस्कारांसह इतर शेकडो पुरस्कार आणि सन्मानचिन्हे देऊन समाजातील अनेक संस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणाऱ्या सिंधूताई सपकाळ या ‘अनाथांच्या आई’ झाल्या. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभ्या केलेल्या कामाची राज्यासह राष्ट्रीय स्तरावर मोठी प्रशंसा झाली.

सिंधूताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा… पन्नास-साठच्या दशकात भारतातील बहुतेक महिलांची कहाणी अशीच असे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -