Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखअसे हे विघ्नसंतोषी सद्य शंकराचार्य...

असे हे विघ्नसंतोषी सद्य शंकराचार्य…

अरुण बेतकेकर

जगतगुरू आद्य शंकराचार्य – आदी शंकराचार्य यांचा जन्म – इ. पू. ५०८ कालडी, केरळ, भारत. समाधी – इ. पू. ४७६ केदारनाथ, उत्तराखंड. आयुष्य केवळ ३२ वर्षे. जन्म अत्यंत हलाखीच्या कुटुंबात. स्वयं भगवान शंकर त्यांच्या पालकांपुढे प्रकट होत त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवले, “सामान्य बुद्धिमत्ता व दीर्घायुष्य प्राप्त, वा असामान्य बुद्धिमत्ता व अल्पायुष्य प्राप्त. यातील कसा पुत्र आपणांस हवा?” पालकांनी दुसरा पर्याय निवडला आणि दृष्टा पुत्र जन्मला. भगवान शंकराच्या कृपेने पुत्रलाभ झाल्याने त्याचे नाव “शंकर” ठेवले गेले. संस्कृतमध्ये शंकर म्हणजे “आनंदाचा दाता”.

आदी शंकराचार्य यांना सर्वोच्च आचार्य म्हणून गणले जाते. वेदांच्या आधारावर त्यांनी नवे तत्त्वज्ञान निर्माण केले. सनातन धर्माची भक्कम पुनर्रचना केली. प्रचंड लिखाण केले. वेदपुराणाचा प्रचार, प्रसार केला. ख्रिस्ताब्द सातव्या शतकापूर्वी भारतात जैन आणि बौद्ध हे धर्म नव्याने उदयास आले अन् त्यांनी वैदिक धर्माशी संघर्ष चालू केला. सम्राट अशोकाच्या नंतरच्या काळात बौद्धांनी वैदिक धर्माला पायदळी तुडविण्याचा आवेशपूर्वक प्रयत्न चालू केला. अक्षरशः उच्छाद मांडला होता. हिंदू धर्म यातून तरेल का, असे संकट निर्माण झाले होते. जैन-बौद्धांच्या समवेतच देशातील शैव, शाक्त, वैष्णव, गाणपत्य, कापालिक असे संप्रदाय वैदिक धर्माला आतून पोखरित होते. हे सर्व हिंदू असूनही त्यांच्यात जीवघेणे युद्ध होत. हिंदू धर्म संकटात आला होता. अशावेळी आद्य शंकराचार्यांनी सन्यास घेऊन आपले जीवन धर्म कार्यासाठी अर्पण करण्याकरिता लहान वयातच घराचा त्याग केला. स्वामी गोविंदयतींनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना विधिवत संन्यास दीक्षा दिली आणि ‘शंकराचार्य’ असे नामकरण केले.

प्रचंड बुद्धिमत्ता आणि तपाचरण यांच्या बळावर शंकराचार्य यांनी जैन आणि बौद्ध या दोन्ही मतांचा वाद-विवादाद्वारे पाडाव करून हिंदू धर्माची पुनर्स्थापना केली. त्यांनी वैदिक धर्मावरचे आघात परतवून लावले. धर्मातल्या विकृती दूर केल्या. काळाच्या प्रभावाने धर्मावर वाढलेली जळमटे दूर केली आणि आचारप्रधान अन् अद्वैतप्रधान अशा वैदिक धर्माचा प्रकाश भारतभूमीवर सर्वत्र भरभरून टाकला. धर्माला तेज प्राप्त झाले. या लोकोत्तर कृतीने शंकराचार्य हे जगतगुरू ठरले. आपल्या शिष्यासह वैदिक धर्माची पुनर्स्थापना करण्यानिमित्त त्यांनी तीन वेळा भारतभ्रमण केले. धर्म व देशाच्या सीमा सदैव सुरक्षित असाव्यात या हेतूने शंकराचार्य यांनी देशाच्या चारही दिशांना चार पीठ स्थापन केली. १) शारदा पीठ, श्रींगेरी, कर्नाटक; २) द्वारका शारदा पीठ, द्वारका, गुजरात; ३) गोवर्धन पीठ, पुरी, ओडिशा; ४) ज्योतिरपीठ, बद्रिका, उत्तराखंड. येथील सद्य शंकराचार्य क्रमनिशा असे, १) स्वामी भारती तीर्थ; २) स्वामी सदानंद सरस्वती; ३) स्वामी निश्चलानंद सरस्वती आणि ४) अविमुक्तेश्वरानंद सरस्वती. तसेच काशी व कांची येथे एकेका उपपीठाची स्थापना केली.
या सर्व ठिकाणी आपल्या समवेतील शिष्यांची नियुक्ती केली. या सर्वांना वरील उल्लेखित निव्वळ नेमून दिलेले हिंदू धर्मरक्षण, प्रचार-प्रसार हे आपले कार्य पुढे नेण्याची शिकवण दिली गेली. हीच परंपरा गेली अडीच हजार वर्षांहून अधिक काळ सुरू राहावी हे अपेक्षित होते. या पीठांस हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान तसेच शंकराचार्यांना धर्मगुरू म्हणून सर्वोच्च स्थान प्राप्त आहे. शंकराचार्य हे वंशपरंपरेने निवडले जात नाही. थोडक्यात नात्या-गोत्यास येथे स्थान नाही. सद्य पीठासीन असलेले शंकराचार्य हे आपल्या शिष्यांपैकी एका शिष्याची निवड पुढचे शंकराचार्य म्हणून करतात. शंकराचार्य होण्यासाठी जन्माने ब्राह्मण असणं आवश्यक, योगशास्त्राचे माहीर असणं, वेदांचे संपूर्ण ज्ञान असणं महत्त्वाचे आणि या निवडीस इतर तीन शंकराचार्यांचा पाठिंबा असणे आवश्यक.

शंकराचार्य यांना आपल्या वयाच्या ३२ वर्षांतच आपले अवतार कार्य पूर्ण झाल्याची प्रचिती आली. उत्तराखंड येथील केदारनाथस्थित गुहेत निवृत्ती घेत त्यांनी हिमालयात बिदेय मुक्ती घेतली. याच गुहेस त्यांचे समाधी स्थान म्हटले जाते. स्वयं भगवान शंकरांनी धर्मरक्षणासाठी आद्य शंकराचार्यांच्या रूपात पुनर्जन्म घेतला, अशीही अख्यायिका आहे. एक निश्चित, आद्य शंकराचार्यांनी हिंदू धर्मास जीवनदान दिले, समृद्ध केले.

सद्य शंकराचार्य – मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत त्यांच्याच जन्मस्थानी निर्माण होत आहे. यास पाच शतकांचे प्रचंड यत्न – प्रयत्नांचे पाठबळ आहे. संपूर्ण जनता हर्ष-उल्हासित आहे. हा क्षण आपल्या जीवनात याचि देही याचि डोळा पाहण्याचे भाग्य लाभल्याने प्रत्येक भारतीय स्वतःस धन्य मानतो. या उद्घाटन सोहळ्याचे आयोजनही तितक्याच प्रभावीपणे, जणू काही स्वयं प्रभू रामचंद्रच अवतरत आहेत, असे वाटावे. अशा हर्षोल्हासाच्या समयी सद्य शंकराचार्यांनी काय करावे? पण येथे यांचा अहंकार आड आला. आम्ही आचार्य असताना आपलेच महत्त्व कमी होतेय, असा भास यांस झाला. प्रत्यक्षात हे कार्य आपल्या हस्ते व्हायला हवे होते याची त्यांना जाणीव झाली. आपण केले नाही. ही झाकली मूठ होती, ती ढिली व्हायला लागली. आम्ही उघडे पडणार, हा न्यूनगंड मनात निर्माण झाला. पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, मध्य प्रदेशातील एका कार्यक्रमात म्हणाले, “मला अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे, माझ्यासोबत एका व्यक्तीला घेऊन मी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो, पण मी त्या कार्यक्रमाला जाणार नाही. जर पंतप्रधान मोदी मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणार असतील, श्रीरामांच्या मूर्तीला हात लावणार असतील, तर मी तिथे जाऊन टाळ्या वाजवू का? कुणीही शंकराचार्य या सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.”

तसेच उत्तराखंडस्थित ज्योतिरपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणतात, “शंकराचार्यांची जबाबदारी आहे शास्त्रीय विधींचे पालन करणं आणि करवून घेणं. सध्या अयोध्येत शास्त्रीय विधींची उपेक्षा केली जातीये. मंदिराचं बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही आणि तरीही प्राणप्रतिष्ठा केली जातीये. हे काम घाईगडबडीने करण्यासारखी कोणतीही परिस्थिती सध्या नाहीये. याचा विरोध केला तर आम्ही अँटीमोदी आहोत, असा आरोप होतोय. पण यात अँटीमोदी काय आहे? आम्ही अँटीमोदी नाही, तर धर्मशास्त्राच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टींविरोधात आहोत. जर हे मंदिर रामानंद संप्रदायांचे असेल, तर रामानंद संप्रदायाला सगळी जबाबदारी देण्यात यावी आणि इतरांनी तिथून बाजूला व्हावं. धर्मशास्त्रविरोधी गोष्टी अयोध्येत होत असल्याने चारही शंकराचार्य या सोहळ्याला तिथे जाणार नाहीत.” येथे मला म्हणावेसे वाटते, पंतप्रधान मोदी यांचा नामुल्लेख होणे आणि त्यांनी बाजूला व्हावं म्हणणे हा निव्वळ मोदी द्वेष.

खरं पाहता शंकराचार्य हे पुरोहिताचे काम करू शकत नाहीत, पूजापाठ करू शकत नाहीत, कोणत्याही कार्यक्रमाचे यजमानपद त्यांना भूषविता येत नाही, प्राणप्रतिष्ठापणा हा पूजापाठाचा भाग आहे ते करण्यासाठी राम मंदिराचे मुख्य पुजारी सक्षम आहेत. असे असताना आपणास सोहळ्यात सन्माननीय स्थान प्राप्त असेल हेच उचित. आपण या कार्यक्रमाचा सन्मान करावा, शुभाशीर्वाद द्यावेत हेच आपणाकडून अपेक्षित. पण आपल्या अशा या वागण्याने हिंदू विरोधकांच्या हाती आयते कोलीत आपण बहाल केले आहे. छाती बडवून घेण्यासाठी त्यांना आपण निमित्तमात्र ठरला आहात. हिंदुधर्मरक्षण हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण इतकेच कडवे असाल तर…

१) काश्मीरमध्ये हिंदू धर्मियांचा नरसंहार झाला, त्यांच्यावर अनंत अत्याचार झाले, आपल्याच भूमीतून घरदार व संपत्ती सोडून त्यांना परागंदा व्हावे लागले. त्यावेळी त्याविरोधात आवाज उठविणे हे शंकराचार्यांचे प्रथम कर्तव्य होते.

२) मुस्लीम वक्फ बोर्ड, हिंदुस्थानात पदाचा व अधिकाराचा गैरवापर करीत जमिनी गिळंकृत करीत आहे. अलीकडेच तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थिरुचेनथुराई हे संपूर्ण गाव मुस्लिमांची मालमत्ता असल्याचे वक्फ बोर्डाने जाहीर केले. त्याच गावात सुन्दरेश्वर मंदिर हे साधारण १५०० वर्षे प्राचीन देवस्थान आहे. हे होताना पाहून पिढ्यानपिढ्या तेथे वास्तव्यास असलेल्या हिंदूंची खऱ्या अर्थाने पायाखालची जमीन नाहीशी झाली. इस्लाम धर्म १४०० वर्षांपासून अस्तित्वात आला. असे असताना इस्लाम धर्मापेक्षा पुरातन मंदिराची मालकी मुस्लीम वक्फ बोर्डाकडे कशी? आपणास कल्पना आहे का, आज वक्फ बोर्ड हे भारतातील सर्वात मोठे भूधारक आहेत. एकूणच यावेळी वक्फ बोर्डाच्या अशा अतिरेका विरोधात आवाज उठविणे हे शंकराचार्यांचे प्रथम कर्तव्य होते.

३) भारत देशातील प्रसिद्ध हिंदू देवस्थानाचा निधी जो हिंदू धर्मियांच्या दान-धर्माद्वारे जमा होतो त्यावर मालकी त्या त्या देवस्थानाची नव्हे, तर त्यावर मालकी हक्क तेथील राज्य सरकारचा. हा पैसा अन्य धर्मियांच्या धर्मकार्येसाठी, धर्मस्थळे उभे करण्यासाठी, धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी, कार्यक्रम व धर्मयात्रा करण्यासाठी इतकेच नव्हे, तर हिंदू धर्मियांचे धर्मांतरण करण्या इत्यादींसाठी वापर होतो आहे. हाच न्याय अन्य धर्माच्या धर्मस्थळांबाबत का नाही? हिंदूंचे ते सर्वांसाठी, इतरांचे ते केवळ त्यांच्याचसाठी. या विरोधात हिंदू व हिंदुत्ववादी संघटना लढा देत आहेत. या कार्यासाठी खरे तर शंकराचार्यांनी आवाज उठविणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते.

४) १९४७ भारत स्वातंत्र्य ते २०४७ या शतकात भारताचे मुस्लीम राष्ट्र करण्याचा विडा उचलल्याचे आणि खुल्या व छुप्या रीतीने ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न उघड झाला, तेही पुराव्यासह सिद्ध होत आहे. यासाठी देश-विदेशातून निधी पुरविला जातो आहे. उदाहरण दाखल केरळ राज्य घेता येईल. तेथील बऱ्याच भागात भारताचे संविधान नव्हे, तर इस्लामी शरिया कायदे राबविले जात आहेत. लव्ह-जिहाद हा प्रकार सर्रास सुरू आहे. अशीच परिस्थिती बंगाल राज्यात होत आहे. शेजारील बांगलादेशातून व म्यानमारहून रोहिंग्या मुस्लिमांची घुसखोरी होत आहे. यांच्या घरोघरी गावठी बॉम्ब व कट्टे बनविण्याचे कारखाने आहेत. यांना आश्रय व यांच्याकडे दुर्लक्ष केवळ एकगठ्ठा मुस्लिमांच्या मतांसाठी. इतकेच काय अगदी अलीकडे मुंबईपासून केवळ ५० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पडघा गावाचे ‘ग्रेटर सीरिया’ नामकरण कसे झाले? तेथे इस्लामिक कायदे व रीतिरिवाज कसे राबविले गेले? अशा धोकादायक घटनांचा जो पुढे-मागे हिंदू धर्माच्या अस्तित्वावर बेतणारा, याची गंभीर दखल घेत हिंदू धर्माचे तारणहार शंकराचार्य यांनी आवाज उठविणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते.

५) २००४ साली, कांचीपीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती व त्यांचे सहकारी विजयेंद्र सरस्वती यांच्यावर एका मंदिराचे पुजारी शंकररामन यांची हत्या केल्याचा खोटा आरोप ठेवण्यात आला. निव्वळ आरोपाच्या आधारे कांचीपीठात तेथील पोलीस बुटासह शिरले, ऐन दिवाळीची पूजा करीत असताना शंकराचार्यांना फरफटत नेत कैद केले. पुढे २०१३ साली त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अशा प्रसंगीही त्यांचे समकालीन अन्य शंकराचार्य त्यांचा बचाव करण्यास सरसावले नाही, तर मूग गिळून गप्प राहिले. खरे तर शंकराचार्य यांनी या विरोधात आवाज उठविणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते. असे अनेक दाखले देता येतील, जेथे शंकराचार्य उणे पडले.

जेव्हा रामलला अनेक वर्षे मोडकळीतील अस्थायी तंबूत राहिले तेव्हा शंकराचार्य कोठे होते? बाबरी उद्ध्वस्त झाल्यानंतर मामला सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्यांनी शंकराचार्यांना हिंदूंच्या वतीने पक्षकार होण्यास सांगितले. अशा वेळी शंकराचार्यांनी हात वर केले होते. राम मंदिर अपूर्णतेचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. प्रभू रामचंद्राने रामेश्वर येथे ज्योतिर्लिंग बनविले, प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हा मंदिर होते का? केदारनाथ ज्योतिर्लिंग आधी, मग प्राणप्रतिष्ठा त्यानंतर मंदिर. दरम्यान पूजा-अर्चा नित्यनियमाने सुरू होत्या. प्राणप्रतिष्ठा १९५१ मंदिर १९५६. पाच वर्षांनंतर देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते मंदिर लोकार्पण संपन्न झाले. भारतात विशाल शिवलिंग आहेत, मूर्ती आहेत. जे आकारमानाने मंदिराच्या द्वारातून देव्हाऱ्यात आणले जाऊ शकत नाहीत. याचाच अर्थ प्रथम शिवलिंग, मूर्ती, मग प्राणप्रतिष्ठा त्यानंतर मंदिर!

सांगण्यास खेद होतो, पूर्व इतिहास पाहता सद्य शंकराचार्य आणि काँग्रेस पक्षाचे लागेबांधे राहिलेले आहेत. २०२२ पर्यंत सद्य शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे गुरू शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती महाराज. हे तर काँग्रेस पक्षाचेच शंकराचार्य गणले जात. एका पत्रकाराने यांना म्हटले, “नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार,” तर यांनी भान सोडून त्यांना मारहाण करीत हुसकावून लावले होते. यांचे पट्टशिष्य व काँग्रेस आणि त्यांच्यातील दुवा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग जे हिंदू द्वेषासाठी कुप्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर शोधल्यास यांच्यासोबत सोनिया, राहुल, प्रियंका अन् सर्व दिग्गज काँग्रेस नेते यांचे असंख्य फोटो दिसतील. जे त्यांच्यातील संबंध व वावर स्पष्ट करतात. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या शंकराचार्य पदग्रहणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला होता व यांच्या पदग्रहणास सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेतला होता. याचाच अर्थ यांची सुरुवातच वादातून झाली. २०१९ ला शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदन यांनी वाराणसीतून मोदी विरोधात हिंदू मते विभाजनासाठी उमेदवार उभे केले होते, पण त्यांच्या प्रमुख उमेदवाराचा अर्ज काही त्रुटींमुळे रद्दबातल ठरला. यामुळे अविमुक्तेश्वरानंद प्रक्षुब्ध होत भान सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपा आणि नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर पदास न शोभणाऱ्या अर्वाच्च्छ भाषेत त्यांच्यावर भर रस्त्यात मीडियासमोर तोंडसुख घेतले होते. स्पष्ट म्हणाले, “आम्ही मोदी विरोधात उभे ठाकलो आहोत.” वाराणसी येथील गंगा तटावरील प्रशंसनीय कॉरिडॉर उभारणीस याच अविमुक्तेश्वरानंद यांनी विरोध केला होता. मोदींबाबत यांचे परंपरागत वैर आहे. असे असंख्य दाखले देता येतील.

आता उजेडात येत आहे की, २७ डिसेंबर २०२३ उत्तराखंडचे काँग्रेस अध्यक्ष गाडियाल यांच्याशी यांची गुप्त भेट झाली होती. असे कळते की ती भेट राम मंदिराविरोधात खलबते आखण्यासाठी. कोणाचा आदेश त्यांनी आणला होता, जेणेकरून लागलीच वेळ साधून अविमुक्तेश्वरानंद विवादित भाष्य करू लागले. राम मंदिराविरोधात काही शंकराचार्य व संत महंत काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन बैठका, पत्रकार परिषदा घेत होते. मंदिराचा फायदा भाजपास होऊ नये यासाठी हीच मंडळी अयोध्येत व बाहेर राम मंदिराचा मुद्दा निकाली निघावा म्हणून प्रचारासाठी निघत होते, पत्रकार परिषद घेत होते. यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल हे त्यांना अर्थपुरवठा करीत असत. या चार पीठ व दोन उपपीठ या परस्परांमध्ये वाद व मतभेद आहेत, पण राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यात न जाण्याबाबत मात्र एकमत, तेही काँग्रेस मताशी मिळते जुळते. हे निव्वळ कटकारस्थान. हे सारे शंकराचार्यांसारख्या महान धर्मगुरूंना शोभते का?

१२ ज्योतिर्लिंग, ५१ शक्तिपीठे, चारधाम, मथुरा द्वारिका, असंख्य देवी-देवतांचे मंदिरे येथे हिंदू मोठ्या श्रद्धेने-भक्ती भावाने पोहोचतात, पूजाअर्चा करतात. किती हिंदूंना शंकराचार्य व त्यांच्या पीठाविषयी माहिती आहे? किती हिंदू तेथे पोहोचतात? असे का घडले? याचे उत्तर निष्क्रियता, स्थितप्रज्ञता, पक्षपातीपणा इत्यादी. राम मंदिराविषयी तोंड उघडून यांनी स्वतःचे व आपल्या पिठाचे हसे करून घेतले आहे. यांच्या बोलण्याचा समस्त हिंदुजनावर काय प्रभाव झाला? कोणीही दखल घेतली नाही. राम मंदिर सोहळा मोठ्या ‘न भूतो न भविष्यति’ दिमाखात देदीप्यमान साजरा होणार. प्रत्येक हिंदूंनी याचे स्वागत करावे, हेच हिंदुजनांचे प्रथम कर्तव्य. ।। बोलो सियावर रामचंद्र की जय ।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -