Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यआता आम्ही ही परीक्षा द्यायची का?

आता आम्ही ही परीक्षा द्यायची का?

  • मुंबई डॉट कॉम : अल्पेश म्हात्रे

मुंबई शहरात जर एखाद्या नवख्या परदेशी व्यक्तीस घर घ्यायचे असेल तर तो प्रथम त्या परिसरातला दलाल पकडतो त्यास ब्रोकर असे म्हणतात. मग तो त्याच्याकडील रिकाम्या घरांची माहिती व गरज असलेल्या व्यक्तींची सांगड घालून वेळप्रसंगी पदरमोड करून आलेल्या ग्राहकांचे समाधान करतो. आलेल्या ग्राहकांची गरज पूर्ण झाल्यास व त्या दोघांमध्ये व्यवहार झाल्यास या संपूर्ण व्यवहाराची मोठी अधिकृत प्रक्रिया पार पडते व ब्रोकर व्यक्तीस त्याची दलाली मिळते. व्यवहार न झाल्यास आर्थिक नुकसान होते व केलेले कष्ट वाया जातात, मात्र तरी ते ब्रोकर पुन्हा दुसऱ्या ग्राहकास सेवा देण्यास उत्साहाने तत्पर असतात. असा हा व्यवहार असून यात कोणतीही भविष्यकालीन शाश्वती नाही. कोणतेही स्थिर उत्पन्न नाही, मेहनतीची व कष्ट करण्यासाठी सदैव तत्पर असलेली ही मंडळी कुठे एका छताखाली एकत्रित नाहीत तरी प्रत्येक ठिकाणी या मंडळींची गरज ही असतेच. मात्र शासनच यांच्या आता मुळावर येते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

औद्योगिक कारणामुळे मुंबईतील गिरण्या व कारखाने बंद पडले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व कामगार बेघर झाला. आपले घर चालावे म्हणून मुंबईतील हजारो लोकांनी इस्टेट एजंटांचा मार्ग स्वीकारला. या कामात महिना दोन महिने एखादे दुकान किंवा घर दाखवण्यासाठी पायपीट करून एखाद्याचे काम होते. त्या कामाचे काही वेळेस ग्राहकांकडून कमिशनही दिले जात नाही. कारण कमिशन देण्याचा कायदाच अस्तित्वात नाही. त्यांना वाटते की एजंट चांगल्या स्थितीत आहेत. पण मुंबईतील लाखो इस्टेट एजंट आणि दोन टक्के एजंट चांगल्या सुस्थितीत आहेत; परंतु ९८ टक्के एजंट अतिशय हलाखीच्या परिस्थितीत हे काम करत आहेत. त्यांना ना शासनाची मदत मिळते, ना पोलिसांची मदत मिळते, एखाद्याने कमिशन दिले नाही तर पोलीस एजंट लोकांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत व त्यांना सापन्नतेची वागणूक देतात. शासन एजंट लोकांना मालक समजतात; परंतु सत्य परिस्थिती वेगळी आहे. ते वेठबिगाराप्रमाणे काम करत असतात. सौदा झाल्यानंतर घरमालक व घर घेणारे कमिशन देतील याची खात्री नसते. त्यामुळे हे एजंट नेहमी दुसऱ्यावर अवलंबून असतात. एजंट लोक एखाद्याचे घर दुसऱ्याला म्हणजे घर घेणाऱ्याला दाखवतात. तसेच अनेक घरं अनेक दुकानं रोज दाखवण्याचे काम पायपीट करून करत असतात, त्यावेळी जर सौदा झाला तर घर मालक व घर घेणारे कमिशन देतील याची खात्री नसते. म्हणूनच इस्टेट एजंट हे घर घेणारा व घर देणारा याच्यावर अवलंबून असतात. यात सर्व तोंडी दिलेल्या शब्दांवर प्रथम व्यवहार चालतो. कोणतेही स्थिर उत्पन्न नसल्याने त्यांना बँकेकडून कर्जही मिळत नाही. यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षणही व्यवस्थित होत नाही. अशा परिस्थितीत त्यांना इतर असंघटित कामगारांप्रमाणे सर्व शासन सुविधापासून वंचित राहावे लागते. विशेष म्हणजे सध्या घडीला या क्षेत्रात ९० टक्के मराठी माणसे आहेत व १० टक्के उत्तर भारतीय आहेत. असे असूनही सरकारी अनास्था या लोकांच्या बाबतीत दिसून येते. महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण खात्यांतर्गत असणाऱ्या महारेरा यांनी इस्टेट एजंटांसाठी आता परीक्षेची अट घातली आहे. ती अन्यायकारक असल्याची या सर्वांची भावना झाली आहे. जर काही परीक्षा पास झाले तरच यापुढे त्यांना अधिकृतपणे दलालीची कामे करता येणार आहेत. यामध्ये काम करणारे बरेच जण अशिक्षित व शिकलेले वयोवृद्ध अथवा आपले दुसरे काम सांभाळून या कामात वेळ देणारे आहेत. त्यामुळे महारेराने इस्टेट एजंटसाठी ही परीक्षा अनिवार्य केली आहे. ती परीक्षा बहुतांश मुंबईत राहणारे भूमिपुत्र पास होऊ शकत नाहीत. कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे उद्योग, कामधंदा करून रिअल इस्टेटचे काम करत आहेत व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत आहेत. महारेरा यांनी जो परीक्षेचा आदेश काढला आहे तो तत्काळ रद्द करावा जेणेकरून या इस्टेट एजंट युनियनमध्ये काम करणारे लाखो लोक बेरोजगार होणार नाहीत अशी त्यांची मागणी आहे.

सध्या महाराष्ट्रात या एजंट लोकांसाठी राहू मामा कांबळे यांनी महाराष्ट्र रिअल इस्टेट एन्जन्ट ही एकमेव काम करणारी संघटना असून तिचे सध्या हजारांच्या आसपास सभासद आहेत. या संघटनेच्या मार्फत हे एजंट लोक सध्या एका छताखाली आपल्या न्याय मागण्यांसाठी एकत्र आहेत. ग्राहकांच्या मूलभूत हक्कांसाठी व त्यांची फसवणूक होऊ नये व त्यांना सुरक्षितता मिळावी म्हणून रेरा स्थापन झाले, मात्र या एजन्टाना परीक्षा देण्याच्या नावाखाली तेथे परप्रांतीय दलालांची भरती करण्याचा हा डाव असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. जर या दलालांची भरती झाली तर मराठी माणूस या क्षेत्रातून पूर्णपणे उठेल व परप्रातीय दलालांची मनमानी व अडवणूक सुरु होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजही मुंबई शहरात काही समाजातील व्यक्तींना, सिनेक्षेत्रातील व्यक्तींना, एकट्या स्त्रीला, घर भाड्याने मिळणे सुद्धा कठीण होते, मात्र माणुसकीच्या नात्याने व तडजोडी करून, वेळप्रसंगी हे एजंट त्यांच्या जबाबदारीवर घर मिळवून देतात, जर यानंतर काही ठरावीक दलालांची मक्तेदारी निर्माण झाल्यास ग्राहकांची आर्थिक पिळवणूक होण्याचा मोठा धोका आहे. म्हणून आता तरी सरकारने आपल्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी या एजंटांनी सुरू केली आहे.

या एजंटांची असंघटित कामगार म्हणून नोंद करावी, नोंदीत एजंटांना मासिक पेन्शन किमान पाच हजार लागू करावी. या एजंटांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजन लागू करावी, एजंटांना प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा लागू करावी, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, एजंटांना काम करत असताना मृत्यू झाल्यास त्यांना पाच लाख मिळावेत, एजंटांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांना किमान दोन लाख मिळावेत, एजंटाच्या कुटुंबातील सदस्यांचा विमा योजनेचा लाभ मिळावा, एजंट यांच्या मुलांना शैक्षणिक, आर्थिक सहाय्य मिळावे, एजंट यांच्या पत्नीस दोन आणि त्यापर्यंत नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार मिळावेत, नोंदीत एजंट यांच्या मुलांना दहावी व बारावी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास दहा हजार एवढे प्रोत्साहनात्मक आर्थिक सहाय्य मिळावे, एजंट यांच्या मुलांना दहावी व पुढच्या शिक्षणासाठी प्रति वर्ष किमान २० हजार शैक्षणिक आर्थिक सहाय्य मिळावे, एजंटांच्या मुलांनी शैक्षणिक बारावीमध्ये ८० टक्के गुण मिळवल्यास त्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, नोंदीत एजंट यांच्या एका मुलीच्या जन्मांतर पती-पत्नीने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीचे नवे किमान पाच लाखांचे आर्थिक सहाय्य मिळावे, नोंदीत एजंट एखादी जागा किंवा रूम दाखवून व्यवहार ठरल्यास काही व्यक्ती कमिशन देत नाहीत. त्यावेळेस पोलीस संरक्षण मिळावे तसेच एजंटांना मेहनतीने मिळवलेल्या कमिशनच्या रकमेवर आयकर लागू नये. या मागण्या गेली कित्येक वर्षे ही मंडळी करत आहेत, वेळप्रसंगी आझाद मैदानात आंदोलनही करून झाली मात्र आश्वासनांच्या पलीकडे यांना काहीही मिळत नाही. आपल्या मूलभूत हक्कांसाठी ही मंडळी लढत असून आता तरी आपले सरकार आल्याने यांच्या अाशा पल्लवीत झाल्या असून मुंबईतून मराठी माणसाची मोठी संख्या कमी झाली आहे. आता तरी येथील स्थानिक मराठी वर्ग टिकावा यासाठी यांना न्याय द्यावा व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा हीच यांची अपेक्षा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -