Friday, August 28, 2026

CM Devendra Fadnavis : 'सिंहस्थ कुंभमेळ्याला बदनाम करण्याचे कारस्थान यशस्वी होणार नाही'

CM Devendra Fadnavis : 'सिंहस्थ कुंभमेळ्याला बदनाम करण्याचे कारस्थान यशस्वी होणार नाही'

नाशिक : सिंहस्थ महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून कुंभमेळ्याला विनाकारण बदनाम करण्याचे कारस्थान काहीजण करत आहेत. मात्र, हे कारस्थान कदापि यशस्वी होणार नाही. आगामी काळात नाशिकचा बदललेला आणि विकसित चेहरा सर्वांसमोर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने ठक्करडोम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भक्ती संगम’ कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, पक्षाचे शहराध्यक्ष सुनील केदार, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक स्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.(Simhastha Kumbh Mela)

सिंहस्थ कुंभमेळा हा भक्ती आणि आस्थेशी निगडित असताना देखील काहीजण विनाकारण या श्रद्धेला बदनाम करण्याचे कारस्थान करत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याला बदनाम करण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. प्रशासन आणि सरकार भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करून काहीजण कुंभमेळ्याची बदनामी करण्याचे काम करत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. कुंभमेळ्याबाबत आरोप करणाऱ्यांनी ‘ये पब्लिक है, सब जानती है’ हे लक्षात ठेवावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. (CM Devendra Fadnavis)

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबर तसेच इतर साहित्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे कामे करताना काही अडचणींचा सामना करावा लागला आणि काही कामांना विलंब झाला. तसेच नॅचरल गॅस प्राधिकरणाकडून काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम झाल्यानेही विलंब झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. या विलंबामुळे नाशिककरांना त्रास सहन करावा लागला असून, त्याबद्दल सरकारने यापूर्वीच नागरिकांची माफी मागितली आहे. आजही नाशिककरांची माफी मागत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  (CM Devendra Fadnavis)

आगामी काळात नाशिकमध्ये होणारा विकास सर्वांना चकित करणारा असेल. ‘विकसित नाशिक’चा चेहरा सर्वांसमोर आल्यानंतर नागरिकांना झालेला विकास पाहून समाधान आणि आनंद होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची सरकारला जाणीव आहे. स्थानिक पदाधिकारी, आमदार, मंत्री तसेच महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे. सध्या नागरिकांना त्रास होत असला तरी भविष्यातील विकासकामांमुळे त्यांना समाधान मिळेल. त्यामुळे नागरिकांनी पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला तरी त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >