Saturday, August 22, 2026

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

Cough Syrup Warning For Kids : लहान मुलांसाठी सर्दी-खोकल्याच्या औषधांवर बंदी

नवी दिल्ली : चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने सर्दी-खोकल्यावरील काही औषधांच्या वापराबाबत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलेफ्राइन हायड्रोक्लोराइड या दोन घटकांच्या संयोजनातून तयार होणारी औषधे चार वर्षांखालील मुलांना देऊ नयेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या औषधांच्या पाकिटांवर, औषधासोबतच्या माहितीपत्रकावर तसेच जाहिरात सामग्रीवर स्पष्ट सूचना देणे औषध कंपन्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. ‘चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये वापरू नये’, असा स्पष्ट उल्लेख पाकिटावर करावा लागणार आहे. तज्ज्ञ समिती आणि ड्रग्स टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्डाच्या (DTAB) शिफारशीनंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. या औषधांच्या संयोजनामुळे लहान मुलांमध्ये आरोग्यविषयक धोके निर्माण होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे. या वयोगटासाठी तुलनेने सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याने या औषधांचा वापर टाळण्याची शिफारस करण्यात आली. (Cough Syrup Warning For Kids)

याआधी १५ एप्रिल २०२५ रोजीच्या अधिसूचनेत काही फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर अशाच प्रकारची सूचना देण्यात आली होती. आता या निर्णयाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फिनाइलेफ्राइन हायड्रोक्लोराइड या दोन्ही घटकांचा समावेश असलेल्या सर्व एफडीसी औषधांना हा आदेश लागू असेल. ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४० मधील कलम २६A अंतर्गत केंद्राने हा आदेश जारी केला आहे. दोन किंवा अधिक सक्रिय औषधी घटक निश्चित प्रमाणात एकत्र असलेल्या औषधांना एफडीसी म्हटले जाते. (Cough Syrup Warning For Kids)

लहान मुलांमध्ये सर्दी-खोकल्याच्या औषधांच्या वापराबाबत केंद्र सरकारने यापूर्वीही सावधगिरीचे निर्देश दिले आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नये, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला होता. काही राज्यांमध्ये कफ सिरपच्या सेवनानंतर मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर ही सूचना जारी करण्यात आली होती. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा औषधांचा वापर टाळणे महत्त्वाचे मानले जाते. (Cough Syrup Warning For Kids)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा