Wednesday, August 12, 2026

Nashik : भूकंपाच्या मालिकेनंतर नाशिक प्रशासन सतर्क ! नाशिकमधील धोकादायक इमारतींचे पुनर्सर्वेक्षण

Nashik : भूकंपाच्या मालिकेनंतर नाशिक प्रशासन सतर्क ! नाशिकमधील धोकादायक इमारतींचे पुनर्सर्वेक्षण

Nashik :नाशिक जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र सुरू आहे. या काळात २.६ ते ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे तब्बल ४५ धक्के नोंदवण्यात आले आहेत. सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, चांदवड, देवळा, निफाड आणि नाशिक तालुक्यात या धक्क्यांची नोंद झाली आहे. सतत जाणवणाऱ्या या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना प्रशासनाने आता धोकादायक इमारतींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले आहे. पावसाळ्यापूर्वी लाल फुली मारून धोकादायक ठरवण्यात आलेल्या इमारतींचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

धोकादायक  इमारतींचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील सात ते आठ तालुक्यात भूकंपाच्या सौम्य धक्क्यांचे सत्र सुरू असून नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (District Collector Ayush Prasad) यांनी प्रशासकीय नियोजनाची माहिती दिली. मागील काही दिवसात सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, चांदवड, देवळा, निफाड, नाशिक तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (Geological Survey of India) आणि राष्ट्रीय सिस्मॉलॉजी सेंटरच्या (National Seismology Center) तज्ज्ञांनुसार या सौम्य भूकंपाच्या मालिकेने मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही. परंतु, प्रशासन कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. या तीव्रतेच्या धक्क्यांनी भिंतींना भेगा पडू शकतात. पावसाचे पाणी अशा भेगांमध्ये साचल्यास गंभीर स्थिती होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी वास्तव्याच्या दृष्टीने लाल रंगाची फुली मारून धोकादायक ठरवलेल्या इमारतींचे पुनर्सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले.

...तर इमारत पडणार

भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारतींच्या भिंती, छत, स्तंभ किंवा पायाभूत संरचनेला तडे गेले आहेत का, याची तपासणी केली जाणार आहे. इमारत धोकादायक आढळल्यास ती रिकामी करणे, दुरुस्ती करणे किंवा आवश्यक असल्यास पाडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी समाजमंदिरे आणि शाळांचा तात्पुरता निवारा म्हणून वापर करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.

भूकंपाच्या कारणांचा आणि भूगर्भातील हालचालींचा सखोल अभ्यास करण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने संबंधित परिसरात सिस्मोग्राफ यंत्र बसवले आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि राष्ट्रीय सिस्मॉलॉजी सेंटरच्या तज्ज्ञांच्या मते, सध्या नोंदवले गेलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून मोठ्या नुकसानीची शक्यता कमी आहे. मात्र प्रशासनाकडून कोणताही धोका पत्करला जाणार नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भोरगिरी परिसरातील भूस्खलनप्रवण २५ गावांच्या पुनर्वसनासाठीही शासकीय योजनांच्या माध्यमातून नियोजन सुरू करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >