Friday, August 7, 2026

Nashik : महापालिकेच्या रुग्णालयांचा स्थायी समितीकडून पंचनामा, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी स्वतंत्र बैठक

Nashik : महापालिकेच्या रुग्णालयांचा स्थायी समितीकडून पंचनामा, समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी स्वतंत्र बैठक

Nashik : नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) बिटको, डॉ. झाकीर हुसेनसह अन्य रुग्णालयांतील आरोग्यसेवेच्या ढिसाळ कारभारावर स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने, मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असल्याने तसेच तपासण्यांचे अहवाल पाच-सहा दिवस उशिरा मिळत असल्याने आरोग्य विभागावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी (दि. ८) विशेष महासभेनंतर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सभापती मच्छिद्र सानप यांनी दिले. (Nashik News)

डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप

शिवसेना (ठाकरे गट)चे सदस्य योगेश गाडेकर यांनी बिटको रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला. लाखो रुपयांचे मानधन घेणारे डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. बिटको व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील कोट्यवधी रुपयांचे ऑक्सिजन प्लांटही वापराअभावी पडून असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सदस्य आदिती पांडे, बाळा निगळ, दीपाली कुलकर्णी आणि जयश्री गायकवाड यांनीही आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका केली. (Nashik News)

गोदापार्क प्रकल्पातून महापालिकेला लाखोंचे उत्पन्न

फाळके स्मारकाच्या खासगीकरणावर सदस्य राहुल दिवे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर आयुक्त मनीषा खत्री यांनी मागील तीन वर्षांत २५ कोटी रुपयांचा तोटा झाल्याने खासगीकरणाचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. तसेच गोदापार्क प्रकल्पातून महापालिकेला दरवर्षी ४० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून प्रत्येक प्रभागात अशाच प्रकारचा प्रकल्प उभारण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शहरातील महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमणाचा मुद्दा योगेश गाडेकर यांनी उपस्थित केला. त्यावर सर्व भूखंडांचे सर्वेक्षण करून अतिक्रमण रोखण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी फेरनिविदा काढावी लागणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा