Wednesday, August 5, 2026

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग ! नाशिकरोड स्थानकावर २४ बोगी गाड्या प्लॅटफॉर्म एकवर लागणार

Simhastha Kumbh Mela 2027 : कुंभमेळ्याच्या तयारीला वेग ! नाशिकरोड स्थानकावर २४ बोगी गाड्या प्लॅटफॉर्म एकवर लागणार

Simhastha Kumbh Mela 2027 : आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकासकामांचा धडाका सुरु आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्थानक लवकरच नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्थानक परिसरात कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे हाती घेतली असून यात २४ बोगींच्या गाड्या प्लॅटफॉर्म एकवर लागतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.

कुंभमेळ्याच्या तयारीला वेग !

कुंभमेळ्याच्या निमित्ताने केंद्र तसेच राज्य सरकारकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामसकामांना वेग वाढला असताना आता गेल्या कुंभमेळ्यात उभारण्यात आलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आता ६ कोटी ६४ लाख रुपये खर्चुन संपूर्ण पत्र्याचे कव्हर शेड टाकण्याचे काम सुरू झाले आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या फ्लोअरिंगचे नूतनीकरण आणि नवीन टाईल्स बसवण्याच्या कामासाठी ४ कोटी ४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. एकट्या प्लॅटफॉर्म ४ च्या विकासासाठी तब्बल १० कोटी ६८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वरील खराब झालेले पत्रे बदलून त्या ठिकाणी नवीन पत्रे बसवले जात आहेत. तसेच पावसाचे पाणी योग्य रीतीने वाहून जाण्यासाठी खराब झालेले पन्हाळे (ड्रेनेज पाइप्स) बदलण्याचे कामही वेगाने सुरू झाले आहे.

मालधक्क्याच्या गोडाऊनमध्ये  'होल्डिंग एरिया'

सध्या ५१५ मीटर लांबीचा असलेला प्लॅटफॉर्म १ आता मालधक्क्याच्या दिशेने (मुंबई बाजूने) ४५ मीटरने वाढवण्यात येणार आहे. हे काम येत्या जानेवारी महिन्यात सुरू होऊन महिनाभरात पूर्ण केले जाईल. प्लॅटफॉर्मची लांबी वाढल्याने मुंबईकडून येणाऱ्या २४ बोर्गीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या थेट प्लॅटफॉर्म १ वर लागू शकतील. यामुळे प्रवाशांना, सामानाची वाहतूक करणाऱ्यांना आणि पार्सल विभागाला मोठा दिलासा मिळणार असून फेरफटका वाचेल. दरम्यान, कुंभमेळ्यादरम्यान मालधक्क्याच्या गोडाऊनमध्ये भाविकांसाठी 'होल्डिंग एरिया' (थांबण्याची जागा) बनवला जाणार असून, त्या काळात मालधक्का तात्पुरता बंद ठेवण्यात येईल.

३,३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुरक्षा आणि गर्दी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महापालिकेने (Nashik Municipal Corporation) मोठे पाऊल उचलले आहे. पुढील दोन महिन्यांत शहरभर सुमारे १,५०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) कार्यान्वित होणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अत्याधुनिक निगराणी यंत्रणा उभारली जात आहे. एकात्मिक निगराणी प्रणालीअंतर्गत शहरात एकूण ३,३०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने कुंभमेळ्यापूर्वीच गर्दी व्यवस्थापनासाठी (Crowd Management) तयार करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीची (SOP) चाचणी घेता येणार असून, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आधीच दूर करता येतील. ही यंत्रणा शहरातील गर्दीची हालचाल, वाहतुकीची स्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेवर रिअल-टाइममध्ये लक्ष ठेवणार आहे. 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >