Saturday, July 25, 2026

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल 

सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे प्राप्ती रेडकर.आपल्या मधुर आवाजामुळे आणि संघर्षमय प्रवासामुळे सावलीची ओळख अधिक ठळक झाली आहे. प्राप्तीचे बालपण डोंगरीत गेले. सेंट जोसेफ या कॉन्व्हेन्ट शाळेमध्ये तिचे शालेय शिक्षण झाले. बालपणापासून ती टॉम बॉय सारखी रहायची. पुढे चर्चगेट मधील के. सी. कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनय, फॅशन शो, लोकनृत्यामध्ये देखील भाग घेतलेला आहे.

वयाच्या सातव्या वर्षांपासून तिने जवळपास तीनशे ते चारशे ऑडिशन दिल्या. 'तू माझा सांगाती' ही तिची पहिली मालिका. त्यानंतर तिने क्राइम पेट्रोल, उड्डाण मालिकेमध्ये काम केले. जशा मालिका मिळत होत्या तशा ती करीत गेली. त्यानंतर आईने तिला चांगल्या, मुख्य भूमिका असेल तरच मालिकेमध्ये काम कर, असे सांगितले. त्यामुळे वयाच्या १७ ते १८ व्या वर्षी तिच्याकडे अभिनयाचे काम नव्हते. दरम्यान तिने जिम जॉइन केली आणि स्पोर्ट्समध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.जिम जॉइन करून तीन महिने झाले होते, त्यावेळी तिला निर्माती - दिग्दर्शिका श्रावणी देवधराच्या प्रोडक्शन हाऊसकडून ऑडिशनसाठी फोन आला. ऑडिशनमध्ये तिची निवड झाली आणि तिला 'काव्यांजली' ही मालिका मिळाली. दीड वर्षे त्या मालिकेमध्ये तिने काम केले. ती मालिका शेवटच्या टप्प्यावर असतानाच तिला 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलाविले. पाच वेळा तिची या मालिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली, पंधरा ते वीस वेळा तिने लूक टेस्ट दिली. शेवटी या मालिकेसाठी तिची निवड करण्यात आली. या मालिकेमध्ये तिची काय भूमिका असणार आहे हे तिने घरच्यांना सांगितले नव्हते. त्या मालिकेचा मुहूर्त होता, त्यावेळी तिच्या पालकांना प्राप्तीच्या सावळ्या गेटअपची कल्पना आली.

'सावळ्याची जणू सावली' या मालिकेतील सावली कशी आहे असे विचारल्यावर ती म्हणाली की सावली सयंमी आहे, ती समजून घेते, समजावते. विठ्ठलाची खूप मोठी भक्त आहे. लहानपणी काही अपरिहार्य कारणामुळे तिला तिचा आवाज गहाण ठेवावा लागताे. ती चांगली गात असून देखील तिला तिची ओळख लोकांपुढे आणता येत नाही. पुढे सारंगला कळल्यानंतर तो सावलीला सर्वांसमोर आणतो, तिचा आवाज आहे हे तो सर्वांना सांगायला सांगतो. या एपिसोडचा टी. आर. पी. खूप वाढला होता. एकंदरच 'सावळ्याची जणू सावली' ही मालिका प्राप्तीच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरली आहे. काव्यांजली मालिकेपासून तिची ओळख निर्माण झाली होती; परंतु सावळ्याची जणू सावली या मालिकेमुळे प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले.काव्यांजली मालिका सुरू होती, तेव्हा ती तिच्या मालिकेच्या टीमसोबत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला गेली होती. दुसऱ्यावर्षी देखील ती पंढरपूरला गेली होती. सावळ्याची जणू सावली ही मालिका सुरू होण्याआधी देखील ती पंढरपूरला जाऊन आली. विठुरायाचे दर्शन घेतले. गेल्या वर्षी सारंग आणि ती पंढरपूरला गेले होते. वारीमध्ये दहा किलोमीटर अंतर चालले कारण वारीमध्ये त्याचे सीन होते. मंदिराचे दर्शन घेतले. या मालिकेला तोपर्यंत एक वर्ष झाले होते. लोक सावलीला ओळखत होते. वारीमधील एक काकू सावलीला म्हणाल्या, “अरे सावली, तू आम्हाला भेटलीस, तुझ्यातच आता आम्हाला पंढरी दिसली, तिथे जायची आता गरज नाही” ही प्रतिक्रिया ऐकून ती सुखावून गेली, तिने डोळ्यांतील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वारीतील वारकरी तिचे पाय धरू लागले होते. हा खूप वेगळा अनुभव तिला वारीमध्ये प्राप्त झाला. प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वारी करावी असे तिला वाटते. आषाढीच्या महिन्यात पंढरपूर खूपच अप्रतिम दिसतं. त्या परिसरात एक अलौकिक शक्ती असल्यासारखं वाटतं. असं ती सांगते.

गेल्या वर्षी वारीत दिंडीत आम्ही शूट करीत होतो, माझे आई - बाबा हरवले आहेत असा सीन होता, मी आणि सारंग आई - बाबांना शोधत होतो.मी वारकऱ्यांना विचारत होते,' माझे आई - बाबा कुणाला दिसले का ?' तेंव्हा अनेक वारकरी स्वतःची दिंडी सोडून माझ्या आई - बाबांना शोधायला तयार झाले होते. नंतर आम्ही त्यांना हा शूटचा भाग असल्याचे सांगितले.तेंव्हा जाणवले की वारकरी किती निर्मळ मनाचे असतात.या मालिकेसाठी तीन ते चार दिग्दर्शकांनी कामे केली आहेत. महेश कोठारे व्हिजनचे हे प्रोडक्शन आहे. आज तिच्या घरात विठुरायाच्या पाच ते सहा मुर्त्या आहेत. या मालिकेतील सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट मालिका यांसारखे नऊ पुरस्कार तिला मिळाले. किक बॉक्सिंग आणि कराटे यामध्येही जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर तिला खेळातून सुवर्ण पदक मिळाले आहे. 'सावळ्याची जणू सावली ' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचा विठ्ठलरूपी आशीर्वाद मिळत आहे.

Comments
Add Comment