Thursday, July 23, 2026

निर्भीड पत्रकार: लोकमान्य टिळक

निर्भीड पत्रकार: लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज (२३ जुलै) १७० वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या आठवणींना दिलेला उजाळा.

आकाश जरी कोसळले, तरी मी कोसळणार नाही. त्या कोसळलेल्या आभाळावर उभा राहून ध्येयाकडे वाटचाल करीन,” असा विचार ज्यांनी जनमनात रुजवला ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील थोर पुढारी, निर्भीड पत्रकार, संपादक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, प्रतिभावंत लेखक,उत्तम वक्ते म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सन १८९० ते १९२० हा काळ टिळक युग मानला गेल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वमान्य जनतेवर प्रभाव पडला. टिळक हे जहालवादी असून, इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करून सर्व जनतेने आंदोलन केले पाहिजे अशी त्यांची विचारधारा होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’पासून तसेच कलकत्ता येथील ‘अमृतबझार पत्रिकेचे संपादक शिरीषबाबू घोष यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोकमान्य टिळक यांनी मराठी व इंग्रजी वृत्तपत्र काढण्याचे ठरवले. दि. २ जानेवारी १८८१ रोजी ‘मराठा’ हे इंग्रजी व दि. ४ जानेवारी १८८१ रोजी ‘केसरी’ ही दोन वृत्तपत्रं प्रसिद्ध करून टिळक मराठी पत्रकारितेच्या परंपरेचे पाईक झाले. त्याकाळी ही ‘केसरी’(मराठी) व ‘मराठा’(इंग्रजी) हे साप्ताहिक स्वरूपात असून ते दर मंगळवारी पुणे येथून प्रसिद्ध होत असे. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे १८८१ ते १८८७ या काळात केसरीचे संपादक तर टिळक हे १८८१ ते १९२० या काळात 'मराठा'चे संपादक होते.“या पत्रात एरवीच्या वर्तमानपत्राप्रमाणे बातम्या, राजकीय प्रकरण, व्यापारासंबंधी माहिती वगैरे नेहमीचे विषय तर येतीलच पण या खेरीज लोकस्थितीवर निबंध, नवीन ग्रंथावर टीका, वगैरे विषयांचा त्यात समावेश केला जाईल. तसेच विलायतेत ज्या राज्यप्रकरणांची वाटाघाट होते ती इकडील लोकास समजणे अवश्य असल्यामुळे त्याचाही सारांश रूपाने यात संग्रह करण्याचा बेत केला आहे.” असा मजकूर ‘केसरीच्या’ पहिल्या अंकात प्रसिद्ध झाला होता. या निवेदनाप्रमाणे टिळकांनी अखेरपर्यंत लेखन केले.

वर्तमानपत्रकर्ते हे रयतेचे कोतवाल व वकील होत, हीच भूमिका केसरीच्या संपादकांनी अंगी बाळगली. कोल्हापूर गादीच्या प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना चार महिने तुरुंगवास घडल्याने १८८४ पासून त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेले आणि दि.२५ ऑक्टोबर १८८७ च्या केसरीच्या अंकात आगरकर यांचा केसरीचा संबंध नसल्याचे जाहीर केले.‘केसरी’ या वृत्तपत्राचा इतिहास हा केवळ एका वृत्तपत्राचा इतिहास नसून,तो जणू स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास आहे. केसरी या वृत्तपत्राला टिळकांनी जहाल राष्ट्रवादी चळवळीचे मुखपत्र म्हणून एक वेगळा आकार दिला. टिळकांची लेखणी ही निर्भीड व धारदार असून, इंग्रजांविरुद्ध राजकीय प्रबोधांचे एक शस्त्र म्हणून त्यांनी केसरीतून आपली लेखणी चालवली. त्यांची पत्रकारिता ही जणू त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा एक भाग होती. याची एक आठवण म्हणजे, दि.१५ जून १८९७ रोजी केसरीत ‘शिवाजीचे उद्गार’ ही कविता प्रसिद्ध झाल्यामुळे टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सुमारे दीड वर्षं कारावासाची शिक्षा झाली. त्यावेळी साहित्यसम्राट न. चिं. केळकर हे केसरीचे संपादक होते. वास्तविक ती कविता नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिली असली, तरी त्या लेखनाची जबाबदारी ही टिळकांनी स्वत:कडे घेतली व दि.२४ जून १९०८ रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षांची शिक्षा होऊन त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवले. टिळकांच्या अग्रलेखांचे मथळे हे जणू वाचकांना चक्रवून सोडत असत.‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’?,‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’,‘उजाडले पण सूर्य कोठे’?, ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ’,‘गोळी घाला की फाशी द्या’,‘उत्तम गुराखी कोण’? हे त्यांच्या अग्रलेखांचे मथळे केवळ शोभेचे नसून, त्याकाळी ब्रिटिश राज्यकर्त्यांची रेवडी उडवताना सामान्य वाचकांना त्याद्वारे बोध मिळत असे. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या त्यांच्या गाजलेल्या अग्रलेखाची सुरुवात करताना टिळक लिहितात, “हा प्रश्न पाहून आमचे कित्येक वाचक केसरीकारांचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न करतील, आम्ही काय म्हणत आहोत ते नीट ऐकून घेण्याबद्दल त्यास प्रथम विनंती करून नंतर विषयाकडे वळतो’ अशा मार्मिक भाषेत ते लेखन करत असत. एखाद्या विषयाचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करून त्या विषयाचा निकाल लावेपर्यंत टिळक तो विषय सोडत नसत. ज्येष्ठ साहित्यिक वामन मल्हार जोशी यांनी केसरीविषयी असे मत मांडले आहे की,“त्यांच्या (टिळकांच्या) लेखात प्रतीपक्षांना असह्य तेज असे. सांगोपांग विचार, बिनतोड युक्तिवाद, मुद्देसूद व सरल मांडणी, सुबोध व कोटीबाज भाषा अशा गुणांनी ते पुरेपूर भरलेले असायचे. लेख लिहिण्यापूर्वी त्या त्या विषयाची माहिती मिळवण्याबाबत टिळक बराच काळ दवडीत असत” तर ‘केसरी’तील टिळकांचे लेखन स्वदेश चळवळीला चांगलेच पूरक ठरत असल्याचे मत त्यांचे सहपत्रकार व ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांनी मांडले होते.

एखाद्याचा मृत्यूलेख लिहिणे ही संपादकीय लेखनाची कसोटी असते. त्या व्यक्तीशी जरी काही मतभेद असतील तरी, ते त्यावेळी बाजूला सारून त्या व्यक्तीबद्दल टिळक भरभरून लिहीत असत. दि.१७ जून १८९५ रोजी गोपाळ गणेश आगरकर यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी टिळकांना अश्रू अनावर झाले. आगरकरांची व त्यांची सख्खी मैत्री व घट्ट मतभेद असल्याने टिळकांनी केसरीत आगरकरांवर लिहिलेला मृत्यूलेख वाचून त्याकाळी सामान्य वाचकांना खऱ्या अर्थाने आगरकर यांची महती कळली. आगरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक त्यांच्यावर दरवर्षी लेख लिहीत असत. तसेच दि. १९ फेब्रुवारी १९१५ रोजी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या निधनाची बातमी जेव्हा टिळकांना समजली तेव्हा ते सिंहगडावर होते. त्यावेळी त्यांचे एक मित्र त्यांना गोखल्यांच्या घरी घेऊन आले. टिळक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले व गोखल्यांची महती सांगणारे भाषण अंत्यविधीच्या प्रसंगी केले व त्वरित केसरीच्या कार्यालात जाऊन गोखल्यांच्या मनोनिग्रहाची प्रसंशा करणारा मृत्यूलेख त्यांनी केसरीत लिहिला. लेख लिहिताना त्यांनी भाषा सजवण्याची अगर रंगवण्याची खटपट कधीही न करता, आपल्या मनातील आशय किंवा स्फूर्तिदायक संदेश वाचकांच्या मनाला जाऊन कसे भिडतील याचा विचार करत. सडेतोडपणा व उत्कटता हा त्यांच्या भाषेचा अलंकार असून, जो वाचक त्यांचे लेख तादात्म्य बुद्धीने वाचन करील त्या वाचकाला टिळकांची टेबलावर बसून अग्रलेख लिहिणारी मूर्ती न दिसता, उभे राहून मोठ्या आवाजात महत्त्वाच्या शब्दांवर जोर देऊन बोलणारी मूर्ती नक्कीच दिसेल.

सन १८८७ ते १९२० या काळात टिळकांनी केसरीत सुमारे ५१३ अग्रलेख लिहिले. आपली त्रिसूत्री मांडताना टिळक लिहितात, “जेणेकरून समाजाचे व्यापार सुरळीत चालण्यास मदत होईल असे लोकमत जागृत करणे व जो कोणी ह्या कामी व्यत्यय आणील त्याचे स्वरूपाविष्करण करून वेळीच बंदोबस्त करणे हे वर्तमानपत्रांचे मुख्य कर्तव्य आहे. तसेच गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही वर्तमानपत्रांचे मुख्य कर्तव्य नव्हे, तर सरकारच्या आवडीकरिता आम्ही पत्रे काढली नाहीत व सरकारवर कडक टीका केल्याने त्यांचा रोष आमच्यावर झाला तर त्याची आम्हास परवाही नाही. सरकारच्या जुलमी राज्यपद्धीवर जर कडक टीका करावयाची नाही तर ती पद्धत परिणामी लोकांस व राज्यकर्त्यांस जाचेल असे निर्भीडपणे म्हणायचे नाही तर वर्तमानपत्र काढावे तरी कशाला?” टिळकांच्या या त्रिसूत्रीचा आज सर्व पत्रकारांनी बोध घेऊन आपली पत्रकारिता केली तर निश्चितच ती टिळकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल यात शंका नाही.

__अमेय गुप्ते

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा