Tuesday, July 21, 2026

औषधांची स्वस्ताई, आयफोनसाठी घाई

औषधांची स्वस्ताई, आयफोनसाठी घाई

अर्थजगतात समोर आलेली अलिकडच्या काळातील खास बातमी म्हणजे विविध विकारांवर कामी येणारी ३९ महत्वाची औषधे स्वस्त होणार आहेत. दुसरी लक्षवेधी बातमी म्हणजे ‘ईपीएफ’च्या नवीन पोर्टलमुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळून थकित रक्कम सुलभ आणि सत्वर मिळणार आहे. दरम्यान, बहुचर्चीत आयफोन-१७च्या मागणीत प्रचंड वाढ दिसत असून ग्राहकांची बुकिंगसाठी घाई पहायला मिळत आहे.

देशातील सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांचा खर्च परवडावा यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्रीय राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NAPA) औषध मूल्य नियंत्रण आदेश (DCPO)-२०१३ अंतर्गत तब्बल ३९ नवीन औषध फॉर्म्युलेशन्सचे किरकोळ दर निश्चित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब (हाय बीपी), मधुमेह, एचआयव्ही, हृदयविकार आणि डोळ्यांच्या संसर्गावर उपचारासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या जीवनरक्षक औषधांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लाखो रुग्णांच्या खिशाला लागणारी मोठी कात्री थांबणार असून औषध बाजारातील कंपन्यांच्या मनमानी दरवाढीला लगाम बसणार आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तातडीने सुरू करण्यात आली आहे. नवीन दरपत्रकानुसार, उच्च रक्तदाबासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जाणाऱ्या गोळीची किंमत आता प्रति गोळी १४.७४ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी कॅप्सूल आता केवळ ६.३७ रुपयांना मिळणार आहे. याशिवाय, डोळ्यांच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आय ड्रॉपची किंमत ६८.६४ रुपये प्रति मिलिलीटर अशी निश्चित करण्यात आली असून, यामुळे विविध नामांकित ब्रँड्सच्या किमती कमालीच्या आटोक्यात येणार आहेत.

हा केवळ औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय नसून बाजारात उपलब्ध असलेल्या नवीन औषध निर्मिती प्रकारांवर थेट सरकारी नियंत्रण प्रस्थापित करणारा मुद्दा आहे. औषध कंपन्यांकडून कोणत्याही नवीन कॉम्बिनेशन औषधांच्या नावाखाली रुग्णांची आर्थिक लूट होऊ नये, हा यामागील मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, निश्चित केलेल्या या कमाल किमतींपेक्षा जास्त दराने औषधांची विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा मानला जाईल. एखाद्या औषध विक्रेत्याने किंवा उत्पादक कंपनीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचे आढळून आल्यास, कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असून बेकायदेशीरपणे वसूल केलेली जादा रक्कम व्याजासह सरकारजमा केली जाईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि परवडणारी होण्याच्या दिशेने देशाने एक आश्वासक पाऊल टाकले आहे. आता आणखी एक शुभ वार्ता. देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफशी संबंधित नियमांमध्ये आणि संपूर्ण तांत्रिक व्यवस्थेत ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने आपली जुनी प्रादेशिक डेटाबेस प्रणाली पूर्णपणे मोडीत काढत अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड आयटी इनेबल्ड सर्व्हिसेस प्रकल्पांतर्गत सर्व सदस्यांची माहिती एकाच राष्ट्रीय डेटाबेसमध्ये स्थानांतरित केली आहे. केंद्र सरकारच्या या क्रांतिकारी पावसामुळे आता पीएफ क्लेम, ऑटो ट्रान्सफर आणि परतावा मिळण्याची प्रक्रिया कमालीची सुलभ होणार असून देशातील सहा कोटींपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना ईपीएफओच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या फेऱ्या मारण्यापासून कायमची मुक्ती मिळणार आहे. या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पूर्वी प्रत्येक प्रादेशिक कार्यालयाचे स्वतंत्र असणारे डेटाबेस आता संपुष्टात आले असून संपूर्ण देशासाठी एकच केंद्रीय डेटाबेस कार्यरत झाला आहे. यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, तर जुन्या कंपनीचा पीएफ नवीन कंपनीच्या खात्यात वर्ग करण्यासाठी आता कोणतीही अडचण येणार नाही, कारण ही प्रक्रिया आता पूर्णपणे ऑटो ट्रान्सफर मोडवर चालणार आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे (निकासी) नियम अधिक सोपे करण्यात आले असून, क्लेम सेटलमेंटचा कालावधी कमालीचा कमी करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी अत्यंत जलद गतीने आर्थिक मदत मिळणे शक्य होणार आहे.

केंद्रीय डेटाबेस प्रणालीमुळे पीएफच्या व्याजाची गणना आणि ते खात्यात जमा होण्याची प्रक्रियादेखील वेगवान होणार आहे. दरवर्षी व्याजाची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी होणारा उशीर या नवीन पारदर्शक तंत्रज्ञानामुळे टळणार आहे. ईपीएफओने या सुधारणांसह नवीन ईपीएफ योजना - २०२६ अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पेन्शनच्या तरतुदींसाठी विशेष पावले उचलली आहेत. या डिजिटल क्रांतीमुळे देशातील कोणत्याही ईपीएफओ अधिकृत कार्यालयातून सभासदांना त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व सेवा आणि तक्रार निवारणाची सुविधा तत्काळ उपलब्ध होणार आहे. या नवीन पोर्टलचे आणि सेंट्रलाइज्ड प्रणालीचे थेट हस्तांतरण वेगाने पूर्ण केले जात असून, लवकरच या सेवा कर्मचाऱ्यांसाठी पूर्ण क्षमतेने खुल्या केल्या जातील. या सुधारणांमुळे पीएफ खात्यांमधील फसवणूक आणि तांत्रिक चुकांचे प्रमाण नगण्य होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ॲपलच्या आगामी आयफोन-१७ या मॉडेलबद्दल ग्राहकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत असून मागणीत अचानक प्रचंड वाढ झाली आहे. तंत्रज्ञान बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकृत लाँचिंगपूर्वीच या फोनसाठी जगभरातून आणि विशेषतः भारतीय बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणावर चौकशी आणि आगाऊ नोंदणीचे कल वाढू लागले आहेत. अत्याधुनिक फीचर्स आणि प्रीमियम लूकसाठी ओळखल्या जाणाऱ्या ॲपलच्या या नवीन स्मार्टफोन मालिकेची बाजारपेठेत अत्यंत आतुरतेने वाट पाहिली जात असून ग्राहकांमध्ये खरेदीसाठी अभूतपूर्व क्रेझ निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या मागणीमध्ये अचानक झालेल्या तुफान वाढीमागे एक अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे आगामी काळात या फोनच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ. ॲपलने नुकतीच आपल्या इतर काही प्रमुख उत्पादनांच्या आणि गॅजेट्सच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. कंपनीच्या या जागतिक धोरणाचा अंदाज घेऊन आयफोन-१७ च्या किमतीदेखील पूर्वीच्या मॉडेल्सच्या तुलनेत अधिक महाग असणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे लाँच झाल्यानंतर किमती आवाक्याबाहेर जाण्यापूर्वीच किंवा सुरुवातीच्या टप्प्यातच हा फोन पदरात पाडून घेण्यासाठी ग्राहकांनी आत्तापासूनच आर्थिक नियोजन आणि बुकिंगसाठी घाई सुरू केली आहे.

किंमतवाढीच्या भीतीव्यतिरिक्त आयफोन-१७ मध्ये समाविष्ट करण्यात येणारे प्रगत तंत्रज्ञान आणि एआय फीचर्सदेखील ग्राहकांना आकर्षित करत आहेत. या नवीन सिरीजमध्ये कंपनी अधिक वेगवान प्रोसेसर, सुधारित कॅमेरा सेन्सर आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी क्षमता देणार असल्याची चर्चा आहे. बाजारातील विश्लेषकांच्या मते, प्रीमियम सेगमेंटमध्ये स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी ॲपल या मॉडेलमध्ये क्रांतिकारी बदल करत आहे. याच कारणामुळे तंत्रज्ञानप्रेमी आणि नियमित आयफोन वापरकर्ते या नवीन अपग्रेडसाठी प्रचंड उत्सुक आहेत. त्याचा थेट परिणाम मागणी वाढण्यात झाला आहे. किरकोळ विक्रेते आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आयफोन-१७ च्या संदर्भातील ग्राहकांच्या चौकशीचे प्रमाण गेल्या काही आठवड्यांमध्ये दुप्पट झाले आहे. ॲपलच्या उत्पादनांची वाढती किंमत ग्राहकांच्या खिशावर ताण आणणारी असली, तरी ब्रँडची विश्वासार्हता आणि स्टेटस सिम्बॉलमुळे मागणीमध्ये कोणतीही घट झालेली नाही. आगामी सणासुदीच्या काळात या फोनचे लाँचिंग होण्याची शक्यता असल्याने तोपर्यंत ही मागणी अशीच टिकून राहील आणि बाजारात आयफोन १७ चा नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा अंदाज किरकोळ क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

___महेश देशपांडे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा