Sunday, July 19, 2026

समुद्राचे पाणी निळे का दिसते?

समुद्राचे  पाणी निळे  का दिसते?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील

महादेवाच्या मंदिरात शिवम मित्र गटाचे ज्ञान विज्ञानाचे संवाद खूपच रंगत होते.“समुद्राचे पाणी निळे का दिसते?” यात्रेकरूने प्रश्न केला.“खरे पाहता शुद्ध पाण्याला रंगच नाही काका.” शिवम सांगू लागला, “सूर्यप्रकाश जेव्हा पाण्यावर पडतो तेव्हा त्यातील थोडासा प्रकाश पाण्यात शोषला जातो. थोडासा प्रकाश पाण्यावरून परावर्तित होतो. बाकीचा सारा प्रकाश हा पाण्यातून आरपार जातो. त्यामुळे पाण्याला रंगच नाही व त्यात जो रंग मिसळला त्याचा रंग त्याला येतो. पण समुद्राचे पाणी हे निळेच दिसते. त्याचे कारण असे आहे की, निळ्या आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडल्यामुळे आपणास तलावाचे वा कोणत्याही मोठ्या जलाशयाचे तसेच अथांग सागराचे पाणीसुद्धा निळे दिसते; परंतु आपल्या भारताचे नोबेल पारितोषिक विजेते जगप्रसिद्ध व सुप्रख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण ह्यांनी प्रकाशकिरण समुद्राच्या पाण्यातून जात असताना त्यांचेसुद्ध विकिरण होते म्हणजे ते पाण्यात विखुरतात म्हणून समुद्राचे पाणी निळे दिसते, असे प्रतिपादन केले आहे.”

“हिमपर्वत कसे तयार होतात?” कैवल्यने प्रश्न टाकला.शिवम सांगू लागला, “अति उंच डोंगरांवर हवा फार थंडगार असते. तसेच ह्या उंच डोंगरावर मोठमोठे ढगही खूप असतात. ह्या ढगांत पाण्याची वाफ भरपूर असते. हवेतील थंडाव्याने वाफेचे पाणी होते. त्यामुळे ढगांमध्ये अमाप जलबिंदू तयार होतात. अति गारव्याने त्यांचे बर्फाचे कण बनतात. त्या बर्फकणांपासून बर्फ बनते. ते बर्फ डोंगरशिखरांवर पडून साचतेे. त्या बर्फापासून बर्फाचा डोंगर तयार होतो. तो उन्हात खूप छान चमकदार दिसतो. तेच बर्फ डोंगराच्या शिखराच्या उताराने खाली घसरते, द­ऱ्याखो­ऱ्यांतही साचत जाते. असा हिमपर्वत तयार होतो.आपल्या भारतात एखादा हिमपर्वत आहे का?”“आहे ना, भारताच्या उत्तरेस हिमालय पर्वत हा मस्त गार बर्फाचा हिमपर्वत आहे.” यात्रेकरूनेच उत्तर दिले.

“हिमालयातून उगम पावणा­ऱ्या नद्यांना वर्षभर पाणी का असते?” कुणालने प्रश्न विचारला.“हिमालयावर सतत बर्फ असते. ब­ऱ्याच नद्यांचे उगम बर्फाच्छादित भागातून झालेले आहेत. उन्हाळ्यात हे बर्फ वितळते. त्यामुळे हिमालयातून उगम पावणा­ऱ्या नद्यांना पावसाळ्यात पावसाचे पाणी असते, तर उन्हाळ्यात वितळलेल्या बर्फाचे पाणी असते. म्हणून हिमालयातून उगम पावणा­या नद्यांना वर्षभर पाणी असते,” शिवमने सांगितले.“हिमानी म्हणजे काय असते?” अमोलने प्रश्न टाकला. शिवम सांगू लागला, “कडक हिवाळ्यात प्रचंड हिमवर्षाव होत असतो. बर्फाचा दाब असह्य झाल्यामुळे डोंगराचे कडे कोसळतात. हे कडे बर्फासहित, दगड-धोंड्यांसहित वेगाने खाली कोसळत राहतात त्यालाच हिमप्रताप किंवा हिमानी म्हणतात. तसेच हिवाळ्यानंतर वसंताच्या मोसमात बर्फ वितळू लागते. अशा वेळी पाणी व बर्फ यांचा भार असह्य झाल्यामुळे डोंगरकडे कोसळतात. हिमाचा ढिगारा जेव्हा पर्वतशिखराला पेलवत नाही तेव्हा हिमानी कोसळते.”एवढे बोलून शिवम हातातले पुस्तक बंद करीत पुढे म्हणाला, “आता सुस्ती येत आहे गड्यांनो. आता येथेच थोडा वेळ शांततेने आराम करूया व मग परत निघू या.”“काही हरकत नाही.” सारे बोलले व तेथेच आडवे झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा