पस्तीस वर्षे नोकरी करून शुभा आज रिटायर्ड होत होती.दिवाणखान्यातील टेबलावर एक भरजरी शाल, श्रीफळ आणि एक सन्मानचिन्ह ठेवले होते. आज शुभाचा निवृत्तीचा सत्कार सोहळा होता. ऑफिसमध्ये प्रत्येकाने तिचे कौतुक केले होते, “शुभा मॅडम कधी सुट्टी घेत नव्हत्या.” “त्यांच्यासाठी काम म्हणजेच सर्वस्व होते.” “ शुभा मॅडम आपल्या कंपनीच्या ॲसेट होत्या.” प्रत्येक जण तिच्याजवळ येऊन म्हणत होता, “थँक्यू फॉर युअर सर्विसेस ! ” शुभा हसतहसत सर्वांचे अभिवादन स्वीकारत होती. ती शेवटी आपल्या केबिनपाशी आली. तिथे तिच्या जागी काम करणाऱ्या नवीन कर्मचाऱ्याच्या नावाची पाटी लागली होती. ज्या खुर्चीसाठी तिने आयुष्य घालवले, तिथे तिची जागा घ्यायला एका सेकंदाचाही उशीर लागला नव्हता. कॉर्पोरेट जगतासाठी ती फक्त एक ‘साधन’ होती याची जाणीव होती ती.जड अंतःकरणाने तिने केबिनमधील आपले सामान आवरले आणि सर्वांचा निरोप घेऊन ती घरी जाण्यासाठी बाहेर पडली. ऑफिसने तिच्यासाठी बुक केलेल्या कॅबमधून तिचा घराकडे प्रवास सुरू झाला. तिच्या मोबाईलवर एक मेसेज फ्लॅश झाला. तिच्या एका मैत्रिणीचा तो मेसेज म्हणजे एक प्रसिद्ध शायरी होती… - ‘क्या बताये लौटकर नौकरी से क्या लेके आये है, घर से जवानी ले गये थे, लौटकर बुढ़ापा लाये है…’ नकळत शुभाच्या डोळ्यांत पाणी आले.
ती स्वतःशीच पुटपुटली, “आयुष्याचे वास्तव सांगते ही शायरी! डोळ्यांत उज्ज्वल करिअरची हजारो स्वप्ने आणि हातात पहिली जॉइनिंग फाईल घेऊन जेव्हा माणूस ऑफिसच्या पायऱ्या चढतो तेव्हा त्याला वाटतं की तो एक नवीन साम्राज्य जिंकायला निघालाय. मन उत्साहाने अगदी भरलेले असते. ती पहिली काही वर्षे एखाद्या मोरपिसासारखी हलकीफुलकी असतात. कँटीनमधला वाफाळलेला चहा, दुपारी एकत्र उघडले जाणारे डबे आणि ऑफिसमधल्या त्या देखण्या मुलाला किंवा मुलीला चोरून बघताना मित्र-मैत्रिणींनी मागून मारलेली कोपरखळी... आयुष्य अगदी मोरपंखी वाटत असतं.त्यानंतर लग्न होतं. संसाराचा गाडा सुरू होतो. मग हव्या असलेल्या सुख-सुविधा, मुलांची फी, गृहकर्जाचे हप्ते आणि महिन्याच्या खर्चाचा मेळ बसवताना त्या मोरपिसाची जागा कधी ‘अति काम’ घेतं, हे समजतच नाही. हळूहळू माणसाला त्या चक्राची सवय होते. त्याला वाटू लागतं की आपण धावतोय कारण कुटुंब मागे पडू नये. पण प्रत्यक्षात, तो स्वतःच कुटुंबापासून खूप पुढे निघून गेलेला असतो.शुभाने मोबाईल स्क्रीन बंद केला. आणि ती भूतकाळात हरवून गेली... आयुष्यात घडून गेलेल्या एक एक घटना तिच्या डोळ्यांसमोर येऊ लागल्या. पंधरा वर्षांपूर्वी कंपनीने तिला एक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट दिला होता. तो यशस्वी करणे हे तिच्या करियरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे होते. जीवतोड मेहनत घेऊन सलग तीन दिवस ऑफिसमध्ये राहून तिने तो पूर्ण करून दाखवला होता. कंपनीने तिचे “तुम्ही कंपनीचे आधारस्तंभ आहात!” असे म्हणून खूप कौतुक केले होते. तिला बढतीही मिळाली. ती खूप खूश झाली होती.
पण याच तीन दिवसांत तिची मुलगी प्रिया तापाने फणफणत होती तर तिची साधी विचारपूस करायलाही तिला वेळ नव्हता. तिने नवऱ्यालाच फोन करून सांगितले,“तुम्ही थोडे सांभाळून घ्या. हा प्रोजेक्ट पूर्ण करणे माझ्या करियरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे.”या तिच्या वागण्यामुळे प्रियाने नंतर कित्येक दिवस आईशी अबोला धरला होता. प्रिया आईपासून दूर गेली होती.मोठा मुलगा अनिल. त्याचा पदवीदान समारंभ होता. युनिव्हर्सिटीमध्ये तो पहिला आला होता. आईने या समारंभाला यावे असा त्याचा खूप आग्रह होता. पण शुभाने ती जबाबदारी अनिलच्या वडिलांना दिली. “कंपनी ऑडिट आहे. मला येता येणार नाही. मी आले तर कंपनीचे खूप मोठे नुकसान होईल. तुम्ही प्लीज अनिलच्या सत्कार समारंभाला उपस्थित रहा असा मेसेज दिला.” या तिच्या निर्णयाने अनिल खूप नाराज झाला होता.असे अनेक प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे तिच्या डोळ्यांसमोर तरळत होते... आयुष्यात अनेक तडजोडी करून ती आता खूप थकली होती. शारीरिक थकवा तर होताच पण मानसिक थकवा त्याहून जास्त होता.विचारांच्या तंद्रीतच ती घरी पोहोचली. नवरा सतीश तिची वाट पहातच होता. ती सोफ्यावर टेकून बसली. सतीशने तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला. तिच्या डोळ्यांत पाणी होते.सतीशने विचारले, “अगं शुभा, आज तू नोकरीतून निवृत्त झालीस. जबाबदाऱ्यांचे ओझं कमी झालं. एवढा मोठा सत्कार झाला. आज तर आनंदाचा दिवस मग डोळ्यांत अश्रू का?”हातातील शालीवर हळुवार हात फिरवत ती म्हणाली, “काय माहीत, हा आनंद आहे की चुकीची शिक्षा?”“अगं, तू असं का बोलतेस? तू आयुष्यभर एवढी मेहनत घेतलीस. कंपनीला उभे केलेस.”“हो, कंपनी सांभाळली पण माझे स्वतःचे घर सांभाळता नाही आले मला… त्याचे काय?” तिने दीर्घ सुस्कारा सोडला. आणि पुढे म्हणाली,“ आज मी अनिलला फोन केला होता. म्हटलं, “बाळ, आज माझी नोकरी संपली. मी घरी येतेय.”सतीश, त्यावर तो काय म्हणाला माहिताय... अभिनंदन आई, मी मीटिंगमध्ये बिझी आहे. नंतर बोलू... त्याच्या आवाजात ना कौतुक होतं ना जिव्हाळा. होता फक्त कोरडेपणा. “मी पण अशीच वागले ना रे त्याच्याशी…. तेच तो परत करतोय मला.”
“ जाऊ दे शुभा, एवढं मनाला नको लावून घेऊ. असेल तो कामात.”“नाही सतीश, मी स्वतःला फसवू शकत नाही. आज ऑफिसचे लोक माझ्या रजा न घेण्याचे कौतुक करीत होते तेव्हा मला आतून रडू येत होते... अनिलचे वाढदिवस, त्याचे सत्कार, त्याचे शाळेतील पहिले भाषण… मी कधीच नव्हते रे तिथे. जेव्हा जेव्हा तो रात्रीचा रडायचा, त्याला आईची गरज असायची तेव्हा मी माझ्या लॅपटॉपवर प्रेझेंटेशन बनवत असायचे.“थोडं थांब... मला वेळ नाही...नंतर बोलू हे मी त्याला कित्येक वेळा ऐकवले आहे. आज तेच त्याने परत केले.”“अगं, हे सगळं तू त्यांच्या भविष्यासाठीच केलेस.”“असे सुरुवातीला मलाही वाटायचे. पण नंतर ती एक सवय झाली... एक झिंग चढली... जास्त पैसे कमवायची. बँक बॅलन्स वाढला. पण नात्यांचे काय?प्रिया तिकडे परदेशात राहते. आठवडा, पंधरवड्यातून एक फोन येतो तिचा. तोही तुझ्याशी बोलण्यासाठी… कारण माझ्याशी मोकळेपणाने बोलायची सवयच नाही तिला. जेव्हा त्यांना माझी गरज होती तेव्हा मी नोकरीला प्राधान्य दिलं आणि आता मला त्यांची गरज आहे तर त्यांच्याकडे वेळच नाही माझ्यासाठी.” शुभाच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले.
“ शुभा, शांत हो. जे गेलं ते परत आणता येणार नाही. आता तुझ्याकडे वेळच वेळ आहे. अनिल आणि प्रियाशी पुन्हा पुन्हा बोल. फोन कर त्यांना, हक्काने घरी बोलवून घे. आई शेवटी आई असते, मुलं तुला माफ करतील.”शुभाने डोळे पुसले. सतीशच्या शब्दांनी तिच्या मनात एक आशेचा किरण जागा केला. तिने ताबडतोब मोबाईल उचलला आणि अनिलला फोन लावला. दोन-तीन वेळा बेल वाजली आणि पलीकडून अनिलचा घाईघाईत आवाज आला, “हो आई, बोल... बाबा ठीक आहेत ना?”“ हो ठीक आहेत.”
अरे, आज माझी नोकरी संपली ना... तर मी विचार करत होते, पुढच्या वीकेंडला तू आणि सुनबाई घरी या ना गप्पा मारायला. मी तुझ्या आवडीचे पुरणपोळीचे जेवण बनवीन. खूप दिवस झाले आपण एकत्र बसलो नाही...”पलीकडे दोन सेकंद शांतता पसरली. मग अनिलचा अगदी व्यावहारिक आणि कोरडा आवाज आला.“सॉरी आई, पुढच्या वीकेंडला आमचं आधीच प्लॅनिंग झालंय. आणि तसंही आयटीमध्ये खूप शेड्युल टाईट असतं गं. क्लायंट मिटिंग्ज असतात. तू तर समजू शकतेस ना? तूही आयुष्यभर हेच केलंस. आम्हाला सुट्टीच्या दिवशी ‘डे केअर’मध्ये ठेवून तू ऑफिसच्या मिटिंग्ज सांभाळायचीस... आम्ही तिथेच तर शिकलो की ‘करिअर फर्स्ट’. बरं, माझी मिटिंग सुरू होतेय, बाय!” शुभाच्या हातातून फोन गळून पडला. सतीशने पुढे होऊन तिचा हात हातात घेतला.
“ शुभा अशी खचून जाऊ नकोस. अनिल जे बोलला ते खरं आहे, पण तो तुझा द्वेष करत नाहीये. त्याने फक्त तुझाच पॅटर्न स्वीकारलाय. जर तू नोकरीत तिथली नाती कमावू शकतेस, तर आता तुझ्या हक्काच्या माणसांना कमवायला कितीसा वेळ लागेल तुला? हार मानू नकोस.”शुभाने डोळे पुसले. तिने टेबलावर ठेवलेल्या त्या भरजरी शालीकडे आणि सन्मानचिन्हाकडे पाहिले. ज्या कॉर्पोरेट जगात तिने आयुष्य घालवले, तिथे तिने कधीच पराभव स्वीकारला नव्हता. मग स्वतःच्या कुटुंबासमोर ती कशी हरू शकत होती? तिच्या चेहऱ्यावरचा पश्चात्ताप आता एका दृढनिश्चयात बदलला. तिने पुन्हा एकदा फोन उचलला. यावेळी तिने फोन केला नाही, तर अनिलला एक व्हॉट्सॲप मेसेज टाईप केला :“अनिल बाळा, तू अगदी बरोबर बोललास. मी नेहमी करियरला प्राधान्य दिलं. तुझ्या बालपणात मी कुठेच नव्हते, याची मला आज तीव्र जाणीव झालीय. तू मीटिंगमध्ये बिझी आहेस हे मी समजू शकते. पण आता माझी कोणतीही मीटिंग नाहीये. मी निवृत्त झालेय आणि माझ्याकडे आता फक्त तुझा आणि प्रियाचाच वेळ आहे. या वीकेंडला नाही तर पुढच्या वीकेंडला या. आई तुझी वाट पाहील...” मेसेज सेंट झाला.शुभाने फोन बाजूला ठेवला. चेहऱ्यावरचे अश्रू पुसले आणि खिडकीबाहेर पाहिले. बाहेर अंधार पडत चालला होता, पण आकाशात चंद्र उगवत होता. तिला समजले होते की, नात्यांमधला हा दुरावा एका दिवसात संपणारा नाही. त्यासाठी तिला पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागणार होती. आज पहिल्यांदाच, तिच्या मनात ऑफिसच्या फाईल्सचं ओझं नव्हतं, तर आपल्या मुलांना पुन्हा एकदा आपलंसं करण्याची एक आशेची नवी ऊब होती.सतीश, आज मला कळून चुकलंय... शेवटी नोकरी हा वाळूचा किल्ला आहे. निवृत्तीच्या लाटेने तो वाहून जातो. अक्षय असते ती फक्त जमीन म्हणजे आपले घर.






