- चिंतन; डॉ. साधना कुलकर्णी
आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यामध्ये परिवर्तनाचे, सर्जनाचे सामर्थ्य असते. त्यात आषाढातला पाऊस हा जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तनामनाचा, सृष्टीचा स्वभाव बदलून टाकतो. मात्र यंदाच्या आषाढाला अनेक गमतीशीर, गंभीर, अनपेक्षित घडामोडींची पार्श्वभूमी लाभली. त्यामुळे मानवी मनाचा नव्याने ठाव घेण्याची संधी मिळाली.
यंदा बहुप्रतीक्षित पाऊस, उशिरा का होईना पण आला. वैशाख वणव्यात शरीर मनाची लाही लाही होत असताना आषाढाची चाहूल लागते. आषाढ मनात आशा घेऊनच उजाडतो. व्याकूळ होऊन संपूर्ण सृष्टी पावसाची वाट बघू लागते. उन्हाळा आणि हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये परिवर्तनाचे, सर्जनाचे सामर्थ्य असते. त्यात आषाढातला पाऊस हा जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे तनामनाचा, सृष्टीचा स्वभाव बदलून टाकतो. हा पाऊस भूमीला तृप्त करतो, शेतकऱ्यांच्या जीवात जीव आणतो, कवी मंडळींच्या मनात कल्पनांचे मोहोर फुलवतो, साहित्यिकांच्या प्रतिभेला बहर आणतो, प्रेमिकांच्या मनात विरहाची आग पेटवतो, तर जुन्याजाणत्यांना आठवणीत रमवून टाकतो. असा अनेकांच्या भावविश्वात वेगवेगळे बदल हा पहिला पाऊस घडवून आणत असला तरी सर्वसाधारणतः सार्वत्रिक आनंदाचं वातावरण निर्माण करण्याची शक्ती त्यात असतेच आणि मग जुन्या कटू घटना काही काळासाठी तरी विस्मरणात जातात आणि मनात फक्त पाऊस उरतो. या वर्षीचा उन्हाळा जरा जास्तच जाणवला. अर्थात आयुष्याचे कितीही उन्हाळे बघितले तरी... यंदाचा उन्हाळा जरा जास्तच हो, असं म्हणण्याचा प्रघात आहे. पण खरंच या उन्हाळ्यात डोक्यावर सूर्य आग तर ओकत होताच पण आजूबाजूला ज्या घटना घडत होत्या, त्यामुळे वातावरणातील दाहकता कमालीची वाढली होती. सुरुवातीला मे महिन्यात आला तो अधिक मास. अधिक मासात धार्मिक कार्य करायचा वरून (वरून म्हणजे साक्षात वरून - श्री विष्णू भगवानांकडून बरं का...) परवानाच मिळालेला असतो. पण आदेशानुसार कार्यवाही करायची नाही, हा आपल्या भूतलावरचा नियम. त्यामुळे अधिक मासात जनमानसातले अधिक अतिरेकी धार्मिक रूप बघून भर मे महिन्यात जरा जास्तच घाम फुटला. आदेशानुसार जप, तप, व्रतवैकल्य सोडून यच्चयावत जामात मंडळींना दानधर्म करण्याचे सामूहिक उत्सव ठिकठिकाणी साजरे केले गेले. जितक्या जास्त जामातांचं पूजन, तितके जास्त पुण्य पदरी पडणार याची खात्री असल्यामुळे सख्खे, चुलत, मामे, मावस... अशा सगळ्याच जावई वर्गाला प्रचंड लाभ मिळाला. याशिवाय नदीत स्नान करण्याचे आणि तिला प्रदूषित करण्याचे शास्त्रदेखील आवर्जून पाळले गेले. एकंदरीत, हा उन्हाळा श्वशुरांना जरा भारीच गेला.
त्यात नेमकं ‘नीट’ पेपरफुटी प्रकरण उद्भवलं. खरं तर पेपर फोडण्याची यंत्रणा प्रचंड कठीण आणि किचकट असावी, असं माझं निष्पाप मन सांगतं. वास्तविक, या पेपरफुटी यंत्रणेत गुंतण्यापेक्षा ‘नीट’चा अभ्यास नीट होऊ शकेल, हेही माझं प्रामाणिक मत. पण हल्ली ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको’ या पंथाचे लोक अल्पसंख्य असल्याने शिक्षक-विद्यार्थी, राजकारणी इ.इ. अनेकांनी या पेपरफुटी प्रकरणात नीट सहकार्य केले. त्यानंतर लगोलग टीईटीचाही पेपर फुटल्याने शिक्षकांचीही प्रवेश परीक्षा रद्द झाली. पेपरफुटी प्रकरण तापल्यामुळे उन्हाळा अर्थातच जास्त कोपला. या घटना कशाबशा पचवण्यासाठी निष्पाप जनतेची भर उन्हाळ्यात प्रचंड ऊर्जा खर्च झाली. तेवढ्यात भावी नवऱ्याला लोहगडावरून ढकलून देऊन हत्या केल्याची बातमी समोर आली. लग्नाला नकार देण्याचा एक नवीन पर्याय तरुण विवाहेच्छुक मंडळींसमोर उघड झाला. या घटनेच्या अनेक बाजूंचं माध्यमावर प्रचंड चर्वितचर्वण आणि दळण दळलं गेलं. इतकं की त्यात गुंतल्यामुळे या दाहक उन्हाळ्याकडे लक्ष द्यायला फुरसत मिळाली नाही.
एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेणं ही इतकी सहज, सोपी आणि साधी प्रक्रिया असते, याचा साक्षात्कार आजच्या तरुण पिढीला तसंच शालेय पिढीलाही झाल्याच्या धक्क्यातून सावरत नाही तोच विनोदाची (?) एक जात समोर आली. ज्या विनोदाला लाखो फॉलोअर्संनी उचलून धरलं, पुलं, आचार्य अत्रे, द. मा. मिरासदार, वि. आ. बुवा, मंगला गोडबोले, शिरीष कणेकर यांच्या विनोदावर पोसलेल्या आमच्या निष्पाप पिढीसमोर एका नवीनच विनोदाचं महाद्वार उघडलं. वैद्यकीय, शिक्षण घेताना मृतदेहाचं डिसेक्शन करणं हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे शरीररचना स्पष्टपणे लक्षात येते. या संदर्भात एका स्टँड अप कॉमेडी शोमध्ये, पुरुष शरीराचं डिसेक्शन करताना...‘त्याच्या काही अवयवांवरून आम्ही ज्योक्स करतो’ असे गौरवोद्गार प्रथितयश कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने हसत हसत काढले. या तिच्या विनोदबुद्धी(?)ला प्रचंड लाईक्स येऊन क्षणार्धात ती प्रसिद्ध झाली.
“घटं भिंद्यात्? पटं छिंद्यात्? कुर्यात्? रासभरोहणम्? । येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुष भवेत्? ॥” एका संस्कृत सुभाषितानुसार आजकालची परिस्थिती अशी आहे. प्रसिद्ध होण्यासाठी कर्तृत्व, गुणवत्ता, कौशल्य यांची अजिबात गरज नाही. कपडे फाडणे, भांडी फोडणे, गाढवावर बसणे इत्यादी कृतींमुळेच माणूस कमालीच्या प्रसिद्धीला पावतो. असे अनेक सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक धक्के बसत असताना साक्षात वैशाख वणवाही फिका पडला. ‘मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मेरी मर्जी’ हे गोविंदाचं गाणं मला अचानक आठवलं आणि हे गीतलेखन करणाऱ्या त्या द्रष्ट्या कविवर्याचं मला विलक्षण कौतुक वाटलं. मी करेन ती पूर्व दिशा, असा कमालीचा आत्मविश्वास या गाण्यात आहे, जो हल्ली सगळ्यांमध्ये आढळतो. तो योग्य आहे की अयोग्य हे काळच ठरवणार.
या सगळ्या घटना कमी होत्या की काय, म्हणून धार्मिक स्तरावर एक धक्कादायक प्रकार उघडकीला आला. संपूर्ण देशाचं आराध्यदैवत असलेल्या, अभिमानाचा विषय असलेल्या अयोध्येच्या श्रीराम मंदिरात देणग्यांच्या निधीमध्ये, दागिन्यांमध्ये अफरातफर होण्याचा अनवस्था प्रसंग समोर आला. कायम विश्वास आणि श्रद्धा ठेवावी अशी काही ठिकाणं समाजमनात असतात, ज्यावर घाव घालून या प्रसंगाने वैशाख वणव्यावरही कडी केली. पण, आणखी एक गंमतीची गोष्ट सांगायचीच राहिली. नुकतंच ऑटोचालकांना मराठीचे धडे देणं सुरू केलं गेलं होतं. तीन महिन्यांची आगाऊ फी घेऊन मराठी शिकवणी आता कुठे रंगात आली होती तोच विधानसभेच्या सभापतींनी संसदेत अभिजात मराठीचा नवीन आविष्कार सादर केला. शिकवणीतले यूपी भय्या विद्यार्थी लगेच तावातावाने घरी आले आणि दुगनी फीसवा वापस दे दे, असं धरणं देऊन बसले. या आर्थिक फटक्यामुळे भर वैशाखात हुडहुडी भरली.
असा हा चित्रविचित्र घटनांनी भरलेला वैशाख या वर्षी जरा जास्तच जाणवला आणि पावसाची वाट बघताना डोळ्यांत प्राण आले. ‘मै चाहे ये करू, मै चाहे वो करू, मेरी मर्जी’ असं पावसानं म्हटलं असतं तर? माणूस आपल्या मर्जीने कसाही वागतो, पण निसर्गाने, ऋतूने नियमाप्रमाणेच वागावं अशी अपेक्षा करतो. पण पाऊस उशिरा का होईना, बरसला आणि साऱ्या कटू घटनांचा विसर पडेल असा आनंदही त्याने दिला. समाजाची ही रीतच आहे. प्रसंग घडतात, गाजतात, चर्चा होतात आणि विस्मरणात जातात. घटनांमधून काही बोध घ्यावा, शिकवण घ्यावी अशी आज कुणाचीही मनोभूमिका नाही.
शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरं. हे लिहिता लिहिता इंद्रायणी नदीला पूर आल्याच्या बातम्या ऐकू आल्या. दरड खचून रहदारी बंद झाली. आता इंदिरा संत यांच्या कवितेतल्या ओळींप्रमाणे ‘नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी’ असं म्हणायची वेळ तर येणार नाही ना, अशी भीती वाटू लागली. पण त्यापेक्षा त्याच चालीवर ‘नको नको रे माणसा असा बेभान तू होऊ, आपल्याच लेकरांचा तू काळ नको होऊ’ असं म्हणणं जास्त संयुक्तिक वाटत आहे. आपल्या पुढच्या पिढीवर नेमके काय संस्कार घडतील, याचा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. असो. इंद्रायणीला पूर आला, तरी वारकऱ्यांच्या विठ्ठल भक्तीचा महापूर इंद्रायणी नक्कीच समजून घेईल, कारण तो निसर्गाचा एक अंश आहे, माणूस नाही.






